Assembly Elections : संपूर्ण महाराष्ट्रात ‘मागास’ अशी ओळख असलेल्या बल्लारपूर मतदारसंघाचा प्रवास ‘मागास ते विकास’ असा झाला आहे. आता हा मतदारसंघ राज्यात विकासाचे सर्वोत्तम मॉडेल ठरेल, या दृष्टीने प्रयत्न करणार आहे, असा निर्धार राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी ‘द लोकहित’शी बोलताना व्यक्त केला.
बल्लारपूर विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार म्हणून सुधीर मुनगंटीवार यांनी मुल येथील उपविभागीय कार्यालयात अर्ज दाखल केला. शेकडो चाहते आणि कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत मुनगंटीवार यांची रॅली निघाली. तत्पूर्वी, पत्नी सौ. सपना मुनगंटीवार यांच्यासोबत त्यांनी माता कन्यका मंदिरात दर्शन घेतले. त्यावेळी ‘द लोकहित’सोबत खास बातचित केली. ‘सहावेळा जनतेचा आशीर्वाद मिळाला आहे. यंदाही मिळणार आहे. यंदाच्या निवडणुकीत जनतेचा, प्रगतीचा, विकासाचा विजय होणार आहे,’ असा विश्वास मुनगंटीवारांनी व्यक्त केला. त्याचवेळी जास्तीत जास्त तरुणांना रोजगार मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
पूर्वी हा मतदारसंघ मागास होता. आज मोठ्याप्रमाणात विकास झाला आहे. भविष्यात बल्लारपूर विधानसभा मतदारसंघ विकासाचे मॉडेल म्हणून नावारुपाला येईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. ते म्हणाले, ‘आतापर्यंत 300 हून अधिक कामे मी केली आहेत. मुल एमआयडीसीमध्ये पूर्वी काहीच नव्हते. आज पानपट्टी टाकायलाही जागा नाही एवढे उद्योग आले आहेत. तीन ते चार हजार लोकांना थेट रोजगार मिळाला आहे. एडव्हान्टेज विदर्भमध्ये 75 हजार कोटी रुपयांचे सामंजस्य करार करण्यात आलले. आता अधिक रोजगार निर्मितीसाठी 40 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक आणण्याचा प्रयत्न आहे, असेही ते म्हणाले.
विकासकामे 300 पार!
आरोग्य, कृषी, उद्योग, वने, सांस्कृतिक अशा विविध क्षेत्रांमध्ये 300 हून अधिक कामे केली आहेत. कृषी महाविद्यालय, मेडिकल कॉलेज, ग्रामीण रुग्णालय, कॅन्सर हॉस्पिटल, वन अकादमी, एसएनडिटी विद्यापीठ, पंजाब नॅशनल बँकेच्या माध्यमातून होणारे काम, बंधारे, आरोग्य शिबिरे, नेत्रचिकित्सा शिबीरे अश्या लांबलचक यादीचा उल्लेखही मुनगंटीवारांनी केला. लोकांनी ज्या मागण्या केल्या त्या पूर्ण केल्या, असा दावा मुनगंटीवार यांनी केला.
बल्लारपुरात भारत माता मंदिर
या पाच वर्षात मी अनेक विषय प्राधान्याने हाती घेणार आहे. बल्लारपूरमध्ये भारत माता मंदिर व सभागृह करीत आहे. या माध्यमातून सर्व जाती धर्माचे लोक एकत्र येऊन ‘भारत माता की जय’ म्हणतील, असेही मुनगंटीवार म्हणाले.