Assembly Election : राष्ट्रवादी काँग्रेस फुटल्यानंतर माजी मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी अजित पवार यांच्या गटात जाण्याचा निर्णय घेतला. मात्र त्यांनी आता निर्णय बदलला आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत प्रवेश घेतला. त्यामुळे या मतदारसंघातून महायुतीतील इच्छूक उमेदवारांनी सुटकेचा निःश्वास टाकला आहे. त्यांनी टाईट फिल्डिंग लावायला सुरूवात केली आहे. मात्र सध्या तरी डॉ. शिंगणेंच्या घरवापसीमुळे महायुतीचा उमेदवार कोण? यात खलबते सुरू झाली आहेत. त्यात शिवसेना शिंदे गटाचे माजी आमदार डॉ. शशिकांत खेडेकर आणि भाजपचे डॉ. सुनील कायंदे हे दोघे आघाडीवर आहेत.
राजकीय वातावरण गरम
अॅड. नाझेर काझी यांनी आपला दावाही कायम असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे राजकीय वातावरण सद्या चांगलेच गरम आहे. दुसरीकडे, कु. गायत्री शिंगणे यांनीदेखील बंडाचे निशाण फडकावले आहे. त्या आता अपक्ष लढणार की अजित पवारांच्या राष्ट्रवादीत जाऊन घड्याळ हाती बांधणार, याची उत्सुकता लागलेली आहे. शिवसेना शिंदे गटाचे माजी आमदार डॉ. शशिकांत खेडेकर यांनी तर मतदारसंघात प्रचाराला सुरुवातही केली आहे. त्यांनी केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांच्या उपस्थितीत साखरखेर्डा येथे कार्यकर्त्यांचा मेळावा घेऊन आपणच संभाव्य उमेदवार असल्याचे सांगितले आहे.
प्रतापराव जाधव यांचे पुतणे योगेश जाधव यांनीसुध्दा लोकसभा निवडणुकीनंतर मतदारसंघात फिरुन भावी उमेदवार म्हणून प्रचार सुरू केला आहे. भाजपचे ओबीसी सेलचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. सुनील तोताराम कायंदे पाच वर्षांपासून मोर्चेबांधणी करीत आहेत. तेही आता किती दिवस थांबायचे?, असा प्रश्न विचारत आहेत. ‘यावेळी भाजपकडून हा मतदारसंघ सोडविण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. जोपर्यंत भाजप निवडणूक लढणार नाही तोपर्यंत हा मतदारसंघ भाजपकडे येणार नाही,’ असा विचार करून त्यांनी पक्ष बांधणी सुरू केली आहे.
भाजपकडून उमेदवारी
भाजपाकडून जिल्हा अध्यक्ष डॉ. गणेश मान्टे, विनोद वाघ, अंकुर देशपांडे यांनीसुध्दा उमेदवारी मिळविण्यासाठी फिल्डिंग लावली आहे. तर अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष अॅड. नाझेर काझी यांनी या मतदारसंघावर हक्क सांगितला आहे. लवकरच उमेदवार निश्चित होईल, असे सूतोवाच केले आहे. अॅड. काझीदेखील येथून लढण्यास इच्छूक आहेत. एकूणच तीन्ही पक्ष प्रबळ दावेदार आहेत. मात्र या मतदारसंघात डॉ. शशिकांत खेडेकर यांनी चारवेळा निवडणूक लढविलेली आहे. एकवेळा विजयही मिळविला आहे. त्यांची पकड मजबूत असून, त्यांना उमेदवारी मिळावी, अशी अपेक्षा शिवसेना गोटातून व्यक्त केली जात आहे.
डॉ. शिंगणे यांच्या पक्षबदलाने महाविकास आघाडीला सिंदखेडराजा-देऊळगावराजा मतदारसंघातच नाही तर जिल्हाभरात बळकटी आली आहे, असं बोललं जात आहे. यानिमित्ताने शिवसेना (ठाकरे) पक्षाचे नेते, काँग्रेसचे नेते व राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे डॉ. शिंगणे, माजी आ. रेखाताई खेडेकर यांच्यासह इतर प्रबळ नेत्यांमुळे जिल्ह्यातील सर्वच जागांवर महाआघाडीला फायदा होणार आहे, असा विश्वास महाविकास आघाडीला आहे.
मागून आली अन शायनी झाली..
पक्षात येऊन अद्याप वर्षही व्हायचे आहे, पण पक्षासाठी बरेच काही केल्याचा दावा कु. गायत्री शिंगणे यांनी केला आहे. त्यांनीही बंडाचे निशाण फडकवले आहे. शरद पवारांनी आपल्याला तिकीट दिले नाही तर आपण अपक्ष उभे राहणार अशी घोषणा त्यांनी केली आहे. ‘ताई मागून आली अन शायनी झाली’ अशी प्रतिक्रिया पक्षातील नेते व कार्यकर्ते देताना दिसत आहे.