Yuva Swabhiman Party : लोकसभा निवडणुकीत नवनीत राणा यांना पराभूत करूनच उसंत घेणाऱ्या विरोधकांनी पुन्हा एकजूट केली आहे. विधानसभा निवडणुकीत रवी राणा हे या सर्व विरोधकांचे टार्गेट आहेत. राणा दाम्पत्याचा अमरावती जिल्ह्यातील सर्वच राजकीय नेत्यांशी वाद आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीप्रमाणे विधानसभा निवडणुकीतही राहणार एकाकी लढणार आहेत. बडनेरा विधानसभा मतदारसंघातून राणा यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. युवा स्वाभिमान पक्षातर्फे त्यांनी हा अर्ज दाखल केला आहे.
पाना हे चिन्ह..
निवडणूक आयोगाने राणा यांच्या युवा स्वाभिमान पक्षाला पाना हे चिन्ह दिले आहे. मात्र विरोधकांनी एकजूट करीत राणा यांचेच ‘नट-बोल्ट’ कायमचे फिट करण्यासाठी मोर्चेबांधणी केली आहे. भाजपचे पदाधिकारी तुषार भारतीय यांनी राणा यांच्या विरोधात उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. भाजपमधील बहुतांश नेत्यांचा राणा दाम्पत्याला प्रखर विरोध आहे. माजी मंत्री प्रवीण पोटे, तुषार भारतीय, प्रभुदास भिलावेकर यांच्यासह अनेकांचा समावेश आहे. शिवसेनेतून माजी खासदार आनंदराव अडसूळ आणि त्यांचे सुपुत्र माजी आमदार अभिजीत अडसूळ हे राणा यांचे कट्टर विरोधक आहे.
राष्ट्रवादीशीही पटेना
राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाशीही राणा यांचे मतभेद आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे अमरावती जिल्ह्यातील महत्त्वाचे नेते संजय खोडके आणि त्यांच्या पत्नी तथा विद्यमान आमदार शिल्पा खोडके यांचे देखील राणा दांपत्याशी बिनसले आहे. आतापर्यंत महायुती सोबत असलेले प्रहार जनशक्ती पार्टीचे आमदार बच्चू कडू हे तर राणांचा प्रचंड राग करतात. दिवसा मतदारसंघाच्या काँग्रेस आमदार तथा माजी मंत्री यशोमती ठाकूर आणि राणा यांच्यातून विस्तवही जात नाही. या प्रमुख नेत्यांचं दुसऱ्या आणि तिसऱ्या फळीतील अनेक नेत्यांची राणा यांच्या वाद आहे. त्यामुळे राणा दांपत्याची राजकीय कारकीर्द संपवण्याचा विडा अनेकांनी उचलला आहे.
भाजपने महायुतीमधील प्रत्येकाचा विरोध असतानाही नवनीत राणा यांना पक्षात घेतले. त्यांना लोकसभेसाठी उमेदवारी दिली. या कृतीतून भाजपने आपल्याच हाताने आपल्याच पायावर कुऱ्हाड मारून घेतली. राणाविरोधक असलेल्या सगळ्यांनी एकत्र येत नवनीत राणा यांना पराभूत करूनच दम घेतला. आता अशीच व्यूहरचना रवी राणा आणि त्यांच्या उमेदवारांबाबत सुरू आहे.
मोठा परिणाम..
राणा आणि त्यांच्या पक्षातील सगळेच उमेदवार पराभूत झाल्यास त्यांच्या राजकीय वाटचालीवर मोठा परिणाम होईल हे सगळ्यांनाच ठाऊक आहे. त्यामुळे सगळेच राहणार विरोधक पुन्हा एकदा एकत्र आले आहेत. लोकसभा निवडणुकीपूर्वी राणा दांपत्याने मोठ्या प्रमाणावर प्रचार, प्रसार आणि खर्च केला. त्यानंतरही नवनीत राणा पराभूत झाल्या. आता असाच जोर रवी राणा हे बडनेरा विधानसभा मतदारसंघात लावत आहेत. मात्र राणा यांनी घेतलेले पंगे अनेकांनी अत्यंत ‘पर्सनली’ घेतल्याने एक वेळ आपण पराभूत झालो तरी चालेल पण रवी राणा विजय व्हायला नको असा प्रयत्न सगळ्यांकडूनच केला जात आहे. त्यामुळे राणा आपला ‘पाना’ वापरत कोणकोणते ‘नट-बोल्ट’ वाचवतात हे पाहण्यासारखे ठरणार आहे.