Assembly Election : काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार नाना पटोले यांच्याकडे कोणतेही काम नाही. त्यामुळे ते केवळ उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाच टार्गेट करतात. नाना पटोले यांनी केवळ पाच हजार मतांनी विजय मिळविला होता, हे त्यांनी विसरू नये, अशी टीका भाजपचे नेते माजी मंत्री तथा आमदार डॉ. परिणय फुके यांनी केली. रविवारी (10 नोव्हेंबर) त्यांनी नागपुरात प्रसार माध्यमांशी संवाद साधला.
नाना पटोले यांच्याकडे अन्य कोणताही विषय शिल्लक राहिलेला नाही. खरं तर पटोले यांनी आपला रेकॉर्ड तपासून पाहिला पाहिजे. यंदाची विधानसभा निवडणूक अटीतटीची होणार आहे. या निवडणुकीत नाना पटोले हे कमीत कमी 25 ते 30 हजार मतांनी पराभूत होतील. त्यामुळं त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करण्यापेक्षा आपल्या मतदारसंघाकडं लक्ष द्यावं, असा सल्लाही डॉ. फुके यांनी दिला.
टीकेतच धन्यता
काँग्रेसजवळ सांगण्यासारखे काहीच नाही. देशातील काही राज्यांमध्ये काँग्रेसचे सरकार आहे. या राज्यात कोणता विकास केला, हे सांगण्यासारखे काँग्रेसजवळ काहीच नाही. त्यामुळं केवळ टीका करून काँग्रेस लोकांचं लक्ष भरकटविण्याचं काम करीत आहे. काँग्रेसकडून सध्याच्या परिस्थितीत बेताल वक्यव्य केली जात आहेत. मीडियामध्ये त्यांना त्यातून प्रसिद्धी मिळवायची आहे. लोकांचं लक्ष भरकटवायचं आहे. मात्र त्यांच्याकडं कोणी लक्ष देत नसल्यानं त्यांनी आता खालच्या पातळीवर जात टीका सुरू केल्याचंही फुके म्हणाले.
राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खर्गे यांना तसंही कोणतं काम नाही. महाविकास आघाडीचं सरकार महाराष्ट्रातू गमावल्यानंतर तर नाना पटोले बिथरले आहेत. त्यामुळं त्यांच्याकडून विनाकारण नरेंद्र मोदी यांच्याविरूद्ध टीका टीप्पणी केली जाते. काँग्रेसकडून राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर टीका करण्यात येते. काँग्रेसच्या किती नेत्यांनी आतापर्यंत संघाच्या कार्यालयात जाऊन पाहिलं. कोणकोणत्या महापुरूषांचे फोटो तिथे लागले आहेत, हे त्यांनी पाहिलं आहे का, असा सवाल देखील फुके यांनी केला.
ओबीसी समाज हा राजकीय दृष्टीने परिपक्व आहे. त्यामुळे काँग्रेसकडून कोणत्या समाजाचा कसा वापर केला जातो, हे ओबीसी समाजाला चांगलेच ठाऊक आहे. काँग्रेसनं आतापर्यंत अनेक जातीधर्मातील लोकांना आपसात भांडत ठेवले आहे. त्यामुळं भांडणं लावणाऱ्या काँग्रेसच्या पाठिशी मतदार कधीही उभे राहणार नाही, असंही फुके म्हणाले. देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राच्या राजकारणातील सगळ्यात सक्षम नेते आहेत. त्यामुळं सगळेच फडणवीस यांच्यावर जाणीवपूर्वक टीका करतात, असंही डॉ. परिणय फुके म्हणाले.