Assembly Election : नागपूर जिल्हा मध्यवर्ती बँक घोटाळ्याचे प्रकरण काँग्रेसचे माजी मंत्री सुनिल केदार यांना भोवले आहे. सध्या केदार निवडणुकीच्या मैदानात नसले तरी सावनेरच्या जागेची चिंता भाजपला सतावत आहे. या भागात केदार यांचं वर्चस्व आहे. लोकसभा निवडणुकीत प्रचंड प्रयत्न केल्यानंतर काँग्रेसचे श्यामकुमार बर्वे यांचा विजय झाला. रश्मी बर्वे यांच्या जात प्रमाणपत्राच्या मुद्द्यावर उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयानं जात पडताळणी समितीला झापलं आहे. दंडही ठोठावला आहे. त्यामुळं काँग्रेसनं या भागात मोठ्या प्रमाणावर जनजागृती सुरू केली आहे. भाजपच्या इशाऱ्यावरूनच एका महिलेवर अन्याय करण्यात आला, अशा आशयाचा हा प्रचार आहे.
सावनेरमध्ये भाजपसमोर विजयाचं मोठं आव्हान निर्माण होणार असल्यानं आता नागपुरात बैठकसत्र सुरू झालं आहे. रविवारी (20 ऑक्टोबर) उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सावनेरमधील भाजपच्या जवळपास सर्वच पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली. ‘देवगिरी’ बंगल्यावर सकाळी साडेआठ वाजताच ही बैठक घेण्यात आली. प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रशेखर बावनकुळे या बैठकीला उपस्थित होते. या बैठकीत प्रामुख्यानं काँग्रेसचा उमेदवार कोण असू शकतो, यावर चर्चा झाली आहे.
भाजप तयारीत
सावनेर विधानसभा मतदारसंघात गेले तीन टर्म सुनिल केदार हेच आमदार आहेत. नागपूर जिल्ह्यातील कळमेश्ववर आणि सावनेर या दोन तालुक्यांचा या मतदारसंघात समावेश आहे. आतापर्यंत केदार यांनी या मतदारसंघात आपली पाळेमुळे घट्ट रोवली आहे. केदार 2024 मधील विधानसभा निवडणूक रिंगणात नसतील. तीन दशकांनंतर प्रथमच केदारांच्या उमेदवारीशिवाय ही निवडणूक होणार आहे. रामटेक लोकसभा मतदारसंघात केदार हेच ‘किंगमेकर’ ठरले. त्यामुळे केदार सांगतील त्याच उमेदवाराचं नाव काँग्रेस फायनल करणार आहे. अशात भाजपला केदार यांना रोखण्याची चिंता सतावत आहे.
सुनिल केदार यांना शह देण्यासाठी भाजपकडून अद्याप कोणताही चेहरा स्पष्ट झालेला नाही. त्यामुळे सद्य:स्थितीत काम करायचं आहे, पण नेमकं कोणासाठी करायचं आहे याबद्दल अस्पष्टता आहे. असं असलं तरी सावनेरमध्ये भाजपच्या सर्वच नेत्यांनी विजयाचा संकल्प केला आहे. प्रचंड परिश्रम करणार असल्याची तयारी सावनेरमधील सर्वच भाजप नेत्यांनी दर्शविली आहे. अनेकांनी या बैठकीत संभाव्य उमदेवार कोण असेल याचा कानोसा घेण्याचा प्रयत्न केला. मात्र फडणवीस आणि बावनकुळे यांनी स्पष्टपणे कोणतेही संकेत देण्याचं टाळलं. त्यामुळे सावनेरमध्ये कोण उमेदवार असणार याबद्दल संभ्रम कायमच आहे. तूर्तास फक्त बैठकसत्र सुरू आहे.