Shiv Sena : एखादा विद्यार्थी सतत कॉलेजमधून गायब असेल तर त्याचे ‘अटेंडन्स’ नियमाप्रमाणे दिसत नाहीत. अशा विद्यार्थ्याला मग कॉलेज आणि विद्यापीठ परीक्षेबाबत विचार करायला सांगतात. कॉलेजमध्ये पाऊलच न ठेवल्याने मग असा विद्यार्थी ‘ड्रॉप’ घेण्याचा निर्णय घेतो किंवा घरचे त्याला हा निर्णय घ्यायला भाग पाडतात. वर्गातले सगळे पुढे निघून गेल्यानंतर असा विद्यार्थी पुन्हा अभ्यासाला सुरुवात करतो. मात्र त्याच्यापुढे ‘ड्रॉप’ नंतरचे सगळेच विषय ‘ऑल क्लिअर’ करण्याचे आव्हान असते. अशाच काहीच्या परिस्थितीतून सध्या शिवसेनेच्या माजी खासदार आणि विधान परिषदेच्या विद्यमान आमदार भावना गवळी या जात आहे.
ईडी आणि आयकर मागे
महाविकास आघाडीची सत्ता महाराष्ट्रात असताना भावना गवळी यांच्या मागे ईडी आणि आयकर विभाग लागला. एखाद्या विद्यार्थ्याला प्राध्यापक जसे त्रास देतात, अगदी त्याच पद्धतीने राजकारणाच्या क्लासरूम मध्ये भावनाताईंना आणि आयकर विभाग या दोन प्राध्यापकांनी अनेक दिवस छळले. छळणारे प्राध्यापक, सातत्याने होणारी रॅगिंग आणि त्यामुळे अभ्यासात मन लागत नसल्याने असा विद्यार्थी कॉलेजमध्ये गैरहजर राहू लागतो. अनेक दिवस तो कॉलेजमधून गायब होत असतो. अगदी त्याच पद्धतीने भावना गवळी अनेक महिने आपल्या लोकसभा मतदारसंघातून गायब होत्या. त्याचा फटका त्यांना बसला.
दिल्लीतून मुंबईत
राजकारणात प्रवेश केल्या त्या दिवसापासून भावना गवळी या दिल्लीच्या राजकारणात सक्रिय होत्या. मात्र ज्याप्रमाणे कॉलेजमधून गायब राहणाऱ्या विद्यार्थ्याचे होमवर्क आणि असाइनमेंट अपूर्ण राहतात त्याच पद्धतीने भावना गवळी यांच्या मतदारसंघात विकास मंदावला. भावना गवळी या मतदारसंघाकडे फिरकल्याच नाहीत. त्यामुळे त्यांच्या विरोधात लोकसभा मतदारसंघातील नागरिकांमध्ये प्रचंड संतापाचे वातावरण तयार झाले.
गैरहजर राहणाऱ्या विद्यार्थ्याला प्रसंगी कॉलेज परीक्षेची संधी देऊ करते पण विद्यापीठ नेहमी नियमानवर बोट ठेवते. भावना गवळी यांना त्यांच्या एकनाथ शिंदे सर यांनी संधी देण्याचा प्रयत्न केला. लोकसभा निवडणुकीत गवळी यांना उमेदवारी मिळावी, असे शिंदे सरांचे मत होते. पण या सगळ्यात भाजपने विद्यापीठासारखी भूमिका निभावली. नियमांवर बोट ठेवले. हजेरी नाहीतर परीक्षा नाही, असे शिंदे सरांना सांगितले. प्रश्न मोदी सरकार नावाच्या विद्यापीठ अनुदान आयोगाच्या अस्तित्वाचा होता. त्यामुळे भाजपने शिंदे सरांना भावनाताईंना ‘ड्रॉप’ घ्यायलाच लावा असे सांगितले. शिंदे सर हतबल झाले आणि त्यांनी परीक्षेपूर्वी मिळणारे हॉल तिकीट भावनाताईंना दिलेच नाही.
मुंबईत पुनर्वसन
लोकसभा निवडणुकीत उमेदवारी न मिळाल्याने भावना गवळी प्रचंड नाराज झाल्या. अशात जवळच्या विद्यार्थ्याला प्राध्यापक जशी धीर देतात अगदी त्याच पद्धतीने शिंदे सरांनी त्यांना धीर दिला. ‘ड्रॉप’ झाले तरी काळजी करू नका आपण ‘एटीकेटी’चा काहीतरी मार्ग शोधू, असा शब्द शिंदे सरांनी दिला. त्यानंतर शिंदे सरांनी काही दिवसातच हा शब्द खराही करून दाखवला. राज्यपाल नामनिर्देशित आमदारांच्या यादीमध्ये भावना गवळी यांचे नाव आले आणि त्या आमदार झाल्या. पण दिल्लीतील संसदेच्या ‘फ्रंटडेस्क’वरून त्या एखाद्या ‘बॅकबेंचर’ विद्यार्थ्यासारख्या ‘डिमोशन’वर मुंबईतील विधान परिषदेच्या बाकांवर आल्या.
पेपरला उशिरा आल्यानंतर विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर जशी लगबग आणि त्रागा दिसतो, तसेच भाव काहीशे भावना गवळी यांचे आमदार झाल्यानंतरही होते. त्यामुळेच शिंदे सरांनी त्यांना पुन्हा एकदा पहिले पासून परीक्षा देऊन बघा, अशी संधी दिली. त्यामुळेच आता दिल्लीची संसद गाजवणाऱ्या भावना गवळी आता विधानसभेसाठी प्रयत्न करीत आहे. ताईंनी रिसोड विधानसभा मतदारसंघाच्या निवडणूक निर्णय अधिकार्यांकडे परीक्षेसाठी आता अर्ज केला आहे. मात्र लोकसभा निवडणुकीप्रमाणे विधानसभा निवडणुकीतही ताईंना कठीण पेपरच सोडवावा लागणार आहे.
एकाच बाकावर दोघे
कोणत्याही परीक्षेत शांतचित्ताने पेपर सोडवण्यासाठी विद्यार्थ्यांना पोषक वातावरण उपलब्ध करून दिले जाते. अलीकडच्या काळात तर एका बाकावर एकाच विद्यार्थ्याला परीक्षा हॉलमध्ये बसवण्यात येते. भावनाताईंच्या बाबतीत येथेही विरोध आडवा आला आहे. रिसोड मतदारसंघाची जागा शिवसेनेला मिळाली असली तरी भाजपचे अनंत देशमुख यांनी देखील उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यामुळे परीक्षेच्या एकाच बाकावर दोन जण आले आहेत. रिसोड मतदारसंघ युतीमध्ये शिवसेनेच्या वाट्याला आहे. त्यामुळे देशमुख यांनी उमेदवारी दाखल करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, अशी प्रतिक्रिया भावना गवळी यांनी व्यक्त केली.
Akola West : संघाच्या नाकावर टिच्चून विजय अग्रवाल यांना उमेदवारी
तक्रार..
अनंत देशमुख यांनी उमेदवारी अर्ज दाखल करतात भावनाताईंनी पुन्हा एकदा शिंदे सरांकडे तक्रार केली आहे. त्यामुळे शिंदे सर आता विद्यापीठाच्या रूपात असलेल्या भाजपशी बोलून यावर कोणता तोडगा काढतात हे बघण्यासारखे आहे. सद्य:स्थितीमध्ये लोकसभेप्रमाणे यंदाही भावना गवळी यांच्या विरोधात जोरदार प्रचार सुरू झाला आहे. भावना गवळी या आधीच आमदार आहेत. विधान परिषदेमध्ये त्यांचा सहा वर्षांचा कार्यकाळ पक्का आहे. असे असतात नाही एका विद्यमान आमदाराला पुन्हा आमदारकीसाठी कशी परीक्षा देता येईल, अशी चर्चा रिसोडमध्ये रंगली आहे. इतकेच नव्हे तर विकास करू न शकल्याने ज्यांना लोकसभा निवडणुकीतील परीक्षेपासून वंचित ठेवण्यात आलं, या भावना गवळी यांना विधानसभेसाठी कसं काय हॉल तिकीट मिळालं, असा प्रश्नही विचारला जात आहे.