War To Win Mantralaya : महाराष्ट्रातील सत्ता काबीज करण्यासाठी महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये चढाओढ सुरू आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत संपली आहे. अशात बंडखोरांना शांत करण्याचे आवाहन महायुती आणि महाविकास आघाडी पुढे आहे. येत्या पाच दिवसात महाविकास आघाडी आणि महायुती दोन्ही मधील नेत्यांना बंडखोरी शांत करण्यासाठी दिवस रात्र एक करावा लागणार आहे. महाविकास आघाडीच्या तुलनेत महायुतीमध्ये बंडखोरांची संख्या अधिक आहे. यात सगळ्यात जास्त ताकद लावावी लागणार आहे ती भारतीय जनता पार्टीला.
महायुती आणि महाविकास आघाडीमधील घटक पक्षांचा विचार केला तर भाजपमधील बंडखोरांची संख्या काहीशी जास्त आहे. पक्षातील काहींनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. काहींनी भाजपमधून बाहेर पडत अन्य पक्षात प्रवेश केला आहे. त्यामुळे असलेली सत्ता टिकवून ठेवण्यासाठी भाजपला सर्वाधिक प्रयत्न करावे लागणार आहेत. त्यानंतर शिवसेना प्रमुख तथा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा कस लागणार आहे. शिवसेनेतील काही नेते नाराज आहेत. ऐन दिवाळीमध्ये या नेत्यांची तोंड गोड करण्याचे काम शिंदे यांना करावे लागणार आहे.
दादांचा टेन्शन कमी
तुलनात्मक दृष्ट्या पाहिल्यास राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांना थोडं टेन्शन कमी आहे. त्यांच्या पक्षातील नाराज आणि बंडखोरांची संख्या कमी आहे. महाविकास आघाडीमध्ये सारचं काही व्यवस्थित आहे, असं नाही. जागा वाटपावरून काँग्रेस आणि शिवसेनेमध्ये वाद झाला. त्यानंतर शिवसेनेच्या काही नेत्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केली आहेत. या लढतीला मैत्रीपूर्ण असे नाव देण्यात आले असले तरी राजकारणात कोणी कोणाचा मित्र आणि कोणी कोणाचा शत्रू नसतो. निवडणुकीतील विजय हाच महत्त्वाचा असतो. त्यामुळे काँग्रेस आणि शिवसेनेला आपले पक्षातील नेत्यांना समजावण्याची कसरत करावी लागणार आहे.
राष्ट्रवादीतही नाराज..
महायुतीप्रमाणे महाविकास आघाडीमधील साहेबांच्या राष्ट्रवादीतही नाराज आणि बंडखोरांची संख्या तुलनेने कमी आहे. उमेदवारी देताना शरद पवार यांनी बरीच काळजी घेतली आहे. त्यामुळे पवारांना सोडून जाणाऱ्यांची संख्या ही आता कमी झाली आहे किंवा जवळपास थांबली आहे. अशात महायुती आणि महाविकास आघाडीमधील सर्वच नेत्यांची दिवाळी बंडखोरांना समजावण्यात जाणार आहे. निवडणूक जाहीर झाल्यापासून हाती असलेल्या दिवसांमध्येच दिवाळीचा उत्सव आला आहे. त्यामुळे महत्त्वाचा एक किंवा दोन दिवस वगळला, तर सर्व पक्षातील नेत्यांना बंडखोरी शांत करण्यासाठी धावाधाव करावी लागणार आहे. अशात नेते कोणत्या नाराजाला कोणता शब्द देतात हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.