Protest By BJYM : हिंदू देवीदेवतांवर टीका करण्यातच श्याम मानव धन्यता मानतात. अशातच आता त्यांनी महायुतीवरही टीका सुरू केली आहे. अंधश्रद्धा वैगरे हा वेगळा प्रकार आहे. परंतु सामाजिक क्षेत्रात कार्य करणाऱ्यांनी राजकीय भाषा करणं चुकीचं आहे. असाच प्रकार विश्वंभर चौधरी यांच्या बाबतीत आहे. महाविकास आघाडीला विशेषत: काही पक्षांना फायदा मिळवून देण्याचा मानव आणि चौधरी यांचा प्रयत्न असतो. त्यामुळे मानव काय किंवा चौधरी काय दोघेही सुपारीबाजच आहेत, अशी टीका भाजप नेते आमदार तथा माजी मंत्री डॉ. परिणय फुके यांनी केली.
गुरुवारी (17 ऑक्टोबर) डॉ. फुके यांनी नागपुरात प्रसार माध्यमांशी संवाद साधताना श्याम मानव आणि चौधरी यांच्यावर सडकून टीका केली. फुके म्हणाले, विश्वंभर चौधरी यांची पुण्यात कोट्यवधी रुपयांची मालमत्ता आहे. एवढा पैसा चौधरी यांनी कोणाकडून आणि कसा मिळविला. या मालमत्तेचे विवरण त्यांची जाहीर केले पाहिजे. चौधरी यांच्या उत्पन्नाच्या स्रोतांचा विचार केल्यास कोट्यवधी रुपयांची मालमत्ता खरेदी करणे पुण्यासारख्या शहरात शक्य आहे काय, असा सवालही डॉ. फुके यांनी केला.
पवारांचा हात
श्याम मानव यांना पोसणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आहेत. पवारांनी मानव यांना अनेक दिवसांपासून रसद पुरविली आहे. त्यामुळे मानव मनाला वाटेल तसे बोलत राहतात. अलीकडच्या काळात तर त्यांनी हिंदू देवीदेवतांचा अपमान करणे चालविले आहे. अन्य लोकांबद्दल ते असं बोलण्याची हिंमत करू शकतात का, असा प्रश्नही डॉ. फुके यांनी केला. त्यामुळे त्यांना काही कार्यकर्त्यांनी प्रश्न विचारले तर चुकले कुठे असेही डॉ. फुके म्हणाले. काही लोक महायुती सरकारवर टीका करतात. महायुती सरकारकडूनच नंतर सुरक्षा मागतता. त्यामुळे सरकारकडून सुरक्षा घ्यायची आणि सरकारच्या विरोधातच गरळ ओकायची असा यांचा क्रम सुरू असतो, असे ते म्हणाले.
डॉ. परिणय फुके यांचा आरोप
गुन्हेगारी प्रवृत्ती असलेल्या, राष्ट्रद्रोही लोकांचे काही जण वकिलपत्र घेतात. जे लोक देशाच्या विरोधात आहेत, त्यांचे समर्थन कसे केले जाऊ शकते. प्रत्येकाला सरकारच्या चुका दाखविण्याचा अधिकार आहे. पण जशा चुका दाखविल्या जातात, तसे एखादे चांगले काम केले तर त्याबद्दल जर कोणी बोलत असेल तर अशा व्यक्तींबद्दल आदर वाटतो. असे व्यक्ती निष्पक्ष आणि नि:पक्ष असतात. पण जर कोणी सुपारी घेऊन काम करत असेल तर त्याला योग्य ती जागा दाखविली गेली पाहिजे, असेही डॉ. परिणय फुके म्हणाले.