Politics in Maharashtra : महाविकास आघाडीमध्ये उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी काही जागांबाबत प्रचंड वाद झाला. या वादामागील वास्तविक कारणांपैकी एक कारण आता पुढं आलं आहे. महाविकास आघाडीमधील काही नेत्यांनी ‘द लोकहित’शी बोलताना यापैकी काही कारणांचा उलगडा केला. ज्या पक्षाचे जास्त आमदार त्या पक्षाचा मुख्यमंत्री, असा फार्मूला महाविकास आघाडी ठरला आहे. सद्य:स्थितीत काँग्रेसचे संख्याबळ जास्त दिसत असेल. त्यामुळे महाविकास आघाडीला यश मिळाल्यास काँग्रेसचा मुख्यमंत्री होईल, असं साऱ्यांनाच वाटत आहे. पण आघाडीला यश मिळाल्यास काँग्रेसकडून मुख्यमंत्रिपदासाठी सगळ्यात आघाडीवर असलेल्या एका नावाला आघाडीतील काही नेत्यांचा विरोध आहे.
विरोध असलेले हे नाव आहे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आमदार नाना पटोले यांचे. विदर्भासह राज्यातील अनेक काँग्रेस अनेक आमदारांनी नाना पटोले हे मुख्यमंत्री व्हावे यासाठी प्रचंड मोर्चेबांधणी केली आहे. मात्र पटोले यांचे नाव मुख्यमंत्रिपदासाठी चर्चेत आल्यानंतर शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसला चिंता लागली आहे. कोणत्याही दबावाला बळी न पडणारे, आणि स्वतःला योग्य वाटेल तेच करणारे नेते म्हणून नाना पटोले यांची ओळख आहे. पटोले मुख्यमंत्री झाल्यास ते आपल्या हिशोबाने काम करणार नाहीत, याची खात्री शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसला आहे.
जास्त चिंता
पटोले यांना मुख्यमंत्री पद मिळाल्यास ते महाविकास आघाडीमधील संख्या बळानुसार मंत्रिपदाचं वाटप करतील याची खात्री सगळ्यांना आहे. त्यामुळे महत्त्वाची सगळी खाती काँग्रेसकडे जातील, असं ठामपणे मानल्या जात आहे. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यास ते सर्वांना घेऊन चालणारे आहेत. विशेषत: राष्ट्रवादी काँग्रेससाठी ते मदतीचे ठरणारे आहेत. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष शरद पवार तूर्तास काही बोलत नसले तरी त्यांनाही नाना पटोले मुख्यमंत्री पदावर नकोसेच आहेत.
सद्य:स्थितीमध्ये राहुल गांधी यांच्याकडे नाना पटोले यांच्या शब्दाला प्रचंड वजन आहे. याची एक छोटे उदाहरण द्यायचे झाल्यास अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघाचे देता येईल. काँग्रेसच्या एका नेत्याचा डॉ. झिशान हुसेन यांच्यासाठी आग्रह होता. मात्र तरीही राहुल गांधी यांनी साजिद खान पठाण यांचे नाव ‘फायनल’ केले. यावरून राहुल गांधी यांच्याकडे कोणाची चलती आहे, ते स्पष्ट होते.
Assembly Election : ईव्हीएमच्या सुरक्षेत हलगर्जी; तिघे निलंबित
‘फिल्डिंग’चा प्रयत्न
महाविकास आघाडीमध्ये जागावाटपाच्या मुद्द्यावरून काँग्रेस आणि शिवसेनेत वाद झाला. त्यावेळी शिवसेनेकडून नाना पटोले यांची दिल्लीकडे तक्रार करण्यात आली. तक्रार करण्यापूर्वी शरद पवार यांचा सल्ला घेण्यात आला होता. मात्र पवार यांच्याकडून कोणताही तोडगा न निघाल्याने, अखेर दिल्ली दरबारी तक्रार करण्यात आली. विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला बहुमत मिळाल्यास नाना पटोले आणि उद्धव ठाकरे हेच दोन प्रमुख नेते मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत राहणार आहेत. त्यामुळे नाना पटोले यांचा पत्ता कापण्यासाठी आतापासूनच ‘फिल्डिंग’ लावली जात आहे.
षडयंत्र
आघाडीचे सरकार येऊन नाना पटोले हे मुख्यमंत्री झाल्यास विदर्भाला आणखी एक मुख्यमंत्री मिळेल, पण आपली कोणतीच कामं होणार नाहीत, याची जास्त भीती काही नेत्यांना सतावत आहे. त्यामुळे पटोले हे रेसमध्ये मागेच राहावे, असा प्रयत्न केला जात आहे. लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला यश मिळाल्याने नाना पटोले हे सध्या काँग्रेसच्या गळ्यातील ताईत झाले आहेत. त्यांनी सांगितलेली प्रत्येक गोष्ट दिल्लीमध्ये ऐकली जात आहे. याशिवाय विदर्भासह राज्यातील अनेक आमदारांचा पटोले यांच्या नावाला पाठिंबा आहे. काँग्रेस मधील अनेक नेत्यांनी आपण मुख्यमंत्री पदाचे दावेदार नाही, हे स्पष्ट केलं आहे. त्यामुळे सत्ता येण्यापेक्षा नाना पटोले रेस मध्ये पुढे निघू नये ही चिंता सध्या आघाडी मधील काही नेत्यांना आहे.