गडकरी कायम कंत्राटदार, अधिकाऱ्यांना धारेवर धरत असतात. कामाच्या गुणवत्तेमध्ये तडजोड केली किंवा अधिकाऱ्यांमुळे कामात दिरंगाई झाली तर गडकरी त्यांच्या खास शैलीत समाचार घेतात. अशाच एका मुद्यावर बोलताना प्रचार सभेत गडकरींचा मोर्चा कंत्राटदारांकडे वळला. यावेळी त्यांनी ‘महापालिकेतील कंत्राटदार मोठ्ठे बदमाश असतात’ असे म्हणताच टाळ्यांचा कडकडाट झाला. त्याला कारणही तसेच होते.
मध्य, पूर्व व दक्षिण नागपूरमधील भाजप उमेदवारांच्या निवडणूक कार्यालयाचे उद्घाटन झाले. यावेळी तिन्ही मतदारसंघांमध्ये गडकरींच्या सभा झाल्या. शहराचा कायापालट कसा झाला, याबद्दल बोलताना त्यांनी कचऱ्याच्या समस्येविषयी देखील सांगितले. ते म्हणाले, ‘पुढच्या पाच पिढ्यांपर्यंत एकही खड्डा पडणार नाही, असे काँक्रिटचे रस्ते नागपुरात झाले आहेत. पण महापालिकेचे कंत्राटदार मोठ्ठे बदमाश असतात. त्यांना मी सांगितलं ‘रस्त्यावर एकही खड्डा पडला तर याद राखा’. त्या भितीने का होईना उत्तम दर्जाचे रस्ते तयार झालेत.’
शहरात सॉलिड वेस्ट मॅनेजमेंटचा प्रश्न होता. कचरा आधी उचललाच जात नव्हता. आता कचरा भांडेवाडीला जात आहे. कचरा वेगळा केला जात आहे. आता ऑर्गॅनिक वेस्टपासून बायो सिएनजी व बायोएलएनजी निघत आहे. 28 टन बायो सीएनजी तयार होणार आहे. कचऱ्यापासून सीएनजीवर चालणाऱ्या गाड्या नागपुरात असतील. सहा महिन्यांच्या आत 30 ते 40 पम्प नागपुरात लागलेले दिसतील, असा दावाही गडकरींनी केला. त्याचवेळी पूर्व नागपुरात आधी जिथे कचऱ्याचे ढिगार असायचे त्या जागेवर आज सिम्बायोसिससारखी प्रतिष्ठित शिक्षण संस्था उभी आहे. लवकरच त्याच्या बाजुला नरसी मोनजी ही केजी टू पीजी शिक्षण देणारी संस्था देखील उभी होत आहे, याचाही त्यांनी आवर्जून उल्लेख केला.
पाण्यासाठी मोर्चे निघत नाहीत
‘नागपूर शहरातील पिण्याच्या पाण्याची समस्या सुटली आहे. पाण्यासाठी महापालिकेवर मोर्चे निघत नाहीत. आज 75 टक्के नागपूरकरांना बारा ते चोवीस तास पाणी मिळत आहे. नवीन 93 पैकी 83 जलकुंभ तयार झाले आहेत. आता नाग नदीच्या प्रकल्पात शहरातील ड्रेनेज सिस्टीम सुधारण्याचेही काम होणार आहे. याचा फायदा पश्चिम, दक्षिण-पश्चिम, दक्षिण, पूर्व आणि मध्य नागपूरला होणार आहे. नाले शुद्ध होतील आणि ड्रेनेजमध्ये पाणी अडकणार नाही, असेही गडकरी म्हणाले. नागपुरात मेट्रो आली, काँक्रिटचे रस्ते झाले, देशातील प्रतिष्ठित शिक्षण संस्था आल्या, आंतरराष्ट्रीय विमानतळ होत आहे, रेल्वे स्थानकांचा कायापालट होत आहे. शहरात उड्डाणपूल, अंडरपास झालेत, याचाही त्यांनी उल्लेख केला.