Collector Officer Dr. Kiran Patil : विधानसभा निवडणुकीसाठी बुलढाणा जिल्ह्यातील 7 विधानसभा मतदारसंघातील 2 हजार 288 मतदान केंद्रांवर 20 नोव्हेंबरला मतदान होणार आहे. 21 लाख 24 हजार 227 मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. याच मतदारांच्या हातात अनेकांचे भवितव्य आहे. जिल्ह्यात आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. सर्वांनी आचारसंहितेचे पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. किरण पाटील यांनी केले आहे.
बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी अपर जिल्हाधिकारी सदाशिव शेलार, उपजिल्हा निवडणूक अधिकारी सुवासिनी गोणेवार आदी उपस्थित होते. जिल्हा प्रशासनाचे 70 टक्क्यांवर मतदानाचे लक्ष्य आहे. केवळ प्रशासनाने मानस व्यक्त करून हा संकल्प साध्य होणार नसून मतदारांनीही प्रशासनाच्या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद देत अधिकाधिक संख्येने मतदान करावे. तसेच ज्या मतदारांचे नाव मतदान यादीत नाही अशा मतदारांनी 29 ऑक्टोंबर पर्यंत मतदान केंद्रावर किंवा ऑनलाईन नोंदणी करुन घ्यावी, असे आवाहन जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. पाटील यांनी यावेळी केले.
निवडणूक कार्यक्रम याप्रमाणे
बुलढाणा जिल्ह्यात सात विधानसभा मतदारसंघ असून या मतदारसंघातील निवडणूक कार्यक्रम पुढीलप्रमाणे असणार आहे. मंगळवार दि. 22 ऑक्टोबर रोजी निवडणूकीची अधिसूचना प्रसिध्द करण्यात येईल. मंगळवार दि. 29 आक्टोबर हा नामनिर्देशन पत्र सादर करण्याचा अंतिम दिनांक असणार आहे. बुधवार दि. 30 ऑक्टोबर रोजी नामनिर्देशन पत्राची छाननी करण्यात येणार आहे. सोमवार दि. 4 नोव्हेंबरपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येणार आहे. बुधवार दि. 20 नोव्हेंबर रोजी मतदान तर शनिवार दि. 23 नोव्हेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. निवडणूक प्रक्रिया 25 नोव्हेंबरपर्यंत पूर्ण करण्यात येणार आहे.
जिल्ह्यात 2 हजार 228 मतदान केंद्र ..
जिल्हयात लोकसभेसाठी 2266 मतदान केंद्र होती.यात 23 नविन मतदान केंद्रांची वाढ होऊन विधानसभा निवडणूक 2024 साठी जिल्ह्यामध्ये 2288 मतदान केंद्र आहे. यामध्ये मलकापूर येथे 305, बुलढाणा येथे 337, चिखली 317, सिंदखेड राजा 340, मेहकर 350, खामगांव 322 तर जळगाव जामोद येथे 317 असे एकूण 228 मतदान केंद्र आहे.
राज्य सीमेवर विशेष दक्षता
राज्य सीमेवरील चेकपोस्टवर विशेष दक्षता घेण्यात येणार आहे. यासाठी राज्य सीमेवर दोन पोस्ट असणार असून राज्य उत्पादन शुल्क, परिवहन, वन तसेच पोलीस विभागांच्या पथकांमार्फत चेक पोस्टवर विशेष दक्षता घेण्यात येणार आहे.
Assembly Election : ये निवडणूक नहीं आसाँ… इक आग का दरिया है!
सोशल मीडियावर विशेष लक्ष
सोशल मीडिया, फेक न्यूजवर विशेष लक्ष देण्यात येणार आहे. मतदानाच्या काळात सोशल मीडियावर प्रसारित होणारे, गैरसमज पसरविणारे संदेश व इतर घटनांवर लक्ष ठेवण्यात येणार आहे.