Assembly Election : एमआयएम हा अप्रामाणिक पक्ष आहे. त्यांनी आमच्यासोबत असलेल्या युतीतून पळ काढला. गेल्या लोकसभा निवडणुकीत ‘वंचित’ आणि एमआयएमची युती होती. 2019 पर्यंत आमच्याबरोबर अनेक ओबीसी संघटना होत्या. मात्र तेव्हाही एमआयएम प्रामाणिक नव्हता. त्यांनी पळ काढला. त्यामुळे आता आमचे मुस्लिम बांधवाशी थेट संबंध आहेत. त्यामुळे अल्पसंख्याकांपर्यंत पोहोचण्यासाठी आम्हाला इतर पक्षांची गरज नाही. वंचित बहुजन आघाडीने विधानसभा निवडणुकीत 20 मुस्लिम उमेदवारांना संधी दिली आहे. एमआयएम आणि काँग्रेस तर यापेक्षा कितीतरी पट मागे असल्याची प्रतिक्रिया वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केली.
गेल्या 70 वर्षांत मुस्लिमांना पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणात प्रतिनिधित्व मिळाले असल्याचे आंबेडकर म्हणाले. हे प्रतिनिधित्व देणारी केवळ वंचित बहुजन आघाडी असल्याचं त्यांनी नमूद केलं. यंदाची निवडणूक मनोज जरांगे पाटील आणि वंचित बहुजन आघाडीमध्ये होणार आहे. जरांगे पाटील यांनी ओबीसी प्रवर्गातून मराठा आरक्षण मिळावे म्हणून आंदोलन सुरू केले आहे. ओबीसींकडून याला विरोध केला जात आहे. त्यामुळे राज्यात दोन गट तयार झाले आहेत. मराठा ओबीसींना मतदान करणार नसल्याचे सांगतात. ओबीसी मराठा उमेदवारांना मतदान करणार नाहीत. अशात मनोज जरांगे पाटील यांची भूमिका महत्वाची राहणार असल्याचं आंबेडकर म्हणाले.
संविधान संरक्षण गरजेचे
संविधानाच्या रक्षणासाठी लोकसभा निवडणुकीत मुस्लिम आणि दलित मतदारांनी महाविकास आघाडीला मतदान केले. लोकसभा निवडणुकीवेळी संविधान बचावासाठी मतदारांनी महत्त्व दिले. यंदाची निवडणूक आरक्षण बचावसाठी आहे. संविधान टिकेल तर आरक्षण टिकेल, असं ते म्हणाले. राहुल गांधी हे दुटप्पी आहेत. राहुल गांधी बोलतात एक आणि त्यांचा पक्ष करतो दुसरेच. सर्वोच्च न्यायालयाने अनुसूचित जातींच्या उपवर्गीकरणाला मान्यता दिल्यानंतर तेलंगणा आणि कर्नाटकने त्यासाठी समिती गठित केली. मात्र, दलित संघटनांचे यावर वेगळे मत असल्याचे ते म्हणाले.
सवर्ण पक्ष आणि काँग्रेस, भाजपा हे आरक्षणविरोधी पक्ष आहेत. त्यामुळे मुस्लिम आणि दलित मतदार पुन्हा आमच्याकडे वळतील, असा विश्वास प्रकाश आंबेडकरांनी व्यक्त केला. मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गात जागा देऊ नये, याला आमची प्राथमिकता असेल. सवर्ण समाजकडून ‘मेक इन इंडिया’चा नारा दिला जातो; पण आम्ही ‘बहुजन मेड इन इंडिया’बाबत आग्रही आहोत. बहुजनांमध्ये अनेक कुशल कारागीर आहेत. भारतात कशा प्रकारे उत्पादन वाढवायचे, याची त्यांना पूर्ण कल्पना आहे. त्यामुळे आम्ही भविष्यात रोजगारनिर्मितीच्या अनुषंगाने पावलं टाकू, असंही आंबडेकर यांनी सांगितले.