BJP : राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार हे सदासर्व काळ मतदारांच्या संपर्कात असतात. केवळ आपला मतदारसंघच नव्हे, तर पालकमंत्री म्हणून संपूर्ण जिल्ह्यातील कामांवर त्यांचे बारीक लक्ष असते. मंत्री म्हणून राज्यभरही त्यांच्या कामाची हीच पद्धत आहे.
गेल्या 30 वर्षांत त्यांनी एक परंपरा जपली आहे, ती म्हणजे निवडणुकीत प्रचाराची सुरूवात करताना ते मतदार यादीच्या अनुक्रमणिकेतील पहिल्या मतदाराचा आशीर्वाद घेतात. याही निवडणुकीत त्यांनी पहिल्या मतदाराचा आशीर्वाद घेतला. भटाळी पायली येथील पहिल्या बुथच्या पहिल्या मतदार आशा विकास अलोणे यांचा आशीर्वाद घेऊन मुनगंटीवार यांनी प्रचाराची सुरूवात केली. प्रचाराच्या शेवटच्या दिवशी यादीतील शेवटच्या मतदाराचा ते आशीर्वाद घेतील.
जनतेशी थेट संपर्क
आशा विकास अलोणे यांच्यासह शालिनी धर्मेंद्र अलोणे, सुगंधाबाई मेश्राम, शारदा भसारकर, योगेश अलोणे या मतदारांचेही आशीर्वाद मुनगंटीवार यांनी पहिल्या दिवशी घेतले. प्रत्येक मतदाराला मान दिला जातो आणि हे केवळ निवडणूक प्रचारासाठी नव्हे तर जनतेसोबत जिव्हाळ्याची नाळ त्यांनी जोडली आहे. जनतेशी थेट संपर्क हे मुनगंटीवार यांच्या यशाचे गमक आहे. त्यांच्या आजवरच्या कारकिर्दीत जनतेचे विचार आणि त्यांचे प्रश्न मुनगंटीवार यांच्यासाठी महत्वाचे राहिले आहेत.
आपल्या कार्यालयात एक विशेष पद्धत मुनगंटीवार यांनी सुरू केली आहे. लोकांचे निवेदन आल्यानंतर त्यावर तात्काळ काम सुरू केले जाते. त्या कामाची काय स्थिती आहे, याची माहिती वेळोवेळी संबंधितांना दिली जाते. काम झाल्यानंतरही त्यांच्या कार्यालयातून संबंधित व्यक्तीला कॉल केला जातो आणि पत्रही पाठवले जाते. त्यामुळे लोकांना 10 वेळा त्यांच्या कार्यालयाच्या चकरा माराव्या लागत नाहीत. सुधीर मुनगंटीवार यांना काम सांगून लोक बिनधास्त राहतात. ‘दिला शब्द केला पूर्ण’ हे नामाभिमान त्यांना जनतेने यामुळेच दिले आहे.
उपक्रम
सुधीर मुनगंटीवार ‘आवाज दो’ हा उपक्रम आता राबवणार आहेत. यामध्ये 10 टेलीफोन नंबरद्वारे लोकांना त्यांचे प्रश्न थेट मुनगंटीवार यांच्यापर्यंत पोहोचवता येणार आहेत. त्यामुळे नागरिकांना त्यांच्या कार्यालयापर्यंत जाण्याचीही पायपीट करावी लागणार नाही. या अभिनव तंत्रामुळे लोकांच्या समस्या अधिक जलद गतीने सोडवण्याचे काम करण्यात येणार आहे. निवडणूक प्रचारादरम्यान भटाळी गावाच्या पुनर्वसनाचा मुद्दा उपस्थित करण्यात आला आहे. त्यांनी गाव विकसीत करण्याचे आश्वासन जनतेला दिले आहे. यामध्ये स्थानिकांना रोजगार देण्याचीही ग्वाही मुनगंटीवार यांनी दिली आहे. ‘विरोधकांशी लढताना माझे अस्त्र केवळ जनतेचे प्रेम आहे’, असे ते मानतात. हेच त्यांच्या प्रत्येक लढाईतील बलस्थान ठरले आहे.