Warora : नागपूर : विधानसभा निवडणुकीसाठी महायुतीच्या जागावाटपाचा फॉर्म्युला अद्याप जाहीर झाला नाही. पण चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा येथील जागेचा वाद पेटला आहे. ही जागा शिवसेना शिंदे गटाला जाण्याच्या भितीपोटी स्थानिक भाजपच्या इच्छुकांनी बंडखोरीची तयारी केली आहे. नाराज कार्यकर्त्यांनी नागपूर गाठून विदर्भ संघटनमंत्र्यांकडे याबाबत मागणीदेखील केली. दरम्यान, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे शुक्रवारी वरोरा दौऱ्यावर आहेत. तेथे ते पदाधिकाऱ्यांशी चर्चा करतील.
वरोऱ्याची जागा महायुतीमध्ये शिंदेसेनेच्या वाट्याला गेली आहे. शिंदेसेनेकडून काँग्रेसचे दिवंगत खासदार बाळू धानोरकर यांचे थोरले बंधू भद्रावतीचे माजी नगराध्यक्ष अनिल धानोरकर यांना उमेदवारी निश्चित झाली आहे. अशी चर्चा पसरली. या चर्चेने गुरुवारी राजकीय वातावरण ढवळून निघाले. भाजपच्या इच्छुकांना यामुळे धक्का बसला. त्यामुळे तेथील इच्छुक उमेदवार रमेश राजुरकर, ओमप्रकाश मांडवकर यांनी तडकाफडकी कार्यकर्त्यांना घेऊन नागपूर गाठले.
इच्छुकांनी भाजपचे विदर्भ संघटनमंत्री डॉ. उपेंद्र कोठेकर यांची भेट घेतली. वरोऱ्याची जागा शिंदेसेनेकडे जात असल्याच्या चर्चांबाबत कार्यकर्त्यांनी संताप व्यक्त केला. वरोरा येथे भाजपचेच वर्चस्व आहे. जर ही जागा भाजपला मिळाली नाही तर आम्ही आमच्या नेत्यांना बंडखोरी करण्यासाठी बाध्य करू, असा इशारा कार्यकर्त्यांनी दिला आहे. दरम्यान बावनकुळेंचा वरोरा दौरा याच पार्श्वभूमीवर असल्याचे बोलले जात आहे.
काँग्रेसचे होते वर्चस्व
वरोरा विधानसभा मतदारसंघावर एकेकाळी देवतळेंचे वर्चस्व होते. संजय देवतळे यांनी चारवेळा हा विधानसभा मतदारसंघ काबीज केला. 2014 मध्ये संजय देवतळे यांना काँग्रेसने तिकीट नाकारले. त्यानंतर त्यांनी ऐनवेळी भाजपमध्ये प्रवेश केला. पण मोदी लाटेतही ते पराभूत झाले. त्यावेळी शिवसेना वेगळी लढली होती आणि बाळू धानोरकर यांनी विजय मिळवला.
Assembly Election : दक्षिण नागपुरात महाविकास आघाडीतून कोण करणार स्वारी?
पुन्हा देवतळे?
राज्याचे माजी सांस्कृतिक कार्यमंत्री संजय देवतळे यांचे कोरोना काळात निधन झाले. मात्र आता भाजपकडून संजय देवतळे यांचे सुपूत्र करण देवतळे इच्छुक आहेत. अशात शिंदे गटाने दावा केल्यामुळे नवा वाद निर्माण झाला आहे. दरम्यान, काँग्रेसच्या खासदार प्रतिभा धानोरकर यांचे बंधू प्रवीण काकडे देखील वरोरा येथून इच्छुक आहेत. त्यामुळे वरोरा मतदारसंघात केवळ महायुतीपुढेच नव्हे तर महाविकास आघाडीपुढेही मोठा पेच निर्माण झाला आहे. दोन्हींकडून येत्या चार दिवसांत उमेदवार निश्चित होईल. त्यानंतरच वाद संपुष्टात येतो की वाढतो, हे स्पष्ट होईल.