मागील पाच वर्षांत विदर्भाच्या मुद्द्यावर फारसे आक्रमक न झालेल्या विदर्भवाद्यांना निवडणूकीच्या तोंडावर जाग आली आहे. विदर्भाची समस्या दर्शविणारे मुद्दे विदर्भवाद्यांनी उपस्थित केले आहेत. मात्र या विदर्भवाद्यांना जनतेतून समर्थन मिळत नसल्यामुळे हे केवळ स्वत:च्याच प्रसिद्धीसाठी पत्रपरिषदा घेतात की काय असा सवाल उपस्थित होत आहे.
महाविदर्भ जनजागरणचे संयाेजक नितीन राेंघे यांनी मंगळवारी पत्रपरिषदेत विदर्भाची समस्या दर्शविणारे 20 प्रश्न उपस्थित केले आहेत. विदर्भाचा अनुशेष 2.5 लाख काेटींवर गेला, सिंचनाचा अनुशेषही दूर झाला नाही आणि विदर्भातील तरुणांना नाेकऱ्याही मिळत नाही, मग गेल्या दहा वर्षांत विदर्भासाठी काय केले, असा सवाल विदर्भवादी संघटनांनी केला आहे.
विदर्भातील तरुणांना केवळ 4 ते 7 टक्के नाेकऱ्या मिळाल्या, मग नाेकऱ्यांसाठी काय केले, राज्यावरील कर्ज 7.4 लाख काेटींहून 8.5 लाख काेटींवर गेले, या कर्जातून विदर्भासाठी किती टक्के खर्च केले? गेल्या 10 वर्षांत विदर्भातील 11 जिल्ह्यांत किती व काेणते उद्याेग आणले व राेजगार निर्मिती केली, स्वतंत्र विदर्भ राज्याबाबत काय भूमिका आहे, विदर्भ वैधानिक विकास मंडळाच्या पुनरुज्जीवनासाठी काय उपाय केले, वीज प्रकल्प विदर्भात असताना विदर्भातील सामान्य ग्राहकांना व उद्याेगांना कमी पैशात वीज का दिली जात नाही, गाजावाजा केलेल्या मिहान प्रकल्पात किती उद्याेग आणले, किती तरुणांना नाेकऱ्या दिल्या या प्रश्नांचा यात समावेश आहे.
काेराडी येथील प्रस्तावित ऊर्जा प्रकल्प पुण्यात का स्थानांतरित केला जात नाही, तसेच प्रस्तावित रिफायनरी व पेट्राेकेमिकल्स काॅम्प्लेक्स, अमरावती येथील टेक्सटाईल पार्क, विदर्भात किती परकीय गुंतवणूक झाली, पर्यटन विकासाचे काय झाले, शैक्षणिक व आराेग्य सुविधा सुधारण्यासाठी काय केले, वन्यप्राण्यांच्या त्रासामुळे शेतकऱ्यांच्या नुकसानभरपाईसाठी काय उपाय केले, नमाे महाराेजगार मेळाव्यात किती तरुणांना कुठे नाेकऱ्या मिळाल्या, शेतमालाचे भाव आणि नवीन जिल्हे निर्मितीबाबत काय पावले उचलली, असे २० प्रश्नांची उत्तरे भाजप नेत्यांनी द्यावी, अशी मागणी राेंघे यांनी केली. यावेळी जनमंचचे प्रमाेद पांडे, व्ही कॅनचे दिनेश नायडू, भारतीय सेवा मंडळाचे राम आखरे, विदर्भवादी दिलीप नरवडीया आदी उपस्थित हाेते.