Assembly Election : राज्यात लगबग सुरू झाली आहे. 22 ऑक्टोबरपासून अर्ज भरायला सुरुवात होत आहे. आतापर्यंत भाजपने आपल्या 99 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. वंचित बहुजन आघाडीकडून 100 पेक्षा जास्त उमेदवारांची घोषणा झालेली आहे. तर महायुती तसेच महाविकास आघाडीतील इतर पक्षांनी उमेदवारांची घोषणा केली नाही. परंतु अजित पवार यांच्या राष्ट्रवादीतील 16 जणांना थेट एबी फार्मच हातात देण्यात आला आहे. उमेदवारी घोषित करा, यादी जाहीर करा या औपचारिकतेमध्ये न पडता थेट एबी फॉर्म देण्यात आला. अजित पवारांच्या या अजबगजब पॅटर्नची सध्या चांगलीच चर्चा आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसची (अजित पवार गट) यादी आज जाहीर होणार, उद्या जाहीर होणार अशा बातम्या माध्यमांवर सुरू होत्या. महायुतीमध्ये जागावाटप ठरलं, अजित पवारांना एवढ्या जागा सुटणार अशाही चर्चा झाल्या. पण सोमवारी दुपारी थेट एबी फॉर्म हातात देऊन अजित पवारांनी 16 उमेदवारांचा विषयच मार्गी लावला. या 16 उमेदवारांची नावे एबी फॉर्म दिल्यानंतर पुढे आली. त्यामुळे आज उमेदवारी जाहीर झाली आणि उद्या एबी फॉर्म दुसऱ्यालाच दिला, असा घात होण्याची शक्यताही संपुष्टात आली आहे. अजित पवार यांनी खास त्यांच्याच स्टाईलमध्ये तुकडा पाडल्याची जास्त चर्चा आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर अजित पवार सत्तेत सामील झाले. पण लोकसभेत अपयश पदरी पडले. याची जाणीव ठेवून अजित पवार यांनी विधानसभेसाठी मोठी रणनीती आखली आहे. यासाठी प्रत्येक मतदारसंघात दौरे, चर्चा, बैठका घेऊन अजित पवार यांनी प्रबळ उमेदवार शोधले. आता त्यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. यातच राष्ट्रवादी पक्षफुटीत जे आमदार सोबत आले होते, त्या विद्यमान आमदारांना पुन्हा अजित पवार गटाकडून संधी देण्यात आली आहे. त्यातीलच अनेकांना एबी फॉर्म देण्यात आले आहेत.
राष्ट्रवादीला 60 जागा मिळणार ?
गेल्या महिनाभरापासून जागावाटपावर बैठका सुरु आहेत. एकीकडे महाविकास आघाडी तर दुसरीकडे महायुतीकडून उमेदवार निश्चित करण्यातची प्रक्रिया सुरू आहे. त्यातच आता माहयुतीचं जागावाटप फायनल झाल्याची माहिती आहे. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला 70 पेक्षा अधिक आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला 60 जागा मिळणार असल्याची माहिती आहे. भाजपच्या कोट्यातूनच मित्रपक्षांना जागा दिल्या जाणार आहेत. पुढील 24 तासात जागावाटपाचा फॉर्म्युला जाहीर होण्याची शक्यता सूत्रांनी वर्तविली आहे.
Nagpur constituency : भाजपचं ठरलं! पश्चिम, उत्तरचा तोडगा निघाला?
एबीफार्म देण्यात आलेल्या आमदारांची यादी
हडपसर-चेतन तुपे
उदगीर- संजय बनसोडे
वडगाव शेरी- सुनील टिंगरे
आंबेगाव- दिलीप वळसे पाटील
शहापूर- दौलत दरोडा
चंदगड- राजेश पाटील
इंदापूर- दत्तात्रय भरणे
कोपरगाव- आशुतोष काळे
इगतपुरी -हिरामण खोसकर
दिंडोरी- नरहरी झिरवळ
येवला- छगन भुजबळ
नवापूर- भरत गावित
अहमदपूर- बाळासाहेब पाटील
जुन्नर- अतुल बेनके
कळवण सुरगाणा-नितीन पवार
पुसद- इंद्रनील नाईक