राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे नेते बाबा सिद्दीकी यांच्या हत्येनंतर देशभरात गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईचं नाव चर्चेत आहे. राज्यात सध्या विधानसभा निवडणुकीचा माहोल आहे. अशातच लॉरेन्स बिश्नोई याला आता थेट विधानसभा निवडणूक लढवण्याची ऑफर देण्यात आली आहे. बॉलिवूड सुपरस्टार सलमान खानला बिश्नोई टोळीकडून वारंवार धमक्या मिळत आहेत. काळवीट शिकार प्रकरणात लॉरेन्स बिश्नोई टोळीकडून सलमानला वारंवार धमक्या मिळत आहे.
महिनाभराने विधानसभा निवडणूक होणार आहे. त्यासाठी सर्वच पक्षांकडून जोरदार मोर्चेबांधणी केली जात आहे. इच्छुकांची मोठी गर्दी या निवडणुकीसाठी पाहायला मिळत आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याला सुरुवात झाली आहे. दरम्यान गँगस्टरला निवडणुकीत उतरविण्यासाठी एका पक्षाकडून ऑफर देण्यात आली आहे. लॉरेन्स बिष्णोई असं या गँगस्टर चं नाव आहे.
वांद्रे पूर्वमधून आमदार झिशान सिद्दीकी विरोधात लढवण्यासाठी उत्तर भारतीय विकास सेनेकडून लॉरेन्स बिश्नोईला ऑफर देण्यात आली आहे. बाबा सिद्दिकी यांच्या हत्या प्रकरणी लॉरेन्स बिश्नोईच्या काही शूटरला मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. अभिनेता सलमान खान यांना जीवे मारण्याची अनेक वेळा धमकी लॉरेन्स बिश्नोईकडून देण्यात आली आहे.
बाबा सिद्दिकी यांनी अंधेरी पश्चिम येथील गिल्बर्ट हिल येथील एका प्रकल्पातील जवळपास 623 गरीब लोकांना बेघर केलं, असा आरोप पंडित सुनील शुक्ला यांनी केला आहे. या संदर्भात कोर्टात री पिटीशन देखील दाखल करण्यात आली आहे.
नेमकी कुणी दिली ऑफर?
बाबा सिद्दीकी यांच्या हत्येनंतर चर्चेत आलेला गँगस्टर लॉरेन्स बिष्णोईला एका पक्षाने निवडणूक लढण्याची ऑफर दिली आहे. उत्तर भारतीय विकास सेना हा पक्ष निवडणूक आयोग आणि महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगात नोंदणीकृत पक्ष आहे. उत्तर भारतीय विकास सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष सुनील शुक्ला यांनी लॉरेन्स बिश्नोईला पत्र लिहून महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूक लढवण्याची मागणी केली आहे.
बिश्नोई देशभक्त
बाबा सिद्दीकी देशभक्त नाही, लॉरेन्स बिश्नोई देशभक्त आहे. तर लॉरेन्स बिश्नोई हा उत्तर भारतीय समाजाचा आहे. बिश्नोईमध्ये आम्हाला शहीद भगत सिंग दिसतो. त्यामुळे निवडणूक लढवण्यासंदर्भात विचार करावा, अशी विनंती करण्यात आली आहे. उत्तर भारतीय विकास सेनेकडून गुजरात येथील साबरमती जेल प्रशासनाला निवेदन लिहून मागणी करण्यात आली आह. उत्तर भारतीय विकास सेनेकडून लॉरेन्स बिश्नोईला पूर्ण पाठिंबा आहे, असे या पत्रात नमूद आहे.