Mahayuti : महाराष्ट्र पुन्हा महायुतीच्या हातात गेला तर उरला सुरला महाराष्ट्र हे लोक विकून टाकतील. महाराष्ट्राचे नियंत्रण दुसऱ्याच्या हातात देतील, असा घणाघात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला. त्यांनी विविध विषयांवर माध्यमांशी संवाद साधला. महायुती सरकारने फुले-शाहू-आंबेडकरांच्या विचारांना गाडलं. त्यांनी शिवाजी महाराजांनाही सोडलं नाही, अशी टीकाही त्यांनी केली.
भूमिका..
जागावाटपाच्या संदर्भातही त्यांनी भूमिका मांडली. ‘हा शेवटच्या दिवसापर्यंत चालणारा विषय आहे. अजूनही एक-दोन जागांबद्दल निर्णय व्हायचा आहे. हायकमांड लक्ष घालत आहे. मित्र पक्षांशी चर्चा सुरू आहे. त्यामुळे जागा वाटपाच्या समाप्तीकडे आम्ही चाललो आहोत.’
आम्ही तीन पक्ष सोबत आहोत. त्यामुळे काही जिल्हे मित्र पक्षांना मिळतील, काही आम्हाला मिळतील. दहा-बारा जिल्ह्यांमध्ये आम्ही उमेदवार दिला नाही. पण आता संघटना हा महत्त्वाचा भाग आहे. राष्ट्रीय पक्षांच्या अलायन्स असतात. ते सांभाळणं राष्ट्रीय पक्षांची जबाबदारी असते. यामध्ये कार्यकर्त्यांच्याही भावना समजून घ्यायच्या असतात, असंही त्यांनी स्पष्ट केलं.
आपल्याला विरोधकांसोबत लढायचंय
शिवसेनेची नाराजी काय आहे माहिती नाही. ती त्यांची व्यक्तिगत मते आहेत. आम्ही म्हणायचं का की, कोकणात आम्हाला काहीच मिळालं नाही? हा विषय नाही. संजय राऊत यांनी आता हे सगळं थांबवलं पाहिजे. आपल्याला विरोधकांसोबत लढायचं आहे, हे त्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे. विरोधकांच्या बाबतीत त्यांनी भूमिका मांडल्या पाहिजे, असंही ते म्हणाले.
भाजपने संस्कृती खराब केली
सर्वच समाजांना नेतृत्व मिळाव अशी काँग्रेस आणि राहुल गांधी यांची इच्छा आहे. मात्र अलायन्समध्ये लढल्यामुळ काही ठिकाणी आम्हाला ते करता आलं नाही. प्रत्येक समाजाला न्याय देण्याची भूमिका राहुल गांधींनी मांडली आहे. भाजपने महाराष्ट्राची संस्कृती खराब केली आहे. त्यामध्ये मराठा विरुद्ध ओबीसी, धनगर गोवारी विरुद्ध आदिवासी अशी फूट पाडली आहे. त्यासाठी जातीय जनगणनेला प्राधान्य द्यायचे आहे, असंही ते म्हणाले.
उमेदवार बदलले तर काय झालं?
काही उमेदवार बदलले तर त्यात अडचण काय आहे? तो आमच्या पक्षाचा निर्णय आहे. धनगर समाजाला संधी द्यायची होती म्हणून उमेदवार दिला. बंजारा समाजाला नाही देऊ शकलो. पण त्यांना पूर्ण न्याय देऊ,असंही नाना पटोले म्हणाले.
Hasan Mushrif : मुख्यमंत्री होणार नाही. पण उपमुख्यमंत्री नक्की होईन