Nagpur constituency : लोकसभा निवडणुकीतील निकालांमुळे महाविकास आघाडीचा आत्मविश्वास चांगलाच वाढला आहे. त्यामुळे एक नव्हे तर आघाडीतील तिन्ही पक्षांचे दावे-प्रतिदावे सुरू आहेत. खरं तर नागपूर शहरात सर्व जागांवर आतापर्यंत काँग्रेसच लढली आहे. सध्या तर दोन मतदारसंघही त्यांच्याकडे आहेत. पण उद्धव ठाकरे गटाने दक्षिण नागपूरवर दावा केल्यामुळे नवा पेच निर्माण झाला आहे. यातून महाविकास आघाडी कसा मार्ग काढते, ते लवकरच कळेल.
सध्या भाजपकडे..
नागपूर दक्षिण मतदारसंघ सध्या भाजपकडे आहे. गेल्यावेळी मतमोजणी सुरू असताना काँग्रेसचे गिरीश पांडवच जिंकणार हे निश्चित होते. पण शेवटच्या क्षणाला मोहन मते यांनी आघाडी घेतली. 4013 मतांनी ते विजयी झाले. काँग्रेसचा निसटता पराभव झाला. त्यावेळी इतर सर्व उमेदवारांना सहा हजारांपेक्षा कमी मते मिळाली होती. त्यात शिवसेनेचे नेते किशोर कुमेरिया अपक्ष लढले होते. त्यांना पाच हजार मतेही मिळवता आली नव्हती. त्यामुळे गेल्यावेळी ज्या पक्षाच्या नेत्याला पाच हजार मतेही मिळाली नाहीत तो पक्ष दावा करू शकत नाही, अशी भूमिका काँग्रेसने घेतली आहे.
रामटेकमधून लढण्यासाठी खरं तर ठाकरे गटाकडे उमेदवार नाही. पण तेथेही ठाकरे गटाने दावा केला आहे. रामटेक हा शिवसेनेचा गड राहिला आहे. शिवाय आज महायुतीत रामटेकमध्येच अनके गट तयार झाले आहेत. त्याचा फायदा शिवसेनेला होऊ शकतो, असे ठाकरे गटाला वाटत आहे. त्यामुळे तेथेही त्यांचा दावा कायम आहे. याठिकाणी गेल्या अनेक निवडणुका काँग्रेसच लढत आली आहे. त्यामुळे काँग्रेस जागा सोडायला तयार नाही.
काँग्रेस जिंकली नाही तरीही
यापूर्वी माजी मंत्री स्व. मधुकरराव किंमतकर, चंद्रपाल चौकसे, आनंदराव देशमुख काँग्रेसतर्फे लढले आहेत. अर्थात आतापर्यंत सुरुवातीच्या तीन निवडणुका वगळता काँग्रेस एकदाही जिंकले नाहीत. मात्र मतांची टक्केवारी दुसऱ्या किंवा तिसऱ्या क्रमांकाची राहिली आहे. गेल्या निवडणुकीत भाजपकडून रेड्डी लढले. तर आशीष जयस्वाल शिवसेनेचे असतानाही त्यांनी अपक्ष निवडणूक लढवली. जयस्वाल जिंकले. रेड्डी दुसऱ्या क्रमांकावर होते. पण काँग्रेसचे उदयसिंग यादव यांना ३२ हजाराहून अधिक मतं पडली होती.
बैठकीत काय ठरले?
महाविकास आघाडीच्या बैठकीत ‘ज्या मतदारसंघात जो पक्ष मजबूत आहे आणि सक्षम उमेदवार आहे, त्याच्यासाठी जागा सोडायची’, असं ठरलं आहे. याची आठवण काँग्रेस नेते नसीम खान यांनी शिवसेना ठाकरे गटाला करून दिली आहे. त्यानुसार रामटेकमध्ये भाजप-शिवसेना युती तुटेपर्यंत काँग्रेसच दुसऱ्या क्रमांकाला राहिला आहे. तर दक्षिण नागपूरमध्ये काँग्रेसने आपली ताकद सिद्ध केली आहे, याचीही जाणीव नसीम खान यांनी करून दिल्याचे समजते.