President rule : महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांसाठी २० नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. २३ नोव्हेंबरला निकाल लागणार आहे. तर २६ तारखेपर्यंत सरकार बनवावं लागणार आहे. त्यामुळे जर सत्ता पालटली तर आघाडीच्या राजकारणात सरकार बनविण्यासाठी केवळ ४८ तास मिळतील. यात वेळ घालवलवा तर राज्यात पुन्हा राष्ट्रपती राजवट लागू करतील, अशी शंका राज्याचे माजी महसूल मंत्री सुबोध सावजी यांनी व्यक्त केली आहे. तसेच घाईघाईने निवडणुका घेऊन भाजप आपले मनसुबे पूर्ण करीत आहे, असंही ते म्हणाले.
सुबोध सावजी म्हणाले
“निवडणूक आयोगाने केलेल्या घोषणेनुसार, २३ नोव्हेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. या मतमोजणीचं काम २४ नोव्हेंबरपर्यंत चालेल. महाराष्ट्राच्या सध्याच्या विधानसभेचा कार्यकाळ २६ नोव्हेंबरपर्यंत आहे. म्हणजेच २४ ते २६ नोव्हेंबर असा ४८ तासांचा वेळ नवीन सरकार बनविण्यासाठी मिळणार आहे. पण हा वेळ पुरेसा नाही. ४८ तासांत सरकार स्थापन करून शपथविधी करावा लागेल. या काळात दोन्ही आघाड्यांना आपापल्या आमदारांना एकत्र करत बहुमत सिद्ध करावे लागेल. आमदारांच्या बैठका घेऊन नेता निवडीचे सोपस्कार पार पाडावे लागतील. निकालानंतरच्या ४८ तासांत घडले नाही, तर विधानसभेचा कालावधी संपणार आणि नवी विधानसभा अस्तित्वात आली नाही म्हणून राज्यात राष्ट्रपती शासन लावण्याची शिफारस राज्यपाल करतील”, असं असे सुबोध सावजी म्हणाले.
कालमर्यादा 5 वर्षांची
‘विधानसभेच्या निवडणुकांची कालमर्यादा 5 वर्षांची आहे. कालमर्यादेच्या आत नविन विधानसभा सदस्यांचा शपथविधी व मंत्रीमंडळ गठित होणे आवश्यक आहे. निवडणूक आयोगाने सत्ताधाऱ्यांच्या संगनमताने राज्यामध्ये एकाच तारखेत विधानसभेचा निवडणूक कार्यक्रम लावला. राज्याचे महामहिम राज्यपाल यांनी राज्यात दौरा करुन राजकीय परिस्थीतीचा आढावा सत्ताधाऱ्यांना दिला. विधानसभेच्या निवडणुकीत महायुतीचे सरकार येण्याची शक्यता कमी आहे. असा अहवाल राज्यपाल महोदयांकडून सत्ताधाऱ्यांना मिळत होता. हा अहवाल लक्षात घेता सत्ताधाऱ्यांनी राज्याच्या अर्थव्यवस्थेचा कोणताही अभ्यास न करता राज्याच्या तिजोरीच्या बजेटचा विचार न करता मतदारांना लुभावण्याकरीता योजनांचा वर्षाव केला, अशी टीकाही त्यांनी केली आहे.
विधानसभा निवडणुकीसाठी एकाच दिवशी मतदान होत आहे. निवडणुकीचा निकाल 23 नोव्हेंबरला दिवसभरात येणार आहे. निवडून आलेल्या विधानसभा सदस्यांचा शपथविधी व मंत्रीमंडळाचे गठन 24 व 25 नोव्हेंबर या कालावधीत होणे बंधनकारक आहे. विधानसभेचा कार्यकाळ 26 नोव्हेंबरला पूर्ण होतो. या कालमर्यादेत सदस्यांचा शपथविधी व मंत्रीमंडळाचे गठन न झाल्यास राज्यात राष्ट्रपती राजवट कायदेशीर क्रमप्राप्त आहे, असे त्यांनी सांगितले.
फोडा-फोडीचे राजकरण होणार
राज्यात तीन पक्षांचे युतीचे सरकार आहे. तिन्ही पक्ष आपापल्या निवडणूक चिन्हांवर स्वतंत्र निवडणूक लढवित आहे. या राजकीय खेळीत भाजप पक्षाच्या हातात सत्ता येत नाही असे दिसल्यास भाजप राजकीय खेळीने मुदतपुर्व कालावधीत मंत्रीमंडळाचे गठन होऊ देणार नाही. पर्यायाने राज्यात राष्ट्रपती राजवट डिसेंबर, जानेवारी दोन महिने ठेवून फोडा-फोडीचे राजकरण केले जाईल. खोकेनितीच्या माध्यमातून भाजप आपला मुख्यमंत्री आरुढ करण्याचा निश्चीत प्रयत्न करणार आहे, असा दावाही सावजी यांनी केला आहे.