South Nagpur Constituency : 2019 ची विधानसभा निवडणूक दक्षिण नागपूरचे मतदार कधीही विसरणार नाहीत. भाजपचे उमेदवार मोहन मते यांचा अवघ्या 4013 मतांनी विजय झाला होता. काँग्रेसचे गिरीश पांडव यांनी त्यांना तगडी टक्कर दिली होती. त्यामुळे गिरीश पांडवच महाविकास आघाडीचे उमेदवार असतील, असे चित्र होते. पण याच निवडणुकीत प्रमोद मानमोडे यांना अवघी 4274 मतं पडली होती. पण तरीही ठाकरे गट त्यांच्यासाठी आग्रही आहे. त्यामुळे दक्षिण नागपूरचे राजकारण सध्या तरी 4000 मतांभोवतीच फिरत आहे.
मोहन मते 4013 मतांनी विजयी झाले, गिरीश पांडव 4013 मतांनी पराभूत झाले आणि प्रमोद मानमोडे यांना 4274 मतं पडली. या तिघांभोवतीच दक्षिण नागपूरची चर्चा फिरत आहे. विशेष म्हणजे महाविकास आघाडी चार हजार मतांनी पराभूत झालेल्याला संधी देईल की चार हजार मते पडलेल्यावर विश्वास टाकेल, याची उत्सुकता लागलेली आहे.
2019 मध्ये भाजपने सुधाकर कोहळे यांचे तिकीट नाकारून मोहन मते यांना संधी दिली. बरेच दिवस सक्रीय राजकारणातून लांब असलेले मोहन मते अचानक एक्टिव्ह झाले. थेट रिंगणातच उतरले. मतदारांनी त्यांच्या बाजुने कौलही दिला. पण हा निसटता पराभव काँग्रेसची ताकद दाखविणारा होता. त्याचवेळी भाजपला आरसा दाखविणारा होता. पण मोहन मतेंसाठी ही पहिली वेळ नव्हती. 1999 मध्ये काँग्रेसचे गोविंदराव वंजारी त्यांच्याविरोधात उभे होते. तेव्हाही मोहन मते यांना पावणेतीन हजारांनीच विजय मिळविता आला होता.
त्यामुळे काँग्रेसचा पराभव झालेला असताना तरीही दावेदारही काँग्रेसच राहिले आहे. 2019मधील अनुभव पाठिशी असल्यामुळे काँग्रेसने ही जागा आमच्याकडेच कायम राहावी, असा आग्रह धरला आहे. पण उद्धव ठाकरे गटाने मानमोडे यांच्या नावासाठी आश्चर्य वाटावे असा हट्टच धरला आहे. एवढा की, दक्षिण नागपूरचा महाविकास आघाडीचा तिढा राज्यभरात चर्चेला आला. त्यावरून उद्धव ठाकरे आणि रमेश चेन्निथला यांच्यात विशेष चर्चा झाली. त्यामुळे सर्वांचेच निर्णयाकडे लक्ष लागले आहे.
मानमोडेच का हवेत?
दक्षिण नागपूरमधून शिवसेना ठाकरे गटाने प्रमोद मानमोडे यांच्याच नावासाठी हट्ट धरला आहे. विशेषतः संजय राऊत यांचे ही जागा शिवसेनेकडेच राहावी, यासाठी उच्चस्तरीय प्रयत्न सुरू असल्याचे समजते. पण मुळात मानमोडेंच्याच नावासाठी एवढा आग्रह का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. विशेष म्हणजे ठाकरे गटातीलच नेत्यांचा मानमोडे यांच्या नावाला विरोध असल्याचे समजते.
उद्धव ठाकरेंचे काय होणार?
रामटेक, दक्षिण नागपूर या दोन्ही जागा शिवसेनेला मिळणार नसतील तर उद्धव ठाकरे नागपुरात कशाला येतील? आणि आलेच तर कोणते उमेदवार त्यांच्या स्वागतासाठी विमानतळावर जातील? असाही सवाल उपस्थित केला जात आहे.