Abha Pandey vs Krushna Khopde : मागील तीन निवडणूकांपासून भाजपचा बालेकिल्ला बनलेल्या पूर्व नागपुरात भाजपसाठी यंदा आव्हानांमध्ये वाढ झाली आहे. महायुतीचाच घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्या व राज्य महिला आयोगाच्या सदस्य आभा पांडे यांनी भाजपचे उमेदवार कृष्णा खोपडे यांची डोकेदुखी वाढवली आहे. त्यांनी पक्षाविरोधात बंडखोरी करत अपक्ष उमेदवार म्हणून अर्ज दाखल केला आणि महायुतीत ‘ऑल इज नॉट वेल’ असल्याची बाब समोर आली आहे.
खोपडे समोर अडचणी
आभा पांडे यांच्यामुळे प्रामुख्याने खोपडे यांच्यासमोरील अडचणी वाढल्या आहेत. विशेषत: पूर्व नागपुरातील हिंदी मतदार दुरावल्या जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मागील तीन विधानसभा निवडणुकांपासून कृष्णा खोपडे पूर्व नागपुरातून विजयी होत आले आहेत. यावेळीदेखील भाजपने त्यांनाच उमेदवारी दिली आहे. जो उमेदवार जिंकू शकेल त्यालाच उमेदवारी मिळेल, अशी भूमिका महायुतीच्या वरिष्ठ नेत्यांच्या बैठकीत मांडण्यात आली होती.
नागपुरातूनच या भूमिकेला सुरुंग लागला. आभा पांडे यांनी काहीही झाले तरी पूर्व नागपुरातून निवडणूक लढविण्याची घोषणा केली होती. राष्ट्रवादीने तिकीट नाही दिले तर जनतेसाठी मी अपक्ष म्हणून निवडणूक लढेन, अशी भूमिका त्यांनी मांडली होती. आपल्या भूमिकेवर ठाम राहात त्या आता मैदानात उतरल्या आहेत.
आभा पांडे यांना राष्ट्रवादीचे नेते त्यांच्या भूमिकेपासून परावृत्त करण्याचा प्रयत्न करतील, अशी चर्चा होती. मात्र, गुरुवारी आभा पांडे यांनी त्यांच्या समर्थकांसोबत निवडणूक अर्ज दाखल केला. यामुळे पूर्व नागपुरात खोपडे यांना त्यांच्याच मित्रपक्षाच्या पदाधिकाऱ्याविरोधात लढावे लागणार आहे. आभा पांडे यांना 2017 साली झालेल्या मनपा निवडणुकीत जवळपास 11 हजार मते मिळाली होती. शिवाय त्यांच्या प्रभागातील अनेक बुथ पूर्व नागपुरात येतात.
दुरावल्या जाण्याची शक्यता
पूर्व नागपुरात व्यापारी व हिंदी भाषिक मतदार मोठ्या प्रमाणात आहेत. पांडे यांच्या उमेदवारीमुळे यातील काही उमेदवार भाजपपासून दुरावल्या जाण्याची शक्यता आहे. याचा फटका खोपडे यांना बसू शकतो. दुसरीकडे पांडे व पेठे यांच्यातदेखील राजकीय वाद आहे. त्यामुळे पेठेंचे प्राबल्य असलेल्या भागातदेखील पांडेंनी आक्रमक प्रचाराचे नियोजन केले आहे. त्यामुळे त्यांच्यासमोरदेखील आव्हान उभे ठाकले आहे.
वीस वर्षांनंतर राष्ट्रवादी मैदानात
2004 पासून काँग्रेस आणि राष्ट्रवादी शहरात एकत्र लढत आहेत. पण आजपर्यंत राष्ट्रवादीसाठी एकही मतदारसंघ काँग्रेसने सोडला नाही. मात्र यंदा प्रथमच दुनेश्वर पेठे यांना पूर्वची उमेदवारी देऊन राष्ट्रवादीचा बॅकलॉग भरून काढण्याचा प्रयत्न झाला आहे. 20 वर्षांत प्रथमच राष्ट्रवादी शहराच्या मैदानात दिसणार आहे.