Assembly Election : वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर यांनी मंगळवारी (5 नोव्हेंबर) पक्षाचा निवडणूक जाहीरनामा पुण्यात प्रकाशित केला. आरक्षण बचाव हा वंचित बहुजन आघाडीचा प्रमुख नारा राहणार आहे. याशिवाय केजी पासून पीजीपर्यंत मोफत शिक्षण देण्याचे वचन वंचित बहुजन आघाडीने दिले आहे. महायुती सरकारकडून सुरू करण्यात आलेल्या लाडकी बहीण योजनेसारखीच योजना वंचित बहुजन आघाडी सरकार आल्यास देणार आहे. या योजनेतून महिलांना साडेतीन हजार रुपये दरमहा देण्यात येणार आहेत.
शेतीमालाला हमीभाव देण्याची ग्वाही देखील वंचित बहुजन आघाडीच्या जाहीरनाम्यात देण्यात आली आहे. आरक्षणासाठी जातनिहाय जनगणना करण्यात येणार आहे. याशिवाय सरकार आल्यास मोहम्मद पैगंबर बिल विधिमंडळात सादर करण्यात येणार आहे. सोयाबीन आणि कापसाची वेचणी करणाऱ्या लोकांना मनरेगामधून पाच हजार रुपयांचे अनुदान वंचित बहुजन आघाडीने देऊ केले आहे. 40 वर्षावरील पारलिंगी व्यक्तींना दर महिन्याला पाच हजार रुपयांची पेन्शन वंचित बहुजन आघाडी देणार आहे.
अनेक मुद्दे जाहीरनाम्यात
वंचित बहुजन आघाडीने आपल्या जाहीरनाम्याला जोशाबा असे नाव दिले आहे. याचा अर्थ ज्योतिबा, शाहू, आंबेडकर यांचा जाहीरनामा. बोगस आदिवासी दाखले रद्द करण्यात येतील. याशिवाय वंचित बहुजन आघाडीचे सरकार आल्यास मराठा आणि ओबीसी समाजाला स्वतंत्रपणे आरक्षण दिलं जाईल अशी ग्वाही प्रकाश आंबेडकर यांनी आपल्या जाहीरनाम्यात दिली आहे. नवीन उद्योगांना त्यांचे सरकार आल्यास अनुदानही दिले जाणार आहे. सुमारे 200 युनिट पर्यंतची वीज नागरिकांना मोफत देण्यात येणार आहे. ज्येष्ठ नागरिकांना 300 युनिट पर्यंतची मोफत वीज देण्यात येईल असे जाहीरनाम्यात नमूद आहे. यापूर्वी असा प्रयोग आम आदमी पार्टीने दिल्लीमध्ये केला होता.
मोफत धम्म सहल योजना
अंगणवाडी सेविका आणि आशा कर्मचाऱ्यांना राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा दर्जा वंचित बहुजन आघाडीने देऊ केला आहे. बौद्ध समाजातील अनुयायांसाठी मोफत धम्म सहल योजना वंचित बहुजन आघाडीचे सरकार आल्यास सुरू होणार आहे. बेरोजगारीची समस्या पाहता सुमारे दोन वर्षांपर्यंत तरुणाईला पाच हजार रुपयांपर्यंतचा भत्ता देण्याचे वचन वंचित बहुजन आघाडीने आपल्या जाहीरनाम्यात दिले आहे. प्रकाश आंबेडकर यांनी या जाहीरनाम्याला समतापत्र असे संबोधले आहे. समाजातील सर्वच घटकांना न्याय देण्याचे काम या जाहीरनाम्यातून करण्यात आल्याचं प्रकाश आंबेडकर यांनी स्पष्ट केलं. वंचितच्या राज्य उपाध्यक्ष दीपा पिंकी शेख जाहीरनामाच्या प्रकाशनवेळी उपस्थित होत्या.