Amruta Fadnavis : दक्षिण-पश्चिम नागपूर मतदारसंघातून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यांनी दाखल केलेल्या शपथपत्रातील नोंदीनुसार सद्य:स्थितीत त्यांच्या एकट्याच्या नावावर सुमारे सव्वा पाच कोटींची संपत्ती आहे. तर त्यांच्या पत्नी अमृता यांच्याकडे त्यांच्याहून अधिक संपत्ती आहे. प्रामुख्याने जमिनींच्या बाजार मूल्यात गेल्या 5 वर्षांत झालेल्या वाढीमुळे फडणवीसांच्या अचल संपत्तीत वाढ झाली आहे.
2019 साली उपमुख्यमंत्र्यांकडे वैयक्तिकरीत्या 45 लाख 94 हजार 634 रुपयांची चल संपत्ती व 3 कोटी 78 लाख 29 हजार रुपयांची अचल संपत्ती होती. एकूण संपत्तीचा आकडा हा 4 कोटी 24 लाख 23 हजार 634 इतका होता. पाच वर्षांत त्यांच्या संपत्तीत 1 कोटी 80 हजार 233 रुपयांची वाढ झाली आहे. त्यांच्याकडे सद्य:स्थितीत 56 लाख 07 हजार 867 रुपयांची चल, तर 4 कोटी 68 लाख 96 हजार रुपयांची अचल संपत्ती आहे.
त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्या नावावर 2019 साली 4 कोटी 38 लाख 97 हजार 741 रुपयांची संपत्ती होती. ती आता वाढून 7 कोटी 92 लाख 21 हजार 748 इतकी झाली आहे. त्यांच्या संपत्तीत 80.47 टक्क्यांची वाढ झाली आहे. त्यांच्या नावावर 6 कोटी 96 लाख 92 हजार 748 रुपयांची चल, तर 95 लाख 29 हजारांची अचल संपत्ती आहे. फडणवीस यांनी अमृता फडणवीस यांच्याकडूनच 63 लाखांचे कर्ज घेतल्याचे शपथपत्रात नमूद केले आहे.
देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचा व्यवसाय शेती व समाजसेवा हा दाखविला आहे. त्यांची वार्षिक मिळकत 38 लाख 73 हजार 563 रुपये इतकी होती. तर त्यांच्यापेक्षा त्यांच्या पत्नी अमृता यांची वार्षिक मिळकत अधिक आहे. 2023-24 मध्ये अमृता यांची वार्षिक मिळकत 79 लाख 30 हजार 402 इतकी होती. वेतन, शेअर्समधील कॅपिटल गेन, डिव्हिडेंट आदींचा त्यात समावेश होता.