Maharashtra Politics : आपल्या आगळ्यावेगळ्या वक्तृत्वासाठी प्रसिद्ध असलेले आमदार बच्चू कडू यांनी सगळ्यांनाच इशारा देऊन टाकला आहे. सोमवारी (21 ऑक्टोबर) नागपुरात बोलताना त्यांनी हा बच्चू कडू न भिणारा आहे भिडू असा संदेशच महाविकास आघाडी आणि महायुतीला देऊन टाकला आहे. राजू शेट्टी, संभाजी राजे यांच्यासोबत आम्ही बसून बैठक घेणार आहोत. ज्या मजबूत जागा आहेत, ती यादी मंगळवारी (22 ऑक्टोबर) जाहीर करणार आहेत. प्रसंगी सोमवारी (21 ऑक्टोबर) सायंकाळी देखील ही यादी जाहीर होऊ शकते, असे ते म्हणाले.
कोणतेही मोठे नेते असले तरीही त्यांच्या विरोधात परिवर्तन महाशक्ती उमेदवार देणार आहे. आम्हाला कसली भीती नाही. बच्चू कडू कधीही भीत नाही, असं त्यांनी ठामपणे नमूद केलं. भाजप आपल्याच उमेदवाराला बकरा करीत आहे, अशी सध्या स्थिती आहे. भाजपच्या खांद्यावर ‘पंजा’ फडकवण्याची स्थिती एकंदरीत आपल्या मतदारसंघात आहे. जिल्ह्यात भाजपा ठेवायचीच नाही, अशी रवी राणा आणि नवनीत राणा दाम्पत्यानं व्यवस्था निर्माण केली आहे, अशी टीका त्यांनी केली.
तायडे अगदीच नवीन
प्रवीण तायडे हे नवा कार्यकर्ता आहेत. त्यांनी स्वतःवर अनेक गुन्हे दाखल करून घेतले आहेत. ते जुने कार्यकर्ते आहेत. केंद्रात सत्ता असताना नवखे कार्यकर्ते देणे हा भाजपचा स्पष्ट पराभव आहे. अचलपूरनंतर बच्चू कडूने महाराष्ट्रात संघटन निर्माण केलं. त्यानंतर दोन्ही मोठ्या पक्षांना बच्चू कडू नको आहे. त्यामुळंच अचलपूरमध्ये भाजप-काँग्रेस युती म्हणून लढणार आहे, असा दावाही त्यांनी केला. महाविकास आघाडीचा सर्व खेळ खुर्चीसाठी चालला आहे. त्यांना सामान्य माणसाशी काही घेणेदेणे नाही. त्यांच्यात प्रचंड फूट पडणार आहे. कालांतरानं मारामारी होणार आहेत, अशी टीकाही बच्चू कडू यांनी केली.
रामटेक, वरोरा, आर्वी यासह आणखी तीन ते चार महत्त्वाच्या जागा परिवर्तन महाशक्ती विदर्भात लढणार आहे. चांगले उमेदवार मिळाल्यावर यादी जाहीर करणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. सच्चा कार्यकर्त्यांची किंमत लोकांना आणि पक्षांना कोणालाच राहिलेली नाही. त्यामुळे कार्यकर्ते बऱ्याचदा बोलतात. आपण एवढी मेहनत करतो. निवडणूक आली की जात-पात धर्म, पंथ, पैसा पाहून उमेदवार निवडला जातो, याबद्दल बच्चू कडू यांनी खेदही व्यक्त केला.
बच्चू कडू यांचा गृहजिल्हा असलेल्या अमरावतीत सध्या राणा विरुद्ध कडू असं युद्ध पुन्हा सुरू झालं आहे. अलीकडेच बच्चू कडू यांनी युवा स्वाभिमान पक्षाचे संस्थापक आमदार रवी राणा यांना मोठा धक्का दिला आहे. युवा स्वाभिमान पक्षाचे मुख्य प्रवक्ते जितू दुधाने यांनी राणा यांना रामराम ठोकला. राणा यांच्यासोबत 17 वर्षांपासून काम करीत होतो. पण आता घुसमट होत आहे, असं म्हणत दुधाने यांनी बच्चू कडू यांच्या पक्षात प्रवेश केला.