BJP : राज्याचे उपमुख्यमंत्री व नागपूर दक्षिण-पश्चिमचे भाजपचे उमेदवार देवेंद्र फडणवीस यांच्याकडे राज्याची जबाबदारी असल्यामुळे प्रचाराचा नवा फंडा त्यांच्या कार्यकर्त्यांनी शोधून काढला आहे. भाजपचे पदाधिकारी घरोघरी जाऊन मतदारांपर्यंत त्यांचे पत्र पोहोचवत आहेत. या पत्राच्या माध्यमतूान फडणवीस मतदारांशी संवाद साधून त्यांना राज्य सरकारच्या कामांची माहिती देत आहेत.
नागरिकांचा प्रतिसाद
मंगळवारी आयोजित करण्यात आलेल्या रोड शोला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्यावर आता भाजप कार्यकर्त्यांनी घरोघरी जाऊन फडणवीस यांनी मतदारसंघात केलेल्या विकासकामांची माहिती देण्याची मोहीम हाती घेतली आहे. मतदारसंघात वस्तीनिहाय ही मोहीम सुरू करण्यात आली असून, कार्यकर्ते घरोघरी जाऊ मतदारांच्या भेटीगाठी घेत आहेत. फडणवीस यांनी या पत्रात मतदारांशी संवाद साधताना मतदारसंघात केलेल्या विविध कामांची माहिती दिली आहे.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या मार्गदर्शनात आणि सहकार्याने मागील दहा वर्षांत नागपूरकरांनी शहरात क्रांतिकारक बदल अनुभवला असल्याचा उल्लेख फडणवीस यांनी या पत्रात केला आहे. या काळात नागपुरात एम्स, आयआयएम, ट्रिपल आयटी, नॅशनल लॉ युनिव्हर्सिटी, सिम्बॉयसिस यांसारख्या अनेक नामांकित संस्था नागपुरात आल्या. नागपूर मेट्रोचा पहिला टप्पा पूर्ण होऊन दुसऱ्या टप्प्याचे काम प्रगतिपथावर आहे. मिहानमध्ये अनेक नामांकित कंपन्या दाखल झाल्या असून, त्यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष रोजगार उपलब्ध होत आहेत. प्रत्यक्ष विमानतळाच्या आधुनिकीकरणाचे कामही साकार होत आहे.
नागपुरात तब्बल एक लाख कोटींची विकासकामे होत असून, झोपडपट्टीवासीयांना मोठ्या प्रमाणात मालकी हक्काचे पट्टे देण्यात आले. मेयो-मेडिकलच्या आधुनिकीकरणाचा कार्यक्रम हाती घेण्यात आला. पवित्र दीक्षाभूमीसाठी २०० कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला. याशिवाय शहरात विकासाची इतर महत्त्वाचे प्रकल्पही सुरू आहेत, याकडे फडणवीस यांनी या पत्रातून नागरिकांचे लक्ष वेधले आहे.
आघाडी कायम राखण्याचे आव्हान!
2014च्या निवडणुकीत फडणवीस यांना 58942 मतांची आघाडी मिळाली होती. 2019 मध्ये ही आघाडी 49344 पर्यंत घसरली. पहिल्या निवडणुकीत गुडधे आणि नंतर आशीष देशमुख त्यांच्या विरोधात होते. यंदा 50 हजारांची आघाडी कायम राखण्याचे आव्हान त्यांच्यापुढे आहे.