महाराष्ट्र

West Vidarbha : महाशक्ती, वंचित ठरणार निर्णायक

New Challenge : बच्चू कडू, प्रकाश आंबेडकर यांच्यामुळं समिकरणात बदल

Maharashtra Assembly : महाराष्ट्रात निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. जागा वाटपाचा तिढा सुटल्यानंतर उमेदवारांच्या नावांची घोषणा सर्वच पक्षांकडून करण्यात येणार आहे. लोकसभा निवडणुकीनंतर आता महाराष्ट्रातील चित्र पूर्णपणे बदललं आहे. महायुती आणि महाविकास आघाडी दोन्ही ठिकाणी नाखुश असणाऱ्या नेत्यांनी वेगळी चूल मांडली आहे. त्यामुळे यंदा अनेक युती, आघाड्यांचा पर्याय मतदारांना उपलब्ध होणार आहे. अशात आमदार बच्चू कडू आणि प्रकाश आंबेडकर पश्चिम विदर्भातील राजकीय गणितं बिघडवू शकतात असं दिसत आहे.

प्रहार जनशक्ती पार्टीचे नेते आमदार बच्चू कडू हे महायुती आहेत. मात्र गेल्या अनेक महिन्यांपासून ते नाराज आहेत. महायुती सरकारमध्ये त्यांना मंत्रिपद हवे होते. परंतु त्यांना ते मिळाले नाही. दर्जा मात्र मंत्र्यासारखा मिळाला. अशातच बच्चू कडू यांची नाराजी त्यावेळी पराकोटीला गेली, ज्यावेळी भाजपनं सगळ्यांच्या नावावर टिच्चून नवनीत राणा यांना उमदेवारी दिली.

बच्चू कडू यांच्यासह महायुतीमधील सर्वांचाच राणा यांना विरोध आहे. परंतु भाजपचे नेते हट्टाला पेटले. त्यांनी सगळ्यांना नाराज करीत नवनीत राणा यांना भाजपमध्ये घेतले. राणांना सोबत घेणं हे भाजपसाठी पायावर कुऱ्हाड मारून घेण्यासारखं ठरलं. त्यामुळं अमरावतीची जागा महायुतीला गमवावी लागली. अमरावतीतून काँग्रेसचे बळवंत वानखेडे खासदार झालेत. या सगळ्या घटनाक्रमात बच्चू कडू यांच्या नाराजीचा पारा वाढत गेला. त्यामुळं त्यांनी परिवर्तन महाशक्ती या नव्या आघाडीची मुहूर्तमेढ रोवली. सोबतीला राजू शेट्टी आणि छत्रपती संभाजी राजे यांना घेतलं.

Shiv Sena : ..तर आम्ही 75 जागां जिंकणार!

पश्चिमेत जोर

परिवर्तन महाशक्ती राज्यातील दीडशे जागांवर निवडणूक लढणार आहे. अगदी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधातही ते उमेदवार देणार आहेत. परिवर्तन महाशक्तीमधील ‘प्रहार’चा पश्चिम विदर्भात प्रभाव आहे. अमरावतीच्या राजकारणात बच्चू कडू अनेक वर्षांपासून सक्रिय आहेत. अमरावतीसह अकोला, बुलढाणा, यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये ‘प्रहार’ सक्रिय आहे. बच्चू कडू महाविकास आघाडी सरकारच्या काळात अकोल्याचे पालकमंत्रीही होते. त्यामुळे त्यांची महाशक्ती या भागातील राजकारणात परिवर्तन घडवू शकते असं चित्र आहे. महाविकास आघाडी आणि महायुती दोघांसाठी प्रहारचे बच्चूभाऊ कडू ठरू शकतात.

असाच प्रकार वंचित बहुजन आघाडीच्या बाबतीत आहे. पश्चिम विदर्भात प्रकाश आंबेडकर यांची ताकद आहे. स्वत: आंबेडकर यांनी लोकसभा निवडणूक लढविल्यानं अकोल्यात मतविभाजन झालं. असंच मत विभाजन पश्चिम विदर्भातही झालं. त्या परिणाम महाविकास आघाडीला सहन करावा लागला. प्रकाश आंबेडकर यांच्या भारिप-बहुजन महासंघाचाही पश्चिमेत जोर होता. आता या पक्षानं कात टाकत वंचित बहुजन आघाडी हे नाव धारण केलंय. त्यामुळे त्यांचे उमेदवार महायुती आणि महाविकास आघाडीच्या उमेदवारांना अनेक ठिकाणी आमदारकीपासून वंचित ठेऊ शकतात. परिणामी या दोघांचं करायचं काय, असा प्रश्न आघाडी आणि युती दोघांनाही पडला आहे.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!