Assembly Election : महाविकास आघाडीमध्ये सध्या जागा वाटपावरून प्रचंड तणाव आहे. हा तणाव आता इतका विकोपाला गेला आहे, की नाना पटोले बैठकीला आले तर आम्ही चर्चा करणार नाही, अशी भूमिका शिवसेनेने घेतली आहे. त्यामुळे सध्या महाविकास आघाडीमध्ये चर्चेचे गुऱ्हाळ थांबले आहे. या साऱ्या तणावाच्या ‘फसाद की जड’ अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघ आहे. या मतदारसंघाबाबत ‘द लोकहित’चे वृत्त खरे ठरले आहे.
काँग्रेसकडून अकोला पश्चिम विधानसभा मतदार संघासाठी साजिद खान पठाण यांनाच उमेदवारी दिली जाईल, असे वृत्त केवळ ‘द लोकहित’ने प्रकाशित केले होते. अकोल्यातून साजिद खान पठाण यांच्या नावाला प्रचंड विरोध आहे. अकोल्यात झालेल्या दंगलीतील आरोपी म्हणून साजिद खान पठाण यांच्याकडे पाहिले जाते. त्यामुळे काँग्रेसमधील अनेक नेत्यांनी साजिद खान यांची तक्रार केली आहे. लोकसभा निवडणुकीच्या वेळेला अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक जाहीर झाली होती. मात्र काँग्रेस मधीलच काही नेत्यांनी उच्च न्यायालयात धाव घेत, या पोटनिवडणुकीला ब्रेक लावला होता.
नेते ठाम
त्यानंतरही साजिद खान पठाण यांना उमेदवारी मिळू नये यासाठी काँग्रेस मधून अनेकांनी फिल्डिंग लावली. पण काँग्रेसचे प्रदेश पातळीवरील नेते काही झालं तरी साजिद यांनाच उमेदवारी देणार यावर ठाम होते. त्यामुळे कितीही विरोध झाला तरी साजिद यांनाच उमेदवारी मिळेल, असे वृत्त ‘द लोकहित’ने प्रकाशित केले होते. प्रसंगी साजिद खान पठाण यांच्या उमेदवारीसाठी काँग्रेस आक्रमक होऊ शकते, असेही या वृत्तात म्हटले होते. ‘द लोकहित’ने या वृत्तात नमूद केलेली प्रत्येक बाब आता जशीच्या तशी खरी ठरत आहे.
अकोला पश्चिम विधानसभा मतदार संघाच्या जागेसाठी काँग्रेस विशेषतः प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे प्रचंड आग्रही आहेत. महाविकास आघाडीमध्ये काही जागाच्या वाटपावरून तणाटणी सुरू झाली. मात्र या सर्वात प्रमुख कारण ठरला तो अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघच. वादामुळे परिस्थिती इतकी विकोपाला गेली की, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार नाना पटोले हे महाविकास आघाडीच्या पत्रकार परिषदेतून निघून जाणार होते. परंतु काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी पटोले यांना अक्षरशः हात धरून खाली बसवले.
तक्रारी नंतर राग
शिवसेनेकडून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची तक्रार झाली आहे. पटोले हे जागा वाटपात अडवणुकीची भूमिका घेत आहे, अशी ही तक्रार आहे. त्यामुळे पटोले असतील तर चर्चा करणार नाही अशी भूमिका शिवसेनेने घेतली आहे. अशात जोपर्यंत अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघाचा निकाल लागत नाही तोपर्यंत महाविकास आघाडीमधील चर्चा पुढे सरकणार नाही, अशी सोमवारची (21 ऑक्टोबर) परिस्थिती आहे. अकोला पश्चिमच्या जागेवर शिवसेना एक पाऊल मागे येईल असे अजिबात वाटत नाही. त्यामुळे महाविकास आघाडीमध्ये काँग्रेसलाच आता बॅकफूटवर जावे लागण्याची शक्यता आहे.
नाना पटोले बाजूला
जागावाटपाच्या चर्चेतून नाना पटोले यांना बाजूला केल्यानंतर कदाचित अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघ शिवसेनेकडे येऊ शकतो. परंतु यामुळे महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये नक्कीच खटाई पडेल. त्यामुळे महाविकास आघाडीला निवडणुकीत यश मिळालंच तर त्याचे परिणाम निवडणुकीनंतर दिसण्याची दाट शक्यता आहे. महाविकास आघाडीमध्ये नाना पटोले आणि उद्धव ठाकरे हे दोघेही मुख्यमंत्री पदाचे दावेदार आहेत. त्यामुळे यापैकी कोणीही मुख्यमंत्री झाल्यास दुसऱ्या पक्षाला कोणत्या परिस्थितीला तोंड द्यावे लागू शकते, हे नव्याने सांगण्याची गरज नाही.