Assembly Election : उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची पहिली यादी बुधवारी (23 ऑक्टोबर) जाहीर झाली. 65 उमेदवार घोषित करून ठाकरेंनी मोठा सस्पेंस संपवला आहे. पहिल्या यादीने अनेक ठिकाणी नाराजीचा सूरही आहे. यात रामटेकही सुटलेले नाही. गेली अनेक वर्षे शिवसेनेशी (ठाकरे गट) निष्ठावान असलेल्या माजी खासदाराला पहिल्या यादीमुळे जोरदार धक्का बसला आहे.
नागपूर दक्षिण आणि रामटेकच्या जागेसाठी ठाकरे गट पहिलेपासून आग्रही होता. यात कुठलीही एक जागा मिळेल, यावर सहमती झाली असल्याचे कळते. त्यानुसार शिवसेनेने बुधवारी पहिली यादी जाहीर केली तेव्हा त्यात नागपूर दक्षिणचा उल्लेख नव्हता. मात्र रामटेकचा होता. आता रामटेकमध्ये शिवसेना विरुद्ध शिवसेना असा सामना बघायला मिळणार आहे. पण रामटेकमधून लढण्यासाठी जे लोक इच्छुक होते, त्यात माजी खासदार प्रकाश जाधव यांचाही समावेश होता. अर्थात प्रकाश जाधव आणि विशाल बरबटे यांचीच नावे चर्चेत होती.
विशाल बरबटेंच्या तुलनेत प्रकाश जाधव जवळपास साडेतीन दशकं शिवसेनेत आहेत. यापूर्वी ते एकदा रामटेक विधानसभा लढलेही आहेत. त्यात त्यांना यश मिळालं नाही. पण 2007 मध्ये सुबोध मोहिते यांनी राजीनामा देऊन काँग्रेसमध्ये प्रवेश घेतल्यानंतर पोटनिवडणूक झाली. यामध्ये स्वतः स्व. बाळासाहेब ठाकरे प्रकाश जाधव यांच्या पाठिशी उभे राहिले होते. उद्धव ठाकरेंनीदेखील एका सच्च्या निष्ठावान कार्यकर्त्याच्या विजयासाठी सभा घेतली. त्यावेळी जाधव यांनी मोहितेंचा पराभव केला. केवळ दिड वर्ष ते खासदार होते. पण, सभागृहात रामटेकचे प्रतिनिधित्व करण्याचं स्वप्न पूर्ण झालं होतं.
नंतरच्या काळात ते पक्षात सक्रीय झाले. त्यांच्यावर जिल्ह्याची जबाबदारीदेखील देण्यात आली होती. त्यामुळे यावेळी उद्धव ठाकरे आपल्याला संधी देतील, याचा पूर्ण विश्वास प्रकाश जाधव यांना होता. त्यानुसार त्यांनी प्रयत्नही केले होते. मात्र, विशाल बरबटे यांचे नाव जाहिर झाल्यामुळे त्यांना धक्का बसल्याचे कळते.
Assembly Election : अकोला पूर्वमध्ये ठाकरेंचा उमेदवार ठरला !
कोण आहेत विशाल बरबटे?
तरुण आणि यशस्वी उद्योजक म्हणून विशाल बरबटे यांची ओळख आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नागपूर सहसंपर्क प्रमुख म्हणून विशाल बरबटे यांची राजकीय कारकीर्द सुरू झाली. 2014 च्या निवडणुकीनंतर त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. गेल्या काही वर्षांपासून त्यांनी रामटेक मतदारसंघात मुक्काम हलवला आहे. उद्धव ठाकरे यांनी बरबटे यांना रामटेक विधानसभा प्रमुख म्हणून देखील जबाबदारी सोपवली होती. अशात त्यांना विधानसभेची उमेदवारी दिल्यामुळे अनेकांच्या भूवया उंचावल्या आहेत.