महाराष्ट्र

Assembly Election : सोशल मीडियावरच जाहीर होतेय उमेदवारी!

Social Media : फेकन्यूजच्या जाळ्यात राजकीय पक्ष; यादीने वाढविली इच्छुकांची चिंता

Ravindra Dhangekar : सबकुछ ऑनलाईनच्या युगात राजकीय पक्ष व कार्यकर्तेदेखील ऑनलाईन झाले आहेत. त्यामुळे एखाद्या नेत्याने एखादी गोष्ट पोस्ट केली की त्याची शहानिशा न करता त्याला व्हायरल करण्यावर बहुतांश जणांचा भर असतो. यातूनच निवडणूक काळात झपाट्याने अफवा पसरतात व राजकीय पक्षदेखील नकळतपणे फेकन्यूजच्या जाळ्यात अडकतात. याचेच उदाहरण काँग्रेस नेते रवींद्र धंगेकर यांच्या ट्वीटच्या रुपाने संपूर्ण महाराष्ट्राने पाहिले.

नेते देखील संभ्रमात

गुरुवारी रात्री काँग्रेसचे नेते रवींद्र धंगेकर यांनी विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसची पहिली यादी जाहीर झाली असल्याचे सांगत एक यादी पोस्ट केली. त्यावर काँग्रेस सरचिटणीस के.सी.वेणुगोपाल यांची स्वाक्षरीदेखील होती. ही यादी झपाट्याने व्हायरल झाली. यात दहा उमेदवारांची नावे होती. मात्र काँग्रेसच्या एक्स हॅंडलवर अशी कुठलीही यादी नव्हती. त्यामुळे नेतेदेखील संभ्रमात पडले.

मध्यरात्री फोनाफोनी सुरू झाली. अखेर ही यादी बनावट असल्याचे काँग्रेसकडून जाहीर करण्यात आले. दरम्यान धंगेकरांनी उमेदवारांच्या यादीची पोस्ट डिलीट केली. पण त्यांपूर्वीच इच्छुकांचा बीपी मात्र चांगलाच वाढला होता. अशा प्रकारच्या घटना निवडणूक काळात मोठ्या प्रमाणावर होण्याचा धोका असतो. विशेषत: कुठलाही फोटो मॉर्फ करून सहजपणे संभ्रम निर्माण करता येतो.

याचा फटका राजकीय पक्षांना बसण्याचा धोका असून यातूनच फेकन्यूजदेखील वाढीस लागण्याची भिती वर्तविण्यात येत आहे. प्रचार-प्रसारासोबतच राजकीय पक्षांनी आता फेकन्यूजबाबतदेखील कार्यकर्त्यांचे विशेष प्रशिक्षण घेण्याची आवश्यकताच निर्माण झाली आहे.

भाजपची यादी आली म्हणे!

महायुतीमध्ये जागावाटपावर शिक्कामोर्तब व्हायचेच आहे. उमेदवार ठरायचेच आहे. तरीही नागपुरात तीन जागांवरील भाजपचे उमेदवार निश्चित झाले आहेत. त्यांना तसे कळविण्यात आले आहे, अशी चर्चा शुक्रवारी दिवसभर नागपुरात सुरू होती. दक्षिण-पश्चिम, पूर्व आणि दक्षिण नागपूर या तीन मतदारसंघांवर अंतिम निर्णय झाल्याची चर्चा सुरू झाली. खरे तर दक्षिण पश्चिम हा देवेंद्र फडणवीस यांचा मतदारसंघ. येथे महायुतीचा इच्छुक कुणीच नाही. पण पूर्व आणि दक्षिणमध्ये उमेदवार बदलण्याची मागणी अंतर्गत पातळीवर होत आहे. अशात यादी जाहीर झाल्याची बातमी पसरल्याने इच्छुकांना धडकी भरली होती.

Assembly Election : नांदेडमधून रविंद्र चव्हाण यांना उमेदवारी!

व्हॉट्सएपने केली घोषणा!

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दक्षिण-पश्चिममधून, कृषी खोपडे पूर्व नागपूरमधून आणि मोहन मते दक्षिणमधून कायम राहणार, अशी व्हॉट्सएप पोस्ट व्हायरल झाली. त्यानंतर तशी चर्चाही सुरू झाली. अर्थात या तीन नावांवर उद्या शिक्कामोर्तब होईलही. पण अधिकृत घोषणा झालेली नव्हती. केवळ सोशल मीडियावर याची चर्चा होती.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!