Vysanmukti Sangathan : 84 लक्ष योनींमध्ये सर्वश्रेष्ठ योनी मानव आहे. बाकी सर्व योनींतले प्राणी व्यसन करत नाही. वाघ कधी दारू पीत नाहीत. मद्य प्राशन करत नाहीत. पण श्रेष्ठ योनीतला मानव मात्र दारू पितो, असे सांगत राज्याचे वन, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री आणि चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यसनाधीनतेवर मोठं भाष्य केलं.
चंद्रपूर जिल्ह्यातील पोंभुर्णा येथे मुनगंटीवार व्यसनमुक्ती संघटनेच्या कार्यक्रमाला संबोधित करत होते. ते म्हणाले, देवानं सांगितलं की, द पासून मी दूध जन्माला घातलं. तू दूध पी. द पासून देवाची श्रद्धेने भक्ती कर. तुझं आयुष्य सुखा समाधानात, आनंदात जाईल. पण लोक दुधही घेत नाही आणि देवाची भक्तीही करत नाही. तर द फॉर दारू पितात आणि आपला संसार उघड्यावर आणतात. व्यसनमुक्तीसाठी कार्य करणाऱ्या संघटनांचे खरंच कौतुक केले पाहिजे, असं ते म्हणाले.
मी अशा भट्ट्या पाहिल्या की, सकाळी सहा वाजतापासून तेथे दारू पिणाऱ्यांच्या रांगा लागतात. द पासून देशी जेव्हा पोटात जाते, तेव्हा द पासून सुरू होणारा दानव आपल्या हृदयात शिरकाव करतो आणि मग तो विध्वंसक होतो. त्यामुळे व्यसनमुक्तीची चळवळ व्यापक करण्याची गरज आहे. व्यसन असावं, पण ते कुटुंबाच्या सेवेचं असावं. भुकेल्यासाठी आपल्या पोटाला चिमटा घेऊन आपली एक पोळी त्याच्या ताटात टाकण्याचं व्यसन असावं. मुलीच्या शिक्षणासाठी पै पै वाचवण्याचं व्यसन असावं, असं मुनगंटीवार म्हणाले.
‘ते’ लोक सोन्याच्या पाटावर
आज व्यसनी लोक आणि त्यांच्या व्यसनाला प्रोत्साहन देणारे सोन्याच्या पाटावर बसतात, हे आपलं दुर्दैव आहे. मी शेषराव महाराजांच्या त्या गावात जाऊन आलो. तेथील गर्दी बघीतली. तेथे टाटा, बिर्ला, अंबानी नव्हते, तर कष्टकरी लोक होते. महाराज विचारायचे की तुम्ही व्यसनमुक्त झाले का? तेव्हा गर्दीतील काही हात वर व्हायचे. तेव्हा मनापासून आनंद व्हायचा,’ अश्या भावना त्यांनी व्यक्त केल्या.
Sudhir Mungantiwar : सुधीर मुनगंटीवार यांच्या कामांचे विरोधी पक्षनेत्यांनाही आकर्षण !
एका व्यसनमुक्ती संमेलनात बघितलं की, एका माणसाचा चेहरा व्यसनी माणसाच्या चेहऱ्यासारखा झाला होता. पण त्याने सांगितलं की मी एकेकाळी व्यसनी होतो. माझ्या कुटुंबाला मी खूप त्रास दिला. पण आता मी व्यसनमुक्त झालो आहे. माझी मुलगी एमबीबीएसच्या द्वितीय वर्षाला आहे. याचा मला सार्थ अभिमान आहे. तेव्हा व्यसनमुक्ती संघटनांच्या कार्याची महती पटली, या शब्दांत त्यांनी कौतुक केले.
व्यसमुक्तीच्या गाड्या वाढाव्या
व्यसमुक्तीचे कार्य करणाऱ्या तुम्हासारख्या लोकांसोबत मी पूर्ण शक्तीनिशी उभा आहे. येथे अनिल डोंगरे व त्यांची सर्व टीम खूप मेहनत करत आहे. कधी कधी असं वाटतं की, 100 अॅम्बूलन्स कमी झाल्या आणि व्यसनमुक्तीच्या गाड्या वाढल्या तर अधिक चांगले होईल. कारण मग अॅम्ब्यूलन्सची गरजही कमी होऊन जाईल. कारण लोकांचे लिव्हर खराब होणार नाही. लोक आजारी जास्त पडणार नाहीत. दारूने फक्त लिव्हरच खराब होतं, असं नाही. तर हृदयही खराब होतं आणि बुद्धीही खराब होते, असंही मुनगंटीवार यांनी नमूद केलं.
प्रस्ताव
विधानसभेत चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदी करण्यासाठी मी जेव्हा सभागृहात प्रस्ताव मांडला. तेव्हा समोरच्या मंत्र्यांचीही जास्त काही विचारण्याची हिंमत झाली नाही. कारण मी एकच प्रश्न मंत्री महोदयांना केला की, तुमचा मुलगा, मुलगी रोज दारू पीत असेल तर तुम्हाला कसं वाटेल? तुमच्या आईला माहिती पडलं की तुम्ही रोज पिता. तर आई रागावल्याशिवाय राहणार नाही. जे आईला आवडत नाही, जे समाजाला आवडत नाही, ते तुम्ही त्यांना करायला कशाला भाग पाडता? माझ्या प्रश्नावर मंत्री महोदय निरूत्तर झाले आणि नंतर लगेच प्रस्ताव मान्य झाला, असेही सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले.