Congress. : सध्या भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी शोले चित्रपटातील जेलरची भूमिका डोक्यात ठेवली आहे. गेल्या महिन्याभरात त्यांनी तिसऱ्यांदा हे उदाहरण देऊन विरोधकांवर टीका केली आहे. सर्वांत पहिले त्यांनी उद्धव ठाकरे यांना शोलेमधील जेलरची उपमा दिली होती. त्यानंतर संजय राऊत यांनाही हीच उपमा दिली आणि आता काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंसाठीही शोलेतील जेलरचीच उपमा वापरली आहे.
निवडणूक प्रचारादरम्यान एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप मोठ्या प्रमाणात सुरू आहेत. नेतेमंडळीदेखील एकमेकांना चिमटे काढण्यावर भर देत आहेत. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना चिमटा काढला आहे. त्यांची तुलना ‘शोले’तील ‘जेलर’सोबत केली आहे.
वाद सुरू
महाविकास आघाडीतील नेत्यांमध्ये मुख्यमंत्रिपदाच्या नावावरूनच वाद सुरू आहेत. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा मात्र यात मोठा भ्रमनिरास झाला आहे. त्यांची अवस्था सध्या असरानी यांनी केलेल्या ‘शोले’ पिक्चरमधील ‘जेलर’च्या भूमिकेसारखी झाली आहे. सगळे इकडे-तिकडे गेले असून, त्यांच्यासोबत कुणीच उरलेले नाही. त्यांचे मुख्यमंत्रिपदाचे स्वप्न धुळीत मिसळले आहे, असे बावनकुळे म्हणाले.
महायुतीच्या नेत्यांमध्ये मुख्यमंत्रिपदावरून कुठलीही चढाओढ नाही. आम्ही विकासाकरिता काम करतो आहे. मुख्यमंत्री पदासंदर्भात केंद्रीय नेतृत्व निर्णय करेल. आमचे संपूर्ण लक्ष केवळ महायुतीला विजय मिळावा याकडेच आहे, असे बावनकुळे यांनी स्पष्ट केले. काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे हे नागपुरात येत आहेत. मात्र ते लाडकी बहीण योजना, शेतकऱ्यांची वीजबिल माफी चुकीची आहे, असे म्हणतात. जनतेच्या हिताच्या सर्वच योजना चुकीच्या आहेत, असे त्यांना वाटते. त्यांना जनताच धडा शिकवेल, असे बावनकुळे म्हणाले.
बावनकुळेंचा प्रचार जोरात!
चंद्रशेखर बावनकुळे यांना 2019 मध्ये तिकीट नाकारण्यात आले होते. पण, त्यानंतर त्यांचे वजन वाढले. ते विधानपरिषदेत तर पोहोचलेच, शिवाय पक्षाचे प्रदेशाध्यक्षही झाले. त्यामुळे पक्षात त्यांचा चांगला प्रभाव आहे. यंदा ते पुन्हा एकदा निवडणुकीच्या रिंगणात आहेत. दहा वर्षांनंतर पुन्हा एकदा प्रचारासाठी कामठी मतदारसंघात फिरत आहेत. दरम्यानच्या काळात त्यांनी मतदारसंघासोबत कनेक्ट ठेवला होता. त्यामुळे काँग्रेसलाही बावनकुळेंचा झंझावात रोखताना कष्ट घ्यावे लागणार आहेत.