मतदानाचा टक्का वाढावा यासाठी प्रशासनाकडून व्यापक स्तरावर प्रयत्न केले जात आहेत. ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांग मतदारांना केंद्रावर जाण्यासाठी अनेक अडथळे पार करावे लागतात. त्यामुळे अनेकजण मतदान करण्यासाठी जात नसल्याची स्थिती असते. त्यावर उपाय म्हणून 85 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक व दिव्यांगांना गृह मतदानाची सुविधा निवडणूक आयोगाने उपलब्ध केली आहे. घरून मतदान करण्यासाठी अर्ज केलेल्या 3 हजार 871 ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांगांचे घरूनच मतदान करून घेण्याची प्रक्रिया राबविली जाणार आहे.
बुलढाणा जिल्ह्यातील सात विधानसभा मतदारसंघांत निवडणुकीचे वातावरण तापले आहे. उमेदवारांकडून आरोप-प्रत्यारोपांच्या फेऱ्या सुरू आहेत. एकीकडे राजकीय पक्ष, उमेदवार प्रचारात गुंतले असून, दुसरीकडे प्रशासकीय यंत्रणा मतदान आणि मतमोजणीच्या कामात व्यस्त आहे. 20 नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. त्यासाठी आवश्यक तयारी पूर्ण केली जात आहे. ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांगांना घरूनच मतदान करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
इच्छुक मतदारांकडून अर्ज भरून घेण्यात आले. अर्ज केलेल्या मतदारांचे घरूनच मतदान करून घेतले जाणार आहे. जिल्हा प्रशासनाच्या वतीने ज्येष्ठ मतदार आणि दिव्यांगाच्या मतदानाची प्रक्रीया सुरु करण्यात आली आहे.
तीन दिवस मोहीम
दिव्यांग व 85 वर्षापेक्षा जास्त वयोमानातील मतदारांना निवडणुकीमध्ये मतदान करता यावे यासाठी भारत निवडणूक आयोगाद्वारा होम व्होटिंगची सुविधा देण्यात आली आहे. ज्येष्ठ नागरिक व दिव्यांगाना घरपोच मतदान करणे सोईचे होण्यासाठी 160 पथकांमार्फत 14 ते 16 नोव्हेंबर 2024 दरम्यान गृहमतदान करून घेतले जाणार आहे. त्या अनुषंगाने निवडणूक विभागाने तयारी पूर्ण केली आहे.
सक्षम अॅपवर विविध सुविधा
विधानसभा निवडणुकीत दिव्यांग आणि ज्येष्ठ मतदारांना सुलभ रीतीने मतदान करण्यास मदत व्हावी, यासाठी निवडणूक आयोगाने ‘सक्षम’ नावाचे मोबाइल अॅप तयार केले आहे. या अॅपवर दिव्यांग व ज्येष्ठ मतदारांसाठी मूलभूत सुविधा उपलब्ध करून दिली आहे. या सुविधेचा सर्व पीडब्ल्यूडी (पर्सनल वुइथ डिसअॅबिलिटी) मतदारांनी आपल्या मोबाइलमध्ये डाउनलोड करून मतदारांसाठी दिलेल्या सोयीसुविधा प्राप्त करून घ्याव्यात, असे आवाहन करण्यात आले आहे.
Nagpur : मुस्लिम मतांच्या विभाजनाने होणार काँग्रेसचे नुकसान?
प्रचार केल्यास शिक्षकांवर शिस्तभंगाची कारवाई !
राज्यातील अकृषी विद्यापीठे आणि संलग्नित महाविद्यालयातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी राजकीय पक्षांच्या निवडणूक प्रचारात प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष सहभाग घेतल्यास त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्यात येणार आहे. त्याबाबतचे निर्देश उच्च शिक्षण विभागाने पहिल्यांदाच राज्यातील सर्व विद्यापीठे, महाविद्यालये आणि शैक्षणिक संस्थांना दिले आहेत. जिल्हा प्रशासनाला याबाबत निर्देश प्राप्त झाले आहेत. राज्यात विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू आहे. त्यानुसार आचारसंहिता नियमाचे पालन करण्याबाबतचे निर्देश निवडणूक आयोगाने दिले आहेत.
राज्यातील विद्यापीठे व संलग्नित महाविद्यालयातील शिक्षकेतर अधिकारी, कर्मचाऱ्यांसाठी सामाईक महाराष्ट्र नागरी सेवा नियमातील तरतुदी लागू केल्या आहेत. त्यानुसार कोणत्याही शासकीय कर्मचाऱ्याला कोणत्याही राजकीय पक्षाचा किंवा राजकारणात भाग घेणाऱ्या कोणत्याही संघटनेचा सदस्य होता येणार नाही. त्यांच्याशी संबंध ठेवता येणार नाही, तसेच कोणत्याही राजकीय चळवळीत किंवा कामात भाग घेता येणार नाही, असे परिपत्रकात नमूद केले आहे.