महाराष्ट्र

Ravikant Tupkar : काहींचा करेक्ट कार्यक्रम करणार!

Buldhana : रविकांत तुपकरांचा इशारा; बुलडाण्याचा निर्णय 29 ऑक्टोबरपर्यंत

Assembly Election : बुलढाण्याची जागा देतो असा शब्द मिळाल्यानंतरही ऐन वेळेवर तिकीट नाकारले. त्यामुळे रविकांत तुपकर महाविकास आघाडीच्या भूमिकेवर चांगलेच नाराज झाले. त्यानंतर त्यांनी ‘एकला चलो रे’ची भूमिका घेतली. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून जयश्री शेळके यांना उमेदवारी जाहीर झाली आणि महाविकास आघाडीसोबत चर्चा फिस्कटल्याचे स्पष्ट झाले. आता रविकांत तुपकर यांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे. अशात त्यांनी काहींचा करेक्ट कार्यक्रम करणार, असा इशाराच दिला आहे. 

क्रांतीकारी शेतकरी संघटना महाविकास आघाडीबरोबर हातमिळवणी करून विधानसभा निवडणूक लढणार असल्याची चर्चा होती. अशात या संघटनेने वेगळी वाट निवडली आहे. रविकांत तुपकर या संघटनेचे प्रमुख आहेत. राज्यात शेतकरी चळवळ पुढे नेण्यासाठी तसेच जनसामान्यांच्या समस्यांवर आवाज उठवण्यासाठी तुपकरांनी बिगर राजकीय सामाजिक संघटनेची स्थापना केली होती. मात्र अलीकडच्या काळात त्यांच्या या संघटनेने राजकीय पावलं टाकण्यास सुरुवात केली. स्वतः तुपकर या संघटनेच्या माध्यमातून लोकसभा निवडणुकीला उभे राहिले होते.

आता विधानसभेसाठी इच्छा असतानाही महाविकास आघाडीने सोबत घेतले नाही. मग त्यांच्यासोबत फरपटत कशाला जायचे? अशी पदाधिकारी-कार्यकर्त्यांची भूमिका आहे. त्यामुळे महाविकास आघाडी सोबत जाणार नाही, असे तुपकर यांनी शनिवारी जाहीर केले. शिवाय राज्यातील काही मतदारसंघांत अर्ज दाखल करण्याच्या सूचना कार्यकर्त्यांना देण्यात आल्या आहेत. बुलडाणा विधानसभा मतदारसंघात काय करायचे याबाबतचा निर्णय २९ ऑक्टोबरला घेणार असल्याचे रविकांत तुपकरांनी सांगितले.

बुलडाणा येथे शनिवारी तुपकर यांनी आज प्रमुख पदाधिकाऱ्यांची तातडीची बैठक बोलवली होती. या बैठकीत अनेक विषयांवर निर्णय घेण्यात आले. या बैठकीनंतर रविकांत तुपकर यांनी माध्यमांशी बोलताना आपली भूमिका जाहीर केली.

Assembly Election : भाजप भाकर फिरविणार नाही

अशा उमेदवारांना देणार पाठिंबा

क्रांतिकारी शेतकरी संघटना ही सामाजिक संघटना आहे. आमच्याकडे पक्ष नाही, त्यामुळे काही मतदारसंघात आमचे कार्यकर्ते अपक्ष अर्ज दाखल करतील. त्यांना क्रांतिकारी शेतकरी संघटना पाठिंबा देईल. त्यांच्याबरोबर राज्यातील अनेक मतदारसंघांत स्वच्छ चारित्र्याच्या, शेतकरी चळवळीची पार्श्वभूमी असलेल्या अपक्ष उमेदवारांना पाठिंबा देणार असल्याचेही तुपकर म्हणाले.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!