महाराष्ट्र

Nagpur Politics : फलकांच्या माध्यमातून आरोप प्रत्यारोप

Assembly Election : महत्वाच्या मुद्द्यांना घातला जातोय हात

Mahayuti Vs Mahavikas Aghadi : विधानसभा निवडणूक जवळ आल्यानंतर राज्यात आरोप-प्रत्यारोपांना जोर आला आहे. अशात राजकीय पक्षांकडून एकमेकांचा उल्लेख न करता फलकबाजी करण्यात येत आहे. नागपूर शहरातील सर्वांत वर्दळीच्या वर्धा मार्गावर मालवण राजकोट येथील घटनेच्या अनुषंगाने अनेक फलक लागले आहेत. या फलकांवर हॅशटॅग माफ करा महाराज, असा उल्लेख आहे. याशिवाय शहरात अनेक ठिकाणी देवेंद्र फडणवीस, शरद पवार, उद्धव ठाकरे, राहुल गांधी यांना टार्गेट करणारे फलक लागले आहेत.

राज्यभरात निवडणुकीमुळे आचारसंहिता लागू आहे. अशात कोणताही राजकीय फलक लावता येत नाही. त्यामुळे कोणाचाही नामोल्लेख न करता ही फलकबाजी सुरू झाली आहे. शहराच्या अनेक भागात मोठे होर्डिंग्ज आहेत. त्यावरही असे अनुल्लेख असलेले फलक लागलेले आहेत. या होर्डिंग्जची अधिकृत नोंदणी महापालिकेकडे आहे. त्यामुळे असे फलक कोणी लावले, याची माहिती सहज निवडणूक यंत्रेणतील अधिकाऱ्यांना काढता येते. मात्र सध्या ‘तेरी भी चुप, मेरी भी चुप’ असा कार्यक्रम सुरू आहे.

विदर्भात सर्वत्र युद्ध

अशा प्रकारचे पोस्टवॉर केवळ नागपुरातच सुरू आहे असे नाही. विदर्भातील सर्वच जिल्ह्यांमध्ये सध्या अशी होर्डिंगबाजी करण्यात येत आहे. आचारसंहिता लागण्यापूर्वी अकोला शहरात मोठ्या प्रमाणावर पोस्टर लागले होते. या पोस्टरमधून काँग्रेसला टार्गेट करण्यात आले होते. त्यानंतर राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या नावानेही अकोल्यात फलक लागले. मात्र हे फलक लावण्यात राष्ट्रीय ओबीसी महासंघाचा सहभाग होता काय, याचं उत्तर अद्यापही मिळालेलं नाही. राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष डॉ. बबनराव तायवाडे यांनी यासंदर्भात चौकशी केल्यानंतर बोलता येईल, असं नमूद केलं होतं. पण त्यानंतर याबाबत काहीच झाले नाही.

Assembly Election : पूर्वेत यंदा कोणाचा सूर्य तळपणार?

खामगाव येथेही काँग्रेसचे माजी आमदार दिलीप सानंदा यांनी अशीच होर्डिंगबाजी केली होती. आचारसंहितेपूर्वी हा प्रकार घडला होता. यावरील मजकूर आक्षेपार्ह असल्यानं खामगाव पोलिसांनी स्वत:हून कारवाई केली होती. यासंदर्भात सानंदा आणि पोस्टरवाल्याविरोधात पोलिसांनी गुन्हा नोंदविला आहे. त्यानंतर आचारसंहिता लागू झाली. आता सर्वत्र नावाचा आणि पक्षाचा उल्लेख नसलेलेच फलक लक्षवेधी ठरत आहेत. त्यातून ‘हॉट अॅन्ड हिट’ ठरणाऱ्या विषयांना हात घालण्यात येत आहे. मात्र या फलकबाजीतून अधिकांश प्रमाणात एकमेकांवर चिखलफेक होतानाच दिसत आहे. त्यामुळे आता प्रशासकीय यंत्रणा यावर कोणता उपाय करते, हे बघण्यासारखे आहे.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!