Assembly Election : अभिनेता अनिल कपूरचा मिस्टर इंडिया हा चित्रपट चांगलाच गाजला होता. या चित्रपटात अनिल कपूरच्या हातावर एक घड्याळ असते. त्या घड्याळीचे बटण दाबले की अनिल कपूर अदृष्य होतो. त्याला पाहण्यासाठी लाल रंगाचा चष्मा किंवा लाल प्रकाशाचा वापर करावा लागतो. असाच प्रकार सध्या वर्धा जिल्ह्यातील आर्वी मतदारसंघात सुरू आहे. आर्वी विधानसभा मतदारसंघातून देवेंद्र फडणवीस यांचे स्वीय सहाय्यक सुमित वानखेडे यांना भाजपने उमेदवारी दिली आहे. त्यानंतर उमेदवारी अर्ज दाखल करून आमदार दादाराव केचे ‘मिस्टर इंडिया’ झाले आहे. सध्या भाजपचे सगळेच नेते त्यांचा शोध घेत आहे. त्याला कारणही तसेच आहे. दादाराव केचे यांच्यासोबत थेट भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा बोलणार आहेत.
उमेदवारी मिळणार हे निश्चित
आर्वीत सक्रिय झाल्यापासूनच सुमित वानखेडे यांनाच उमेदवारी मिळणार हे निश्चित मानले जात होते. मात्र आमदार दादाराव केचे यासाठी तयार होत नव्हते. दादाराव केचे यांची नाराजी पत्करत भाजपने वानखेडे यांना उमेदवारी दिली. त्यानंतर दादाराव केचे हे संपर्क क्षेत्राच्या बाहेर गेले आहेत. ते देखील उमेदवारी अर्ज दाखल करून. केचे यांची समजूत काढण्यासाठी भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रशेखर बावनकुळे प्रयत्नांची पराकाष्ठा करीत आहेत. केचे यांना विधान परिषदेच्या आमदारकीची ऑफर देण्यात आली आहे.
रिक्त पदावर वर्णी
विधानसभा निवडणुकीनंतर विधान परिषदेच्या काही जागा रिक्त होणार आहेत. त्यामुळे दादाराव केचे यांना विधान परिषदेवर घेण्यात येईल, असा शब्द भाजपकडून देण्यात आला आहे. प्रसंगी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा हे देखील केचे यांना शब्द द्यायला तयार झाले आहेत. त्यामुळे भाजप अखेरच्या क्षणापर्यंत दादाराव केचे यांच्या मनधरणीचा प्रयत्न कायम ठेवणार आहे. त्यासाठी भाजपच्या वर्धा जिल्ह्यातील सर्वच नेत्यांना कामाला लावण्यात आले आहे. भाजपचे सगळे पदाधिकारी आणि सुमित वानखेडे यांचे नीकटवर्तीय सध्या केचे यांचा ठावठिकाणा शोधत आहेत.
दादाराव केचे यांनी उमेदवारी
सुमित वानखेडे यांच्या विरोधात दादाराव केचे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. वानखेडे यांचा विजय सोयीस्कर व्हावा, यासाठी दादाराव केचे यांना संघाचे शिस्त, त्याग, समर्पण असे शब्द आठवून देण्यात येत आहेत. केचे हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सच्चे व्यक्ती आहेत. त्यामुळे त्यांना भाजप वाऱ्यावर सोडणार नाही, अशी भावनिक ग्वाही त्यांना देण्यात आली आहे. मात्र उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर केचे अज्ञातवासात गेल्यानं भाजपच्या अडचणीत वाढ झाली आहे. पाच दिवसात हा तिढा सोडविण्याचे आव्हान आता भाजपपुढे आहे.