Mahavikas Aghadi Vs Mahayuti : राज्याप्रमाणे बुलढाणा जिल्ह्यातही महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये दोन-दोन जागांवर सस्पेन्स कायम आहे. जागा कोणत्या पक्षाला सुटते, यावर सर्व काही अवलूंबून असल्याने सर्वच इच्छुक उम्मेदवार वरिष्ठांच्या निर्णयांची आतुरतेने वाट पाहत आहेत.
महायुतीमध्ये सातपैकी पाच जागांवरील उमेदवार जाहीर झाले आहेत. असे असले तरी मलकापूर आणि सिंदखेड राजा मतदारसंघातील उमेदवारांची घोषणा करण्यात आली नाही. त्यामुळे येथून कोणाला उमेदवारी जाहीर होते, याचा सस्पेन्स अद्यापही कायम आहे. महायुतीमध्ये भाजपच्या वाट्याला चार जागा आल्या आहेत. जळगाव जामोद, खामगाव आणि चिखली येथील उमेदवार जाहीर करण्यात आले आहेत. शिंदेसेनेनेही त्यांच्या वाट्याच्या बुलढाणा आणि मेहकर येथील जागांवर उमेदवार 23 ऑक्टोबर रोजीच जाहीर केले आहे.
महायुतीमध्ये मलकापूर आणि सिंदखेड राजा या दोन जागांवरील उमेदवारांच्या नावाची घोषणा होणे बाकी आहे. सिंदखेड राजा येथे महायुतीत असलेले राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी ऐनवेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाची कास धरली. त्यामुळे सिंदखेड राजामधून अजित पवार गट कोणाला उमेदवारी देणार, याकडे लक्ष लागले आहे.
अजित पवार तयार नाही
पक्षाकडे उम्मेदवार नसला तरी अजित पवार गट या जागेवरील आपला हक्क सोडण्यास तयार नाही. तसे झाल्यास बुलढाणा जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या रौप्यमहोत्सवी वर्षातच राष्ट्रवादीचे चिन्ह हद्दपार होऊ शकते. दुसरीकडे प्रारंभी शरद पवार गटाकडून इच्छुक असलेल्या डॉ. राजेंद्र शिंगणे यांची पुतणी गायत्री शिंगणे यांनीही आता युटर्न घेत 22 ऑक्टोबर रोजी अजित पवार यांची भेट घेतली होती, परंतु त्यांना प्रत्यक्षात त्यांना उमेदवारी मिळते का, हाही प्रश्न आहेच. या व्यतिरिक्त येथे शिंदे सेना, भाजपकडून उमेदवार आयात करून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून तो सिंदखेड राजाची जागा महायुतीअंतर्गत लढवू शकतो, परंतु शेवटी हे सर्व पर्याय आहेत.
महायुतीप्रमाणे महाविकास आघाडीमध्येही जिल्ह्यातील जळगाव जामोद आणि बुलढाणा या दोन मतदारसंघांसाठी रस्सीखेच सुरू आहे. जळगाव जामोद विधानसभा मतदारसंघ सध्या काँग्रेसकडे आहे. मात्र या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा मतदारसंघ आपल्याकडे खेचून घेण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. अशीच स्थिती बुलढाण्यातही आहे हा मतदारसंघ शिवसेना उबाठा गटाकडे आहे. मात्र या ठिकाणी येऊन पारंपारिक पद्धतीने काँग्रेस पक्षाला सुटावा, यासाठी खुद्द मुकुल वासनिक प्रयत्न करताना दिसत आहेत.
शिवबंधन हातावर बांधून घेतले
बुधवारी (23 ऑक्टोबर) रात्री राजकीय समीकरणे बदलली आणि काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या जयश्री शेळके यांनी मुंबईत मातोश्री गाठून शिवबंधन हातावर बांधून घेतले. त्यामुळे काँग्रेसमधून आयात केलेला उमेदवार शिवसेना देण्याच्या तयारीत आहे. बुलढाण्यात झालेले हे नवे समीकरण मतदारांना पसंतीला पडलेले असल्याचा सूर आहे. या ठिकाणी जयश्री शेळके महाविकास आघाडीचा सर्वसमावेशक चेहरा म्हणून समोर येतील, असं दिसतंय.