BJP : भाजपने नागपुरातील तीन जागांवर उमेदवार जाहीर केले आहेत. अद्याप तीन जागांचा तिढा कायम आहे. उत्तर, पश्चिम आणि मध्यचा निर्णय नेत्यांनी घेतलेला असला तरीही अद्याप नावे जाहीर झालेली नाहीत. उत्तर नागपुरात माजी आमदार डॉ. मिलिंद माने यांनाच संधी मिळण्याची शक्यता जास्त आहे. तर पश्चिममधून माजी महापौर दयाशंकर तिवारी यांना विकास ठाकरेंच्या विरोधात लढण्यास सांगितले जाऊ शकते.
पश्चिम नागपूरमध्ये भाजपची विजयाची घोडदौड विकास ठाकरे यांनी थांबवली होती. 2019 मध्ये त्यांनी पश्चिममध्ये काँग्रेसचा झेंडा गाडला. लोकसभेत विकास ठाकरे यांनी नितीन गडकरी यांना टक्कर दिली. त्यामुळे त्यांची बाजू भक्कम असल्याचे स्पष्ट आहे. पण तरीही भाजपने याठिकाणी अनुभवी व ज्येष्ठ नेत्याला संधी देण्याचा विचार केल्याचे सूत्र सांगतात. माजी महापौर दयाशंकर तिवारी गेल्या अनेक दिवसांपासून तयारीला लागले आहेत. त्यांनी आपला मुक्कामही पश्चिम नागपुरात हलवला आहे.
इच्छा व्यक्त
विशेष म्हणजे पश्चिम नागपुरातून लढण्यासाठी माजी महापौर माया ईवनाते, माजी महापौर नंदा जिचकार, नरेश बरडे, प्रगती पाटील, जयप्रकाश गुप्ता यांनीही नेत्यांकडे लढण्याची इच्छा व्यक्त केली आहे. यातील सगळेच भाजपचे निष्ठावान समजले जातात. त्यामुळे दयाशंकर तिवारी यांचे नाव जाहीर झाले. तरीही बंडखोरीची शक्यता कमीच आहे. अशात दयाशंकर तिवारी यांच्या समर्थकांना उमेदवारी मिळाली आहे, फक्त घोषित झालेली नाही, असे सांगायलाही सुरुवात केली आहे. त्यामुळे इच्छुकांनी तलवार म्यान केली असल्याचे समजते.
चर्चा
उत्तर नागपुरात माजी मंत्री डॉ. नितीन राऊत विद्यमान आमदार आहे. त्यांच् याविरोधात माजी आमदार डॉ. मिलिंद माने यांचे नाव निश्चित झाल्याची चर्चा आहे. त्यांच्या समर्थकांनी जल्लोषही सुरू केल्याचे समजते. उत्तर नागपुरात बहुतांश दलित समाजाची मते आहेत. त्यामुळे भाजप विचाराच्या उमेदवाराला जोर लावावा लागणार आहे. 2014 मध्ये डॉ. मिलिंद माने यांनी उत्तर काबीज केले होते. पण, 2019 मध्ये पुन्हा नितीन राऊत यांनी गतवैभव प्राप्त केले.
दरम्यान, लोकसभा निवडणुकीत संविधान बदलाच्या मुद्याने भाजप व महायुतीचे मोठे नुकसान केले. त्याचा प्रभाव विधानसभा निवडणुकीतही कायम राहू शकतो. त्यामुळे उत्तर नागपुरातील मतदारांना आकर्षित करण्याकरिता भाजपला मोठा डाव खेळावा लागणार आहे, हे स्पष्ट आहे. उत्तर नागपुरात माजी उपमहापौर दीपराज पार्डीकर, धर्मपाल मेश्रामदेखील लढण्यास इच्छुक आहेत. अशात भाजपचे नेते कुणाला झुकते माप देणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Assembly Election : बोले तैसा न चाले… म्हणे आमचे व्हावे भले!
मध्य नागपुरात पुन्हा कुंभारे?
मध्य नागपूरला होल्डवर ठेऊन भाजपने विद्यमान आमदार विकास कुंभारे यांची धाकधुक वाढवली आहे. त्यांच्या ऐवजी प्रवीण दटके यांना संधी दिली जाईल, असे म्हटले जात आहे. पण सोमवारी दुपारी विकास कुंभारेंनाच उमेदवारी देण्याचे निश्चित झाले आहे, अशी चर्चा भाजपच्या गोटात होती. त्यामुळे फडणवीस आणि बावनकुळे यांच्या डोक्यात नेमके काय चालले आहे, हे अद्याप अस्पष्ट आहे.