Less Headache To Leaders : विधानसभा निवडणुकीतील रंगत आता वाढली आहे. उमेदवारांची नावं जाहीर झाल्यानंतर राज्यभरातील सर्वच पक्षांमध्ये बंडांनी झेंडा गाडला आहे. बंडखोरीमुळं महायुती (Mahayuti) आणि महाविकास आघाडीसमोर अनेक ठिकाणी पेचप्रसंग निर्माण झाला आहे. त्यामुळे अनेक मतदारसंघांमध्ये सध्या महायुती आणि महाविकास आघाडी ‘डॅमेज कंट्रोल’ करण्यावर भर देत आहे. या साऱ्या धावपळीत मात्र यवतमाळ जिल्हा महायुती आणि महाविकास आघाडीसाठी कमी डोकेदुखी देणारा जिल्हा ठरत आहे.
यवतमाळ जिल्ह्यातील सर्वच मतदारसंघांमध्ये उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहे. एखादा अपवाद वगळता जिल्ह्यात राजकीय वातावरण शांत आहे. यवतमाळ जिल्ह्यातून विद्यमान मंत्री संजय राठोड, माजी मंत्री माणिकराव ठाकरे, जितेंद्र शिवाजीराव मोघे, मदन येरावार, डॉ. अशोक उईके, इंद्रनिल नाइक, राजू तोडसाम आदी रिंगणात आहेत. माजी मंत्री वसंत पुरके यांनाही काँग्रेसनं निवडणुकीच्या रिंगणात उतरविले आहे. मात्र असं असतानाही महायुती किंवा महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) यापैकी कुठेही बंडखोरी, विरोध, कटकारस्थानं असं फारसं दिसत नाही.
नेत्यांना ‘नो टेन्शन’
यवतमाळ जिल्ह्याच्या बाबतीत महायुती आणि महाविकास आघाडीतील नेत्यांना सध्या ‘नो टेन्शन’ आहे. स्थानिक पातळीवरील नेते वेगवेगळी परिस्थिती हाताळण्यास सक्षम असल्यानं महायुती आणि महाविकास आघाडीमधील नेत्यांचं मत आहे. त्यामुळे यवतमाळ जिल्ह्यात सध्या तरी राजकीय शांतता आहे. प्रचार सुरू झाला आहे. पण दिवाळीनंतर प्रचाराची खरी आतिशबाजी सुरू होणार आहे. त्यामुळे सध्या यवतमाळ जिल्ह्यातील प्रचाराची गती मंद आहे. दिवाळीनंतर आणि उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत संपल्यानंतर खरी रणधुमाळी सुरू होणार आहे. सध्या जिल्ह्यातील राजकीय वातावरण शांत आहे. यात फारसं वातावरण तापेल असं चित्र सध्या तरी नाही. त्यामुळे उमेदवार, राजकीय पक्ष आणि पक्षातील वरिष्ठ यवतमाळच्या बाबतीत निश्चिंत आहेत.
लोकसभा निवडणुकीच्या काळात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यवतमाळ जिल्ह्यात सभा घेतल्या. यापूर्वीही त्यांनी यवतमाळ जिल्ह्यावर ‘फोकस’ केले होते. पहिल्यांदा पंतप्रधानपदाचे उमेदवार असताना नरेंद्र मोदी यांनी यवतमाळ जिल्ह्यातच ‘चाय पे चर्चा’ केली होती. त्यानंतर देशभरातील शेतकऱ्यांनी त्यांना पाठिंबा दिला. मात्र पदरी निराशा पडल्याचं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे. त्याचा परिणाम लोकसभा निवडणुकीत दिसून आला. विधानसभा निवडणुकीतील गणितं आणि समीकरणं वेगळी असतात. त्यामुळे यवतमाळ जिल्ह्यात वेगवेगळ्या मुद्द्यांच्या आधारावर महायुती आणि महाविकास आघाडीला प्रचार करावा लागणार आहे. अशात मतदार कोणाला कौल देतात, याकडं यवतमाळकरांचं लक्ष लागलं आहे.