रामटेकला राजेंद्र मुळक बंडखोरी करत आहेत. महाराष्ट्रात काय सुरू आहे हे चेन्नीथला यांना दिसत नाही काय? काँग्रेस उद्धव ठाकरेंना फसवत आहे. उद्धव ठाकरेंना काँग्रेस हिंदुत्वापासून दूर घेऊन गेले. हे सारं उद्धव ठाकरे कसं सहन करत आहेत. उद्धव ठाकरे दिल्लीत काँग्रेसच्या घरी जात राहिले. आता काँग्रेसने त्यांना बुडवलं आहे, अशी बोचरी टीका भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली.
आमच्यासोबत असताना उद्धव ठाकरे जास्त जागांवर लढायचे. त्यांचे उमेदवार पण मोठ्या संख्येने निवडून यायचे. आता ते काँग्रेस आणि राष्ट्रवादी (शरद पवार गट) सोबत आहेत. मात्र दोघांनीही त्यांना फसवलं आहे, असंही बावनकुळे म्हणाले. बावनकुळे गेल्या काही दिवसांपासून उद्धव ठाकरेंवर टीका करण्याची एकही संधी सोडत नाहीत.
राज्यात भाजपचं सरकार येणार आहे, असं राज ठाकरे म्हणाले होते. त्यावर बोलताना बावनकुळे म्हणाले, ‘राज ठाकरे यांनी त्यांची व्यक्तिगत भूमिका मांडली आहे. त्यांना भूमिका मांडण्याचा अधिकार आहे. राज ठाकरे यांच्या भावना सुरुवातीपासून भाजपसोबत आहेत. मात्र, महाराष्ट्रातील जनता निर्णय घेणार आहे, असंही बावनकुळे म्हणाले.
जरांगे यांचे सामाजिक आंदोलन आहे. या सामाजिक आंदोलनाला राजकारणाशी जोडू नये. सत्तेमधून समाजाला न्याय मिळतो. आमचे सरकार सर्वांनाच न्याय देणारे आहे, असंही बावनकुळे म्हणाले.
त्यांच्यावर कारवाई करू
परवा रात्री आमची बैठक झाली. देवेंद्र फडणवीस आणि राज्यातील निवडणूक संचालक समितीचे लोकही त्या बैठकीत होते. जिल्हाध्यक्षासह सर्वांना सूचना दिल्या आहेत. एका ठिकाणी एकच उमेदवार निवडणूक लढू शकतो. उमेदवारी अर्ज दाखल करणाऱ्या भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी बंडखोरी करू नये. त्यांनी उमेदवारी मागे घ्यावी, असे आवाहन आम्ही केले आहे, असेही बावनकुळे म्हणाले. पक्ष हा आईसारखा आहे. त्यामुळे पक्षावर श्रद्धा ठेव्हावी. पक्ष सर्वांचं भलं करेल, असंही बावनकुळे म्हणाले. पण, उमेदवारी मागे घेतली नाही तर पक्ष 100 टक्के कारवाई करेल, असा इशाराही त्यांनी दिला आहे.
देशमुखांना काय झालय?
अनिल देशमुख वारंवार तेच तेच का बोलतात, मला कळत नाही. प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. मग बोलण्याचं काय कारण? आता महाविकास आघाडीचा काय अजेंडा आहे, असा सवाल मला त्यांच्या नेत्यांना विचारायचा आहे, असंही बावनकुळे म्हणाले. त्याचवेळी त्यांनी सकाळचे टोमणे बंद करा, असा टोलाही त्यांनी संजय राऊत यांना लगावला.
देशमुखांना तुरुंगात खूप वेळ होता
अनिल देशमुख यांचे ‘डायरी ऑफ ए होम मिनीस्टर’ हे पुस्तक सध्या खूप गाजत आहे. विशेषतः देवेंद्र फडणवीस यांच्यावरील आरोपांमुळे देशमुखांचे पुस्तक चर्चेत आहे. या पुस्तकाविषयी बावनकुळेंना विचारले असता त्यांनी ‘देशमुखांना तुरुंगात खूप वेळ होता म्हणून त्यांनी डायरी लिहिली’ असा टोला लगावला.