Dispute Within Party : विधानसभा निवडणुकीची धावपळ सुरू असताना मनसेच्या नेत्या प्रशंसा अंबेरे यांच्या अकोल्यातील कार्यालयावर हल्ला झाला. मनसेचे पदाधिकारी अविनाश मुऱ्हेकर यांनी हा हल्ला केल्याची माहिती मनसेकडूनच देण्यात आली. या घटनेमुळं अकोल्याच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. प्रशंसा अंबेरे या मनसेच्या उमेदवार होत्या. अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघातून त्यांनी अर्ज दाखल केला होता. मात्र वयाच्या निकषात न बसल्यानं अंबेरे यांचा अर्ज निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी खारीज केला. अशातच गुरुवारी (31 ऑक्टोबर) सायंकाळच्या सुमारास त्यांच्या कार्यालयावर हल्ला झाला.
प्रशंसा अंबेरे यांचे कार्यालय जुने शहरातील शिवाजी नगर भागात आहे. अशात रात्री आठच्या सुमारास ही घटना घडल्याचं सांगण्यात येत आहे. हल्ला झाला त्यावेळी अंबेरे कार्यालयात नव्हत्या. दुचाकीवर आलेल्या हल्लेखोरांनी त्यांच्या कार्यालयातील टेबल, खुर्ची आणि काचा फोडल्याचं सांगण्यात येत आहे. घटनेची माहिती मिळताच डाबकी रोड पोलिस स्टेशनचा ताफा अंबेरे यांच्या कार्यालयात पोहोचला. विशेष म्हणजे अंबेरे यांचे कार्यालय डाबकी रोड पोलिस ठाण्याच्या मागेच आहे.
मनसैनिकांची धाव
अंबेरे यांच्या कार्यालयावर हल्ला झाल्याचं कळल्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी शिवाजी नगरात धाव घेतली. मनसेचे पदाधिकारी अविनाश मुऱ्हेकर यांनीच हा हल्ला केल्याचं अंबेरे यांच्या कार्यालयातून स्पष्ट करण्यात आलं. हल्ल्यानंतर या भागात मोठा जमाव एकत्र आला होता. पोलिसांनी बंदोबस्त वाढवत गर्दीवर नियंत्रण मिळविलं. त्यानंतर पोलिसांनी तपासाला सुरुवात केली. हल्लेखोरांचा शोध सुरू करण्यात आला. मु्ऱ्हेकर हे एकटे होते की त्यांच्यासोबत अन्य काही जण होते, याबद्दल अस्पष्टता आहे.
वादामुळं हल्ला
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतील पक्षांतर्गत वादामुळं हा हल्ला झाला, की अन्य काही कारण यामागे आहे हे अस्पष्ट आहे. प्रशंसा अंबेरे या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या महिला विभागाच्या जिल्हाध्यक्ष आहेत. अलीकडेच त्यांना मनसेकडून उमेदवारी देण्यात आली होती. घटनास्थळी पोहोचलेल्या मनसैनिकांनी ‘द लोकहित’ला सांगितले की, अंबेरे यांच्या कार्यालयातील काचांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे. संपूर्ण कार्यालयात फुटलेले काच पसरले. या हल्ल्याबाबत पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांना कळविण्यात येणार आहे. त्यानंतर काय करायचं हे ठरविण्यात येईल, असं स्पष्ट करण्यात आलं. हल्ल्यानंतर पोलिस घटनास्थळी दाखल झाले तरी तक्रार नोंदविण्याची प्रक्रिया सुरू झाली नाही, असं पोलिसांनी स्पष्ट केलं. या घटनेमुळं मनसेतील वाद उफाळल्याचं दिसत आहे.