BJP : उपराजधानीतील सहाही विधानसभा मतदारसंघांत महायुतीकडून भाजपनेच लढण्याची तयारी चालविली आहे. मागील वेळेस भाजपने गमावलेल्या व अनुसूचित जातीसाठी राखीव असलेल्या उत्तर नागपूर मतदारसंघातून पक्षाचा उमेदवार कोण असेल, याबाबत मोठा प्रश्न कायम आहे. विशेष म्हणजे कार्यकर्त्यांनी मतदारसंघातील स्थानिक उमेदवारच द्यावा, अशी भूमिका घेतली आहे.
अशा स्थितीत शहरातील पदाधिकाऱ्यांना देखील अद्यापपर्यंत एकाही नावाबाबत एकमत करता आलेले नाही. त्यामुळे राज्य व केंद्रीय नेतृत्वाकडेच सगळ्यांचे डोळे लागले आहे. उत्तर नागपूर काँग्रेसचाच गड राहिलेला आहे. पण भोला बाधेल (1995) आणि डॉ. मिलिंद माने (2014) यांच्या रुपाने भाजपने दोनदा झेंडा फडकवला आहे. त्यामुळे उत्तर मध्ये आपण बाजी मारू शकतो, असा भाजपला विश्वास आहे.
मुख्य म्हणजे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी उत्तर नागपूरचा चेहरा मोहरा बदलला. तरीही लोकसभेत विकास ठाकरे यांच्या तुलनेत येथून 30 हजार मते त्यांना कमी पडली होती. अशा परिस्थितीत विधानसभेत विजय खेचून आणण्याचे आव्हान भाजपच्या उमेदवारापुढे असणार आहे.
“या”जमातीची संख्या जास्त
अनुसूचित जाती, जमातीच्या मतदारांची संख्या उत्तर नागपुरात जास्त आहे. हा मतदारसंघदेखील अनुसूचित जातीसाठी राखीव आहे. गेल्या काही वर्षांत सिंधी, पंजाबी व उत्तर भारतीय मतदारांची संख्यादेखील वाढली आहे. काँग्रेसकडून माजी मंत्री व विद्यमान आमदार नितीन राऊत यांची प्रबळ दावेदारी आहे. मात्र, भाजपकडून कोणाचा चेहरा असेल, याबाबत विविध कयास अद्यापही वर्तविण्यात येत आहेत. 2014 साली मिलिंद माने उत्तर नागपुरातून निवडून आले होते. मात्र, 2019 मध्ये राऊत यांनी माने यांना 20 हजारांहून अधिक मतांनी हरविले होते.
या वेळी देखील माने यांनी उमेदवारीसाठी दावा केला आहे. मात्र, माने यांच्यासोबतच डॉ. संदीप शिंदे, माजी उपमहापौर संदीप जाधव, पक्षाचे माजी मंत्री अविनाश धमगाये, संदीप गवई यांनीदेखील उमेदवारीसाठी इच्छा प्रदर्शित केली आहे. प्रदेश उपाध्यक्ष ॲड. धर्मपाल मेश्राम यांच्या नावाचीदेखील चर्चा आहे.
चांगली पकड
मेश्राम, धमगाये यांच्यासारखे कार्यकर्ते चळवळीतून वर आले आहेत व तळागाळात त्यांची चांगली पकड आहे. मात्र मेश्राम, शिंदे, जाधव, गवई हे मतदारसंघाच्या बाहेरील आहेत. माने यांना संधी मिळून देखील त्यांनी मतदारसंघासाठी काम केले नसल्याची कार्यकर्त्यांची ओरड आहे. आता खरोखरच कार्यकर्त्यांच्या मागणीचा विचार करून स्थानिक उमेदवारच येथे देण्यात येतो का, याकडे उत्तर नागपुरातील राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.