Wealth : भारत देशात गरीबांची संख्या सर्वाधिक आहे. अजूनही असंख्य कुटुंबे कच्च्या बांधणीच्या लहान घरांत, झोपडपट्ट्यांमध्ये राहतात. हातमजुरीवर जीवन जगणारे कमी नाहीत. अल्पभूधारक, शेतमजूर, लहान सहान कामे करणारे यांची संख्याही लक्षणीय आहे. या घटकांसाठी सरकारने काही योजना सुरू केल्या आहेत. दारिद्रय रेषेखाली जीवन जगणा-या वर्गासाठी असणा-या योजनांव्दारे त्यांना आर्थिक मदतीचा हात दिला जातो.
महिन्याला पाचशे ते दिड हजार रुपये मदत दिली जाते. निराधार, दिव्यांग, विधवा महिला यांना फुल ना फुलाची पाकळी या स्वरूपात मदत दिली जाते. महागाईच्या काळात देण्यात येत असलेली ही मदत तुटपुंजी आहे. याच मायबाप जनतेच्या भरोशावर निवडून येऊन सुखाचे राजकारण करणारी नेते मंडळी मात्र श्रीमंतीचे नवनवीन उच्चांक गाठताना दिसतात. निवडणूक लढणा-या प्रत्येक उमेदवाराला आपल्या संपत्तीचे विवरण द्यावे लागते. आता जाहीर करण्यात आलेली माहिती बघून सामान्यजनांचे डोळे दिपून जातात.
कुतूहलाचा विषय..
या मंडळींजवळ अल्पावधीत इतकी संपत्ती कुठून आली, या महाभागांच्या उत्पन्नाचे नेमके स्त्रोत काय आहेत, हे कुणाला समजलेले नाही. विशेष म्हणजे या मंडळींची संपत्ती अल्पावधीत अनेक पटींनी कशी वाढते, हा कुतूहलाचा विषय ठरतो. अगदी दुष्काळी आणि कोरडवाहू भागातील लोकप्रतिनिधीसुध्दा अनेक कोटीत खेळणारे आहेत. लोकप्रतिनिधी, मंत्री ही बिरुदावली घेऊन वावरणारे अनेक मान्यवर कोट्यवधी रुपयांच्या संपतीचे मालक आहेत. इमले, वाडे, प्रशस्त टुमदार घरे, शेतीवाडी, बागबगिचे, महागड्या गाड्या, रग्गड संपत्ती, दागदागिने सारं काही त्यांच्याजवळ मुबलक आहे.
साक्षात लक्ष्मी माता प्रसन्न..
आपल्या सुंदर आणि संपन्न महाराष्ट्रातील नेते मंडळींवर साक्षात लक्ष्मी प्रसन्न आहे. शरद पवार, अजित पवार, उद्धव ठाकरे, राज ठाकरे, या कुटुंबाकडे असलेल्या संपत्तीची मोजदाद नाही. अलिकडेच राजकारणात प्रवेश करणारी त्यांची मुलेही कोट्यवधी रुपयांचे मालक आहेत. आजवर त्यांनी कोणता व्यवसाय केला, हे गुलदस्त्यातच आहे. मोठ्या कंपन्यांमध्ये भागिदारी, स्वतः उघडलेल्या व फक्त नफ्यात चालणा-या कंपन्यांचे चालक मालक असे अफलातून त्यांचे उद्योग आहेत. सर्वाधिक नफा मिळवून देणाऱ्या क्षेत्रात या सर्वांनी आपली स्वकष्टार्जित संपत्ती गुंतवली आहे. शेअर मार्केटमधील या सर्वांची गुंतवणूक अल्पावधीत श्रीमंत होण्याचे स्वप्न बाळगणाऱ्यांसाठी खचितच प्रेरणादायी ठरणारी आहे.
लाख शब्द हद्दपार..
राजकारणातील नेते मंडळींच्या शब्दकोषातून लाख हा शब्द केव्हाच ‘खाक’ झाला आहे. सर्व जण संपत्तीच्या बाबतीत कोटींच्या कोटी उड्डाणे घेत आहेत. अनेकांना हे भाग्य पिढीजात लाभले आहे. तर सर्व सुखात न्हाऊन निघालेली ही मंडळी आता राजकारणाच्या आखाड्यात उतरली आहे. त्यांना स्वतःसाठी काहीच नको, फक्त राजकारणातून समाजकारण साधायचे आहे.
समृद्ध धनसंपदा..
आता आपले तानाजी सावंत हे मंत्रीच बघा, त्यांची संपत्ती 281 कोटी रुपये आहे. मंगलप्रभात लोढा यांची संपत्ती पाच वर्षांत 11 टक्क्यांनी घसरली. तरीही ते श्रीमंतीच्या बाबतीत दुस-या क्रमांकावर आहेत. त्यांची संपत्ती 140 कोटी रुपयांच्या वर आहे. शेती आणि समाजसेवा करणारे आपले देवाभाऊ यांच्या संपत्तीत 56 टक्के तर अजितदादांच्या संपत्तीत 44 टक्क्यांनी वाढ झाली आहे. हसन मुश्रीफांची संपत्ती 34 तर छगन भुजबळ यांची संपत्ती 17 टक्क्यांनी वाढली आहे.
धनंजय मुंडे हे तर संपत्तीच्या वाढीत जादूगार ठरले आहेत. पाच वर्षांत त्यांच्या संपत्तीत 81 टक्के वाढ झाली आहे. अजितदादा 103 कोटी रुपये संपत्तीचे मालक आहेत. एकनाथ शिंदे, चंद्रकांत दादा पाटील, विखे पाटील, विजयकुमार गावित, गिरीश महाजन यांच्यासह अन्य काही मंत्री कोट्यवधीत खेळणारे आहेत. अशा भाग्यवंतांची यादी बरीच मोठी आहे. विदर्भातील कोरडवाहू शेतजमीन असलेल्या भागातील नेतेही धनसंपदेच्या बाबतीत समृद्ध आहेत.
मक्तेदारी सिध्द..
पूर्वी लक्षाधीश हा शब्द खूप भारदस्त वाटायचा. आता हा शब्द गरीब श्रेणीत गणला जावू लागला आहे. कोटी किंवा खोके या भारदस्त शब्दाला वजन प्राप्त झाले आहे. निवडणूक लढणारे सामान्य असून चालत नाही. सर्व बाबतीत परिपूर्ण उमेदवारांचा राजकीय पक्ष शोध घेतात. स्वबळावर निवडणूक लढण्याची क्षमता असणा-यांची चलती आहे. राजकारणाचा चेहरा मोहरा दिवसेंदिवस बदलत चालला आहे. श्रीमंतांनी तिथे आपली मक्तेदारी सिध्द केली आहे.