Shiv Sena Vs Congress : 2021 साली प्रदर्शीत झालेला ‘पुष्पा’ हा सिनेमा चांगलाच गाजला. त्यातही अभिनेता अल्लू अर्जुन याचा ‘झुकेगा नही साला’ हा संवाद तर अफाट लोकप्रिय झाला. त्या काळी राजकारण्यांनाही हा डॉयलॉग मारण्याचा मोह आवरत नव्हता. तेव्हा हा केवळ मनोरंजनाचा विषय होता. पण आता नागपुरातील काँग्रेस नेते ‘पुष्पा’च्या भूमिकेत आल्याचे दिसत आहे. दक्षिण नागपूरच्या जागेबाबत ‘झुकेगा नही साला’ची भूमिका काँग्रेस नेत्यांनी घेतली आहे. तर शिवसेनेनेही स्वबळाची तयारी दाखवली आहे. सोमवारी सायंकाळपर्यंत निर्णय झाला नाही तर आघाडीतून बाहेर पडण्याचे संकेत शिवसनेने दिले आहेत.
बारा जागांवरील वाद
महाराष्ट्रातील बारा जागांवरील वाद चिघळल्याने शिवसेना ठाकरे गट स्वबळावर लढण्याची भाषा करू लागला आहे. उद्धव ठाकरे यांनीच तसे संकेत दिले आहेत. त्यामुळे राज्यात पहिली विधानसभा निवडणूक लढण्यापूर्वीच आघाडीत बिघाडी होणार असे दिसत आहे. शिवसेनेचे नेते आले तर सोबत, नाही तर शिवाय, असेही काँग्रेसने ठरवल्याचे सूत्र सांगतात. असे झाल्यास त्याचा थेट फायदा महायुतीला होईल. त्याचवेळी परिवर्तन आघाडीदेखील महाविकास आघाडी तुटण्याची प्रतीक्षा करीत आहे.
दक्षिण नागपूर, रामटेक, कामठीसह महाराष्ट्रातील एकूण 12 जागांवर शिवसेना ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये वाद ताणला जात आहे. गेल्या काही दिवसांपासून हा वाद अधिकच वाढत आहे. विशेष म्हणजे फक्त महाराष्ट्रातच तिन्ही पक्षांनी एकत्र बसून हा तिढा दूर करणे अपेक्षित होते. पण हा वाद दिल्लीपर्यंत पोहोचला. प्रश्न काँग्रेस दरबारी गेल्यामुळे शिवसेनेचा तिळपापड झाला आहे. अशात शिवसेना जिद्दीला पेटली आहे आणि काँग्रेसने आता ‘झुकेगा नही साला’ असा निर्धारच केला आहे. काँग्रेसच्या महाराष्ट्रातील नेत्यांनी केंद्रीय नेतृत्वाला कुठल्याही परिस्थितीत झुकायचं नाही, अशी भूमिका घेतली आहे.
दरम्यान, उद्धव ठाकरे यांनी स्वबळावर लढण्याचे संकेत दिले आहेत. काँग्रेस आपल्या निर्धारावर ठाम आहे. त्यामुळे आता सर्व 288 जागा स्वबळावर लढण्याचे संकेत शिवसेनेने दिले आहे. सोमवारी संध्याकाळपर्यंत तिढा सुटला नाही आणि काँग्रेस एक पाऊल मागे गेले नाही तर शिवसेना आपली ताकद दाखवेल, असा इशाराही शिवसेनेने काँग्रेस नेत्यांना दिल्याचे समजते.
शिवसेनेने नागपूर जिल्ह्यातील दक्षिण नागपूर आणि कामठी या दोन मतदारसंघांसाठी प्रचंड आग्रह धरला आहे. काँग्रेसने दोन्ही जागांवर आपणच दावेदार असल्याचे म्हटले आहे. रामटेकमध्ये सर्व निवडणुकांमध्ये शिवसेना आणि भाजपच्या विरोधात काँग्रेसच लढले आहे. त्यामुळे ही जागा काँग्रेसकडेच राहील, असा आग्रह नेत्यांनी धरला आहे. तर रामटेक हा शिवसेनेचा गड आहे. त्यामुळे ठाकरे गट दावेदारी करत आहे. दक्षिण नागपूरमध्ये तर शिवसेना ज्या उमेदवारासाठी आग्रही आहे, त्याला अवघी 4000 मते पडली होती. पण तरीही ठाकरे गट आग्रही आहे. त्यामुळे काँग्रेस आक्रमक आहे.
आता झुकायचं नाही
वादग्रस्त जागांचा वाद दिल्लीत पोहोचला आहे. पण, काँग्रेसच्या महाराष्ट्रातील नेत्यांनी आता झुकायचं नाही, अशी स्पष्ट भूमिका केंद्रीय नेतृत्वाकडे मांडली आहे. त्यामुळेच वाद चिघळल्याचे बोलले जात आहे. शिवाय काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनीदेखील शिवसेनेला नागपुरातील अस्तित्वावरून डिवचले होते.