Public Meeting : विधानसभेची निवडणूक जिंकण्यासाठी भाजपने जय्यत तयारी केली आहे. महायुतीकडे विजय खेचण्यासाठी स्टार प्रचारक आणि त्यांच्या सभा यांच्या वेळापत्रक तयार करण्यात आला आहे. या वेळापत्रकात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या केवळ आठ सभा महाराष्ट्रात होणार आहेत. सर्वाधिक प्रचार सभा या केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या होतील. गडकरी यांच्या मदतीशिवाय निवडणूक जिंकणे जवळपास अशक्य आहे हे आता भाजपला कळले आहे. त्यामुळे गडकरी यांच्या सर्वाधिक 40 सभांचे नियोजन करण्यात आले आहे.
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा महाराष्ट्रात 20 सभा घेणार आहेत. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या 15 सभांचे नियोजन तयार करण्यात आले आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे 50 प्रचार सभा घेणार आहेत. प्रदेशाध्यक्ष असल्याने आमदार चंद्रशेखर बावनकुळे हे देखील 20 सभा घेणार आहेत. गोवा, मध्य प्रदेश, हरियाणातील मुख्यमंत्री देखील महाराष्ट्र पिंजून काढणार आहेत. त्यामुळे दिवाळीनंतर लगेचच राज्यभरामध्ये भाजपच्या स्टार प्रचारकांच्या सभांचा धुराळा उडणार आहे. ज्या मतदारसंघांमध्ये भाजपचा विजय हा प्रतिष्ठेचा मुद्दा असेल, त्याच मतदारसंघात मोदी आणि शहा सभा घेणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
मोठ्या प्रमाणावर रॅली
यंदाच्या निवडणुकीत भाजपने मोठ्या प्रमाणावर प्रचार रॅलींचे नियोजन केले आहे. याशिवाय सोशल माध्यमांवरील प्रचारावरही जोर देण्यात येणार आहे. मोदी आणि शहा यांच्या सभांसाठी जितके बारकाईने नियोजन भाजप करत आहे तितकेच सूक्ष्म नियोजन नितीन गडकरी यांच्या सभांबाबतही करण्यात येत आहे. लोकसभा निवडणुकीत नितीन गडकरी वगळता भाजपच्या एकाही खासदाराला स्वबळावर विजय मिळवता आला नाही. या उलट विदर्भामध्ये काँग्रेसची ताकद चांगलीच वाढली. त्यामुळे भाजपने सावधपणे पाऊल टाकण्यास सुरुवात केली. भाजपचे अनेक नेते नितीन गडकरी यांच्याकडे पोहोचले. संपूर्ण एक महिना त्यांनी महाराष्ट्रातील सभांसाठी द्यावा अशी विनंती भाजपच्या नेत्यांनी गडकरी यांना केली. त्यानुसार आता गडकरी यांनी सर्वांसाठी वेळ दिला आहे.
लोकसभा निवडणुकीतील निकाल पुढे आल्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जबाबदारी स्वीकारून राजीनामा देऊ केला होता. मात्र भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने त्यांना कायम ठेवले. आता महाराष्ट्राच्या विधानसभेची संपूर्ण जबाबदारी देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावरच आहे. त्यामुळे विजय खेचून आणण्यासाठी महाराष्ट्र भाजपची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. निवडणुकीपूर्वी महायुतीच्या सरकारने अनेक योजनांची घोषणा केली. त्यातून भाजपसाठी किती पोषक वातावरण तयार झाले, याचा ठाम दावा अद्यापही कोणी करू शकत नाही. अशात भाजपचे स्टार प्रचारक आता महाराष्ट्र पिंजून काढत मतदारांचा विश्वास संपादन करण्याचा पूर्ण प्रयत्न करणार आहेत.