Narendra Modi Tour : विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी अकोल्यामध्ये दाखल झाले आहेत. भाजप उमेदवाराच्या प्रचारासाठी मोदी हे अकोल्यातील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ परिसरामध्ये सभा घेणार आहेत. मोदी यांची सभा आटोपल्यानंतर लगेचच अकोल्यात वंचित बहुजन आघाडी आपल्या पाठिंब्याबाबत निर्णय घेणार आहे. भाजप किंवा काँग्रेसचे उमेदवाराला पाठिंबा देणार नाही असं वंचितनं आधीच जाहीर केलं आहे. त्यामुळे नरेंद्र मोदी यांची पाठ वळताच वंचित कोणाला पाठिंबा देणार याची उत्सुकता आता संपणार आहे.
वंचित बहुजन आघाडीच्या रेसमध्ये माजी नगराध्यक्ष हरीश अलीमचंदानी हे सर्वांत आघाडीवर आहेत. सिंधी समाजासह अकोल्यातील बहुतांश व्यापाऱ्यांचा त्यांना जोरदार पाठिंबा आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने देखील त्यांचेच नाव उमेदवारीसाठी पुढे केले होते. मात्र भारतीय जनता पार्टीमध्ये हिटलरशाही करणाऱ्या नेत्यांनी विजय अग्रवाल यांचे नाव जाणीवपूर्वक पुढे केले. त्याचा फटका आता भाजपला बसत आहे. त्यामुळेच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासारख्या दोन नेत्यांना केवळ हिंदुत्वाच्या आधारावर मतं मागावी लागणार आहेत.
विकास शून्य
अकोला शहराच्या विकासाचा विचार केल्यास येथे बोंबाबोंब आहे. शहरातील जवळपास सर्वच रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. अनेक रस्ते अर्धवट आहेत. अकोला शहरांमध्ये लोडशेडिंग नसतानाही अनेक तास वीजपुरवठा बंद राहतो. नितीन गडकरी यांनी उपकार करीत अकोला शहराला एक उड्डाणपूल आणि एक अंडरपास दिला. मात्र त्याची देखभाल दुरुस्ती देखील स्थानिक नेत्यांना करता आली नाही. अकोला महानगरपालिकेमध्ये अनेक वर्ष भाजपने सत्ता गाजवली. पण आजही अकोल्यातील समस्या ‘जैसे थे आहेत.’
या सर्व परिस्थितीत भाजपच्या नेत्यांनी पक्षाच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांना हात धरून बाहेर काढण्यापर्यंतची मजल मारली आहे. त्यामुळेच पक्षातील अनेक ज्येष्ठ आणि निष्ठावंत कार्यकर्ते, पदाधिकारी यंदा निवडणुकीच्या प्रचारापासून दूर आहे. भाजपचे दिवंगत आमदार गोवर्धन शर्मा उर्फ लालाजी यांच्या समर्थकांना अपमानास्पद वागणूक दिली जात आहे. ‘लालाजी आता स्वर्गात गेले. ते परत येणार नाही. त्यामुळे तुम्हाला काम करायचे नसेल तर बाजूला व्हा’, अशा धमक्या भाजपच्या पदाधिकाऱ्यांना दिल्या जात आहेत.
मोदींची भावनिक साद
अकोल्याच्या भाजपमध्ये सर्वत्र अनागोंदी सुरू असताना नरेंद्र मोदी हे कदाचित लालाजी यांच्या नावानेच मतं मागण्याची शक्यता आहे. त्यामुळे एकीकडे लालाजी आणि त्यांच्या कार्यकर्त्यांचा अपमान करायचा आणि दुसरीकडे त्यांच्याच नावाने मतं मागायची, असं चित्र दिसू शकते. अकोल्यात भाजपने कोणताही विकास केल्याचे दिसत नाही. भाजपचे उमेदवार विजय अग्रवाल यांना पक्षातून आणि संघाकडून प्रचंड विरोध आहे. त्यामुळे नरेंद्र मोदी हे फक्त आणि फक्त हिंदुत्वाच्या मुद्द्यावर अकोल्यात प्रचार करताना दिसू शकतात. याच मुद्द्यावर योगी आदित्यनाथ आहे प्रचारसभा घेतील, असं सांगितलं जात आहे. त्यामुळे मोदी यांच्या सभेनंतर वंचित बहुजन आघाडीच्या पाठिंबा निर्णायक ठरणार आहे.
वंचित बहुजन आघाडी दलित मतं कोणत्या उमेदवाराकडे वळवते याची उत्सुकता सर्वांना आहे. सध्याच्या परिस्थितीमध्ये अकोला जिल्ह्यातील भाजप प्रचंड घाबरलेली आहे. त्यांचे पदाधिकारीच त्यांचा साथ सोडून जात आहे. हिंदुत्ववादी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी भाजपच्या विरोधात उमेदवारी अर्ज दाखल केला. हा अर्ज भलेही रद्द झाला, पण हिंदुत्ववादी संघटनांचा भाजपला विरोध आहे हा संदेश यातून गेला. भाजपचे अनेक नगरसेवक प्रचारापासून दूर आहेत. त्यामुळे स्थानिक नेत्यांच्या वागणुकीची फळ आता त्यांना मिळत आहेत. अशा परिस्थितीत नरेंद्र मोदी यांनी चुकीच्या लोकांना पाठीशी घालू नये, अशी अपेक्षा भाजपच्या स्थानिक कार्यकर्त्यांकडून व्यक्त होत आहे.