Political war : राज्यात विधानसभा निवडणूक अवघ्या एक महिन्यांवर येऊन ठेपली आहे. अशातच आरोप-प्रत्यारोपांच्या जोरदार फैरी राजकीय नेत्यांकडून झाडल्या जात आहेत. वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर यांनी 18 ऑक्टोबर रोजी केलेल्या खळबळजनक दाव्यानंतर पुन्हा एकदा निशाणा साधला आहे. आंबेडकर यांनी निवडणुकीपूर्वीच शरद पवार आणि दाऊद यांच्या भेटीचा मुद्दा महाराष्ट्र आणि संपूर्ण देशासमोर मांडला. महाराष्ट्राला अंडरवर्ल्डचे राज्य हवे आहे का? असा प्रश्न उपस्थित करत प्रकाश आंबेडकर यांनी असे नको असेल, तर विचारपूर्वक मतदान करण्याचे आवाहन ट्विटद्वारे केले आहे.
राजकीय वातावरण तापलं
अवघ्या महिन्याभरावर आगामी विधानसभा निवडणुक येऊन ठेपली आहे. त्यापूर्वी राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. एकीकडे महायुती आणि महाविकास आघाडीत सध्या जगा वाटपावरून चर्चा सुरू आहे. अद्यापही उमेदवार जाहीर झालेले नाहीत. तरीही राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. अशात आंबेडकर यांनी पत्रकार परिषद घेत शरद पवार यांच्यावर गंभीर आरोप केले. आंबेडकर यांनी, शरद पवार 1988-91 या काळात मुख्यमंत्री असताना केलेल्या विदेश दौऱ्यावर प्रश्नचिन्ह लावले.
आरोप कायम
पवारांच्या एका दौऱ्यामध्ये त्यांनी दाऊद इब्राहिमची भेट घेतल्याचा गौप्यस्फोट त्यांनी केला होता. पवार लंडनला गेले होते. त्यानंतर ते कॅलिफोर्नियाला गेले. कॅलिफोर्नियामधून पवार पुन्हा लंडनला आले. दोन दिवस लंडनमध्ये थांबले. त्यानंतर दुबईला गेले. दुबईमध्ये त्यांची दाऊद इब्राहिमसोबत विमानतळावर भेट झाली. त्यांना तिथे सोन्याचा हार घालण्यात आल्याचा दावाही प्रकाश आंबेडकर यांनी केला होता. आहे. त्यानंतर आता शनिवारी (19 ऑक्टोबर) प्रकाश आंबेडकर यांनी ट्विटरवर पोस्ट केली आहे.
प्रकाश आंबेडकर यांनी केलेल्या ट्विट मध्ये म्हटलं की, येणारी पाच वर्षे मुंबई आणि देशासाठी खूप महत्वाची आहेत. अंडरवर्ल्डचे मित्र पुन्हा सत्तेत आले तर माफिया पुन्हा मुंबईवर राज्य करतील. देशाची सुरक्षा धोक्यात आलेली असेल. ज्याप्रमाणे बाबासाहेबांनी चीनबद्दल चिंता व्यक्त केली होती. त्याचप्रमाणे आपण काल देशासमोर चिंता व्यक्त केली आहे. बाबासाहेबांनी चीनच्या विस्तारवादी योजनांबद्दल सावध केले होते. परंतु, काँग्रेसने बाबासाहेबांचे ऐकले नाही. त्यानंतर काय झाले हे सर्वांना माहिती आहे, असेही आंबेडकर म्हणाले.
विचाराची वेळ
आंबेडकर म्हणाले, काही गाढव विचारत आहेत की, शरद पवार आणि दाऊद इब्राहिम भेट हा 30 वर्षे जुना विषय आहे. तो आता का पुढे आणला. त्यांच्यासाठी आपल्याकडे सरळ उत्तर आहे. मुंबई आणि देश धोक्यात आहे. बाबा सिद्दीकींची हत्या मुंबईचा काळा अपराधिक भूतकाळ आणि अंडरवर्ल्डचा फ्लॅशबॅक आहे. सगळ्यांना माहिती आहे की, अंडरवर्ल्डने मुंबईत कोणाच्या मदतीने राज्य केले, असे ते म्हणाले.
Yavatmal Politics : येरावार, राठोड, नाईक, उईकेंचं भवितव्य ठरलं
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीला अजून एक महिना बाकी आहे. आपण निवडणुकीपूर्वीच हा मुद्दा महाराष्ट्र आणि संपूर्ण देशासमोर मांडला आहे. महाराष्ट्राला अंडरवर्ल्डचे राज्य हवे आहे का? जर नसेल तर विचारपूर्वक मतदान करण्याचे आवाहनही आंबेडकर यांनी केले आहे. आंबेडकर यांनी केलेल्या या दाव्यावरून आणखी मोठी राजकीय उलथापालथ होणार आहे.