Chandrapur : लोकसभा निवडणुकीत विरोधकांच्या फेक नरेटिव्हने वातावरण दुषित केले. मतदारांमध्ये संभ्रम निर्माण करण्यात आला. पण आता फेक नरेटिव्ह चालणार नाही आणि जाती-पातीचे राजकारणही चालणार नाही. आता फक्त विकासाचा मुद्दा लोकांच्या मनात असेल, असा विश्वास राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री बल्लारपूर विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केला. ‘द लोकहित’शी त्यांनी खास बातचित केली.
मुनगंटीवार यांनी सहावेळी विधानसभा निवडणूक जिंकली आहे. यंदा त्यांनी सातव्यांदा उमेदवारी अर्ज दाखल केला. लोकसभा निवडणुकीत फेक नरेटिव्हच्या जोरावर काँग्रेसचा उमेदवार निवडून आला, मात्र आता तसे होऊ देणार नाही, असेही ते म्हणाले. ‘विधानसभा निवडणुकीतही विरोधकांकडून फेक नरेटिव्ह पसरवण्याची पूर्ण शक्यता आहे. पण आम्हाला सर्व माध्यमांचा वापर करून जनतेपर्यंत सत्य पोहोचविण्यासाठी आम्ही देखील सज्ज आहोत. चंद्रपूर जिल्ह्यात लोकसभा निवडणुकीमध्ये जातीचा मुद्दा चालला. पण आताही तो चालेल, असं अजिबात नाही. कारण आता विकास आणि स्थिर सरकार हेच दोन मुद्दे चालतील.’
लोकांच्या सोयीसाठी संवाद आणि संपर्क असा रथ तयार करतो आहे. यामध्ये लोकांच्या समस्या ऐकून त्या सोडवण्याच्या दिशेने प्रयत्न केले जातील, अशी माहिती देखील मुनगंटीवार यांनी दिली. पर्यटन, शेती, उद्योग, सेवा क्षेत्रामध्ये रोजगाराच्या अनेक संधी आहेत. त्यामुळे केपीएमजी कडून मी चंद्रपूर जिल्ह्याच मॅपिंग करून घेतलं आहे. सेवा जर द्यायची आहे तर ती उत्तमच असली पाहिजे, असं मी मानतो. त्यामुळे प्रत्येक काम मी जीव ओतून करतो, असंही मुनगंटीवार म्हणाले.
अजित पवार म्हणाले होते..
चंद्रपूरला जसं टाटा कॅन्सर हॉस्पिटल आहे, तसं माझ्या बारामतीमध्येही झालं पाहिजे, असं अजित पवार महाविकास आघाडीचे सरकार असताना म्हणाले होते. तेव्हा मला मनापासून आनंद झाला होता. एकेकाळी महाराष्ट्रातील मागास जिल्हा म्हणून ज्या भागाकडे बघितलं जायचं, आज तोच भाग विकासासाठी ओळखला जातो, अशी भावनाही मुनगंटीवारांनी व्यक्त केली.
निवडणूक न लढण्याची शपथ
मी जर बल्लारपूरला तहसील बनवले नाही, तर पुन्हा निवडणूक लढणार नाही, अशी शपथ घेतली होती. सुरुवातीला लोकांना ती गंमत वाटली पण नंतर मी ते खरं करून दाखवलं. त्यानंतर ‘दिला शब्द केला पूर्ण’, ‘विकासपुरुष’ असे नामाभिमान मला प्राप्त झाले, याचाही मुनगंटीवारांनी आवर्जून उल्लेख केला.
‘लोकहित’प्रमाणे लोकहितार्थ कामे
चंद्रपूर जिल्ह्यातील जनतेने आतापर्यंत सहावेळा मतदानरुपी आशीर्वाद दिले आहेत. यावेळीही जनता मला आशीर्वाद देईल. ‘लोकहित’ या नावाप्रमाणेच मी पुन्हा लोकहितार्थ कामे करण्यास सज्ज होईल,असे मुनगंटीवार म्हणाले.