महाराष्ट्र

Ramtek Constituency : मल्लिकार्जुन रेड्डींचं काय करायचं?

Nagpur BJP : रामटेकबाबतच्या बैठकीत अनेकांचा प्रश्न

Assembly Election : महायुतीसमोर राज्यातील काही मतदारसंघांमध्ये पेच निर्माण झाला आहे. या मतदारसंघांपैकी नागपूर जिल्ह्यातील रामटेक मतदारसंघही आहे. आमदार आशिष जयस्वाल यांच्या विरोधात भाजपचे माजी आमदार मल्लिमार्जुन रेड्डी यांनी दंड थोपटले आहे. रेड्डी यांचा संताप इतका विकोपाला गेला की, त्यांनी बोलण्याच्या ओघात फडणवीस, बावनकुळे झोपले आहेत का, असं वक्तव्य करून टाकलं. त्यानंतर रेड्डी यांना भाजपमधून सहा वर्षांसाठी निलंबित करण्यात आलं आहे.

मल्लिकार्जुन रेड्डी यांच्या निलंबनानंतर रामटेकमध्ये राजीनामा सत्र सुरू झालं आहे. रेड्डी यांनी त्यानंतर नागपुरात पत्रकार परिषद घेतली. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे आपण समर्थक आहोत. गडकरींच्या समर्थकांवर सध्या अन्याय केला जात आहे, असा खळबळजनक आरोपही रेड्डी यांनी केला. पत्रकार परिषदेत रेड्डी यांनी गडकरी यांच्याशी संबंधित गिरीश व्यास आणि प्रा. अनिल सोले यांचंही नाव घेतलं. त्यामुळे पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात चर्चेला ऊत आला आहे. गडकरी यांना डावललं जात आहे का, असा प्रश्न सगळ्यांना पुन्हा पडला आहे.

फडणवीसांकडून बैठक

रामटेक विधानसभा मतदारसंघातील भाजपमध्ये हा वाद सुरू असतानाच देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी (20 ऑक्टोबर) नागपुरात बैठक घेतली. या बैठकीत फडणवीस आणि बावनकुळे यांनी एका पाठोपाठ दोन मतदारसंघांचा आढावा घेतला. त्यात सकाळी साडेआठच्या सुमारास फडणवीस यांनी रामटेक मतदारसंघातील पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली. ‘देवगिरी’ बंगल्यावर ही बैठक पार पडली. त्यावेळी काहींनी मल्लिकार्जुन रेड्डी याचं काय करायचं असा प्रश्न उपस्थित केला. मात्र दोन्ही नेत्यांनी यावर अधिक भाष्य करण्याचं टाळलं. रामटेक विधानसभा मतदारसंघातून आशिष जयस्वाल यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब झालं आहे. त्यासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घोषणाही केली आहे. अधिकृत यादीत त्यांचं नाव येणं तेवढं बाकी आहे.

Savner Constituency : सुनिल केदार मैदानात नसले तरी भाजपला टेन्शन

शिंदे यांनी जयस्वाल यांचं नाव जाहीरपणे घेताच भाजपमध्ये अस्वस्थता पसरली. आशिष जयस्वाल वगळता अन्य कोणालाही उमेदवारी द्या, असं मल्लिकार्जुन रेड्डी आणि त्यांच्या समर्थकांचं म्हणणं आहे. निलंबित झाल्यानंतर रेड्डी यांनी रामटेकमध्ये महायुतीची जागा धोक्यात असल्याचा इशाराही देऊन टाकला आहे. त्यामुळं रेड्डी हे बंडखोरी करतील असं निश्चित मानलं जात आहे. आपण समर्थकांशी चर्चा करीत आहोत. त्यानंतर अर्ज भरण्याबाबत ठरवू असं त्यांनी सांगितलं आहे. पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी आपल्या पाठीवर हात ठेवावा, असं ते म्हणाले. त्यामुळे त्यांना या प्रकरणात नितीन गडकरी यांची मध्यस्थी अपेक्षित असल्याचा संदेश त्यांनी दिला आहे. मात्र यासंदर्भात नितीन गडकरी, देवेंद्र फडणवीस आणि चंद्रशेखर बावनकुळे यांच्यापैकी कोणीही प्रतिसाद न दिल्यानं रेड्डी बंडखोरीसाठी रेडी झाले आहेत.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!