BJP : भाजपचे माजी मंत्री राजकुमार बडोले यांनी योग्य टायमिंग साधून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (अजित पवार) प्रवेश केला आहे. गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव मतदारसंघातून त्यांना निवडणूक लढायची आहे. हा राष्ट्रवादीचा पारंपरिक मतदारसंघ आहे. याठिकाणी अजित पवार गटाच्याच विद्यमान माजी आमदाराचे निवडून येणे शक्य नाही. अशात राजकुमार बडोले यांचे चांगले वजन आहे. त्यामुळे ही भाजपचीच खेळी आहे, असेही बोलले जात आहे.
निवडणूक लढण्यासाठी पक्ष बदलण्याचा प्रकार नवीन नाही. मात्र आता राज्यात महाविकास आघाडी आणि महायुती आहे. आघाडीत तीन आणि महायुतीत तीन पक्ष आहेत. त्यामुळे इच्छुक असणे आणि निवडून येण्याची शक्यता असणे या दोन्हींचा विचार केला जात आहे. त्यासाठी महायुती आणि महाविकास आघाडीतच अंतर्गत सोय म्हणून पक्षबदल सुरू आहेत. त्याच पार्श्वभूमीवर राजकुमार बडोले यांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश घेतला आहे. आता ते अर्जुनी मोरगावमधून महायुतीचे उमेदवार असतील, असे म्हटले जात आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत बडोले यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बडोलेंचे स्वागत केले आहे. राष्ट्रवादीची ताकत आणखी वाढणार आहे, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
Assembly Elections : सोनाळा ग्रामस्थांचा विधानसभेच्या मतदानावर बहिष्कार!
विजयी..
2014मध्ये अर्जुनी मोरगावमधून भाजपचे राजकुमार बडोले विजयी झाले होते. त्यानंतर त्यांना सामाजिक न्याय खाते देण्यात आले. त्यांची कारकीर्द चांगली राहिली. पण 2019मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या मनोहर चंद्रिकापुरेंकडून त्यांना अवघ्या 718 मतांनी पराभव पत्करावा लागला. दरम्यान, महाराष्ट्रात राष्ट्रवादी फुटल्यानंतर चंद्रिकापुरे अजित पवारांसोबत महायुतीत आले. त्यामुळे त्यांचा दावा कायम आहे.
भाजपने केलेल्या सर्व्हेमध्ये या जागेवर आपला उमेदवार निवडून येणार नाही, हे त्यांच्या लक्षात आले आहे. त्याचवेळी चंद्रिकापुरे यांचे निवडून येणे अवघड आहे, असा अहवाल अजित पवार गटाला मिळाला. त्यामुळे अर्जुनीची जागा राखण्यासाठी अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांनी मधला मार्ग काढल्याचे कळते. त्याचदृष्टीने माजी सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांनी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. चंद्रिकापुरेंची उमेदवारी धोक्यात असल्याने बडोलेंना उमेदवारी मिळणार, असे दिसत आहे.
महायुतीमध्ये उत्तम समन्वय – बडोले
महायुतीने गेल्या अडिच वर्षांत उत्तम काम केले आहे. तिन्ही पक्षांमध्ये समन्वय आहे. राज्यात पुन्हा महायुतीचेच सरकार येईल, असा विश्वास बडोले यांनी व्यक्त केला आहे. गेल्या निवडणुकीत अवघ्या 700 मतांनी पराभूत झालेल्या बडोलेंना यंदा राष्ट्रवादी मोठ्या मार्जिनने विजयी होईल, असा विश्वास आहे.